प्रॉब्लम क्या है?

By admin | Published: April 16, 2015 04:55 PM2015-04-16T16:55:51+5:302015-04-16T16:55:51+5:30

समस्या येतातच, त्यांना घाबरून, बिचकून राहिलं तर प्रगती कशी होणार? नव्या काळात प्रॉब्लेम सोडवणं, पटापट सोडवून पुढचे प्रश्न हाती घेणं हेदेखील एक स्किल आहे; ते शिकायला हवं!

What is the problem | प्रॉब्लम क्या है?

प्रॉब्लम क्या है?

Next
- सॉफ्ट स्किल
 
जीवन म्हटलं की, समस्या येणारच; असा कोण आहे जगात ज्याला काहीच समस्या नाहीत, काहीच प्रॉब्लम येत नाही. येणारी आव्हानं स्वीकारून ती यशस्वीपणो हाताळण्याची कला काहींना सहज उपजत असते, तर काहींना ती डेव्हलप करावी लागते.  
काही माणसं मात्र समस्या दिसली की बिचकतात, काहीजण तर समस्या आहे हेच नाकारतात आणि काही माणसं समस्येतच हरवून जातात की त्यांचे छोटे छोटे प्रश्नही अनेकदा खूप मोठे होतात.
त्यामुळेच आपल्याला हे कौशल्य शिकायला हवं ज्याला समस्या निरसन कौशल्य अर्थातच प्रॉब्लम सॉल्व्हिंग अॅबिलिटी असं म्हणतात. 
हे एक स्किल आहे, एक कौशल्य आहे. मात्र, हे कौशल्य काही कुणी आपल्याला शाळा कॉलेजात शिकवत नाही.  जो तो आपल्याला जमेल तसं हे कौशल्य शिकतो, काहीजण मात्र कायम गांगरलेलेच राहतात.
मात्र या प्रक्रियेकडे आपण कधी नीट शांतपणो पाहत नाही.
एखादा  प्रश्न, समस्या आपल्यासमोर येते म्हणजे नेमकं काय होतं? अशी समस्या समोर आली की, आपण काय करतो, काय रिअॅक्शन देतो, हे जरा बारकाईनं बघा!
खरंतर आपण अनेकदा घोळ घालतो त्यापेक्षा ही एक सोपी प्रक्रिया आहे, असं या कौशल्याकडे पहायला हवं. म्हणजे काय तर समोर असलेला प्रॉब्लम नेमका काय आहे हे    अचूक ओळखणं, ही पहिली पायरी. तो प्रश्न समजून घेऊन त्याच्या मुळाशी पोचणं आणि योग्य आकलन करून घेऊन  ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणं, सोडवणं हा पुढचा टप्पा! 
प्रश्न नेमका कळला, समस्या आहे तेवढीच नीट पाहता आली तर तिचं उत्तरे शोधणंही तुलनेनं सोपं होतं!
ते सोपं व्हावं म्हणून या काही गोष्टी फक्त अंगीकारता यायला हव्यात!
ये है प्रॉब्लम.
मग सोडवा तो!
1) समस्या समजून घेणं, तिला मागचा पुढचा संदर्भ न देता ती आहे तेवढीच पाहता येणं फार महत्त्वाचं! कधी-कधी आपल्याला समस्या स्पष्टपणो कळतं की समस्या नेमकी काय आहे, कधी-कधी कळतच नाही. अशा वेळी घाई न करता, लगेच रिअॅक्ट न होता आधी समस्या चोख समजून घ्या. समस्या समजली तरच योग्य निरसन करता येईल, नाहीतर नाही.
2) पूर्वीची धोरणं बाजूला ठेवून समस्येकडे पहा. अनेकदा आपण आधीच एखाद्या परिस्थितीविषयी धोरण बांधून ठेवलेले असते. म्हणजे काय तर आपलं मत, आपली भूमिका तयार असते, त्यात आपल्याला बदल करायचा नसतो. त्यामुळे आपण नव्याने समस्येकडे न पाहता जुन्याच पद्धतीनं समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. असे न करता नव्या नजरेने समस्येचा आढावा घ्या.
3) प्रश्न आहे ना, तो सोडवायचा आहे असं समजून विचार करा. एखादा भन्नाट विचार डोक्यात आला, तुम्हाला तो फालतू वाटला तरी लिहून ठेवा, काय सांगावं तोच उपाय तुमचं काम सोपं करेल. मनाच्या खिडक्या उघडा, हेच सूत्र.  
4) आहे ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला सुचलेल्या सर्व पर्यायांचे सविस्तर विश्लेषण करा. यातील कोणता उपाय उत्तम ठरू शकेल हे पडताळून पहा.  घाई अजिबात करू  नका. शांतपणो निर्णय घ्या.
5)  गरज भासल्यास चार लोकांशी चर्चा करा, त्यांचे मत घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा: नेहमी स्वत: विचार आधी करावा,  मगच लोकांचं मत घ्यावं. निर्णय हा नेहमी तुमचा असला पाहिजे.
6) तुम्ही निवडलेल्या मार्गाने समस्या सुटली नाही किंवा काही अनपेक्षित अडथळे आले, तर काय करायचं याचाही अंदाज घ्या.
7) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चिकाटी ठेवा! कधी-कधी समस्या किचकट असतात. आपण धीर धरून तिचा पाठपुरावा करणं गरजेचं असतं. जिद्द ठेवली तर हे कौशल्य शिकणं काही अवघड नाही!
समिंदरा हर्डीकर-सावंत

 

Web Title: What is the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.