नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्या सोबत काय नेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 07:55 AM2018-12-27T07:55:54+5:302018-12-27T08:00:07+5:30

सरत्या वर्षाला निरोप देताना काय येतंय मनात? काहीच छान घडलं नाही असं, की बरंच काही चांगलं घडलं, आता अजून काही फार चांगलं घडेल? आपण काय नेणार नव्या वर्षात सोबत

What will you take with you during enter in the new year? | नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्या सोबत काय नेणार?

नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्या सोबत काय नेणार?

googlenewsNext

-- मुक्ता चैतन्य

बघता बघता अजून एक वर्ष संपलं. अशी कितीतरी वर्षं संपत असतात. नवीन येत असतात. आपण सरत्या वर्षात काय काय केलं याच्या आठवणी काढत राहातो. येणा-या वर्षाची तारीख लिहिण्याचा सराव करत राहातो मनातल्या मनात. जन्माला आलेला प्रत्येकजण दरवर्षी हे करत असतो. शरीरातल्या पेशी झिजत असतात. अनुभवाने शहाणपण वाढत असतं. चारचे चौदा पावसाळे होतात. वर्ष येतं असतं, जातं असतं. 
नवीन वर्षात काय दडलंय, कुठे माहीत असतं कुणाला? 

आयुष्य काय वाढून ठेवणार आहे पुढय़ात, कशा कशाचा सामना करावा लागणार आहे, कशाचा आनंद मिळणार आणि  समाधान नेमकं  कशात दडलंय कुठे माहीत असतं, सरत्या शेवटच्या दिवसापर्यंत. तसं तर वर्ष सरल्यानंतरही आणि नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतरही कुठे कळतं आपल्याला नक्की काय दडलंय पुढय़ात?

तरीही अशा विलक्षण अनोळखी काळात आपण आनंदानं पाऊल ठेवतो, उमेदीनं नव्या वर्षाचं स्वागत करतो आणि एका साहसाला दरवर्षी सुरुवात करत असतो. 
शोध, कुतूहल आणि साहस ही माणसांची गरज असते. अन्न, वस्त्र , निवा-याइतकंच ते महत्त्वाचं असतं. नुसतं पोट भरून चालत नाही, नुसतं छप्पर मिळवून भागात नाहीत. शरीरसुखाची गरज संपल्यावरही काहीतरी उरतंच. मग शोध सुरू होतो स्वत:चा, परिसराचा, परिघाचा. त्यात असणार्‍या आणि नसणा-या गोष्टींचा. 

हा शोध आपल्या श्वासासारखा निरंतर चालला तर गंमत आहे. जे नाही त्याचा शोध, जे घडण्याची शक्यता आहे त्याचा शोध, जे हवंय त्याचा आणि जे नकोय त्याचाही!
गमतीचा भाग हा की हा शोध कधीच संपत नाही. थांबत नाही. कॅलेंडर तेवढं बदलत राहातं. 

आताही आपलं कॅलेंडर बदलणार आहे. नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करायचं आहेच, पण त्याचबरोबर आपण आपल्यात काय बदल घडवून आणू शकतो याचा विचार कदाचित आपल्याला नव्या शोधाकडे घेऊन जाईल.  
आजूबाजूला बघितलं की आपापल्या समजुतींना, श्र द्धांना, समज-गैरसमजांना कवटाळून बसलेली माणसं दिसतात. आपल्याला जे समजलंय त्यापलीकडेही बरंच काही समजून घेण्याची आवश्यकता असते. आपल्याला जे पटलंय त्यापलीकडेही काहीतरी असतं जे समजून घेता येऊ शकतं. जे माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करतं.  
या प्रवासाला अंत नाही. कदाचित डेस्टिनेशनही नाही. 
पण हा प्रवास अतिशय रंजक आहे. आकर्षक आहे. त्यात आनंद आहे, एवढं तरी आपल्या मनाशी असावंच.  

अनेकदा आपण आपल्याच मूलभूत भावना, आनंद, निराशा, प्रेम, राग, मत्सर समजून घ्यायलाही कमी पडतो. आपल्या प्रत्येकाची नाती, आपलं काम, आपलं आपलं वैयक्तिक आणि व्यावहारिक आयुष्य, आपला दृष्टिकोन, आपल्या महत्त्वाकांक्षांचा पोत, इच्छाशक्ती, तिचं तीव्र असणं-नसणं, आपण स्वत:वर प्रेम करणं, न करणं, इतरांना समजून घेणं- न घेणं,  कष्ट करण्याची आपली तयारी असणं-नसणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावना.  

 वर्षानुवर्षं मनाच्या कुठल्याशा कोपर्‍यात पडून राहणा-या भावना. त्या भावनांची ओझी आपण वागवतो की भावनांचं नियोजन आपल्याला करता येतं या सगळ्यावर आपलं यश-अपयश, आपल्या स्वभावाचे विविध पैलू आणि आपलं भावविश्व अवलंबून असतं.
निराशेचे क्षण येतातच. येणारच!

त्यावेळी वाटतं कुठंय आनंद?

पण आनंदाच्या शोधात पायपीट करत असताना आपण   विसरूनच जातो की आनंदच्या झाडाचं बी आपल्याच आत मनात, पेरलेलं असतं. त्याला पालवी मात्र  तेव्हाच फुटते जेव्हा आपण स्वत:त डोकावून बघतो.  

सरत्या वर्षाला निरोप देताना त्या आनंदाच्या क्षणांना वेचू, त्यांचे आभार मानू, त्यांना सोबत घेऊ. आणि निघू, नव्या वर्षात.
यश-आनंद आपली वाट पाहात आहेत. 

 

Web Title: What will you take with you during enter in the new year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.