स्मार्ट सायकल शेअरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 08:43 AM2018-03-15T08:43:39+5:302018-03-15T08:43:39+5:30

पुण्यासारख्या शहरात चालायला जागा नाही, तिथं सायकल चालवत मस्त भटकायचं, गाणं गुणगुणत आपल्याच धुंदीत सायकल चालवायची हे शक्य तरी आहे का? - शक्य आहे! पुण्यात नवीन सायकल संस्कृती उभी राहतेय.. आणि तरुण पुणं सायकलवर स्वार होतं आहे

Smart Cycle Sharing | स्मार्ट सायकल शेअरिंग

स्मार्ट सायकल शेअरिंग

Next


- राहुल गायकवाड

सिनेमात कसं मुलं-मुली मस्त सायकलवरून कॉलेजला जातात.. किंवा दोस्तांची टोळी सायकलींवर डबल सिट बुंगाट निघते.. किंवा सायकलवर पॅडल मारत हात मोकळे सोडून मस्त डोलता येतं आपलं आपल्यालाच..
आपण आपल्या ‘अ‍ॅटिट्यूड’ने सायकल चालवणार, कुणाची फिकीर नाही, कुणाचा रुबाब नाही..
असं वाटतं ना आपल्याला?
पण वाटून काय उपयोग, असा सिनेमातला किंवा कादंबºयातला काळ आता मोठ्या म्हणवणाºया शहरात कुठं जगता येतो?
आणि त्यातही पुण्यात? म्हणजे कुणी कल्पना तरी करेल का, जेएम रोड किंवा एफसी रोडवर आपण मस्त सायकलवर फिरतोय?
- नुस्त्या कल्पनेनंही भन्नाट वाटावं, एक्साइट व्हावं असा हा विचार. पुण्यातला एफसी रोड म्हणजे मोठी हॅपनिंग जागा. तरुण, रंगबिरंगी, रसरशीत. उत्साहानं सळसळणारी. आधुनिकही. सध्या त्याच एफसी रोडवर एक विलक्षण हॅपनिंग आणि फुल क्रेझी-कूल गोष्ट घडतेय.
या रस्त्यावर अनेक तरुण-तरुणी एकसारख्या हिरव्या रंगाच्या सायकलींवरून मस्त फिरताना दिसतात. सायकल चालवत गप्पा रंगतात. सायकलचं पॅडल फिरतं आणि बाकीचं क्राउड या तरुण मुलांकडे अप्रूपानं पाहतं.
बाइक्स, सुपरबाइक्स, चारचाकी चकाचक गाड्या यांच्या जगात या सायकली कुठून आल्या, असा प्रश्न विचाराल तर उत्तर एकच, या सायकलींवरून फिरणं हे पुण्यातल्या तरुण पब्लिकसाठी मोठं इन प्रकरण झालं आहे.
त्याचं कारण म्हणजे आता पुण्यात सायकली भाड्यानं मिळून लागल्या आहेत. आणि त्याही एकदम आॅनलाइन स्मार्टनेससह. म्हणजे काय तर एफसी रोडवर सायकल चालवायला तुमच्याकडे सायकल असण्याचीही गरज उरलेली नाही नि विकत घ्यायचीही, घरापासून दामटत येण्याचीही गरज नाही आणि ‘सायकलवाला’ गरीब लूक कॅरी करण्याची तर त्याहून गरज उरलेली नाही.
त्याचं कारणच असं की, सध्या पुण्यातील विविध भागात काही सायकल स्टेशन्स तयार करण्यात आली आहेत. त्या स्टेशनवरून आता कुणालाही सायकल भाड्यानं घेता येऊ शकते. आणि मस्त सायकल चालवत फिरता येऊ शकते. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औंध, एफसी रोड, जंगली महाराज रोड, लॉ कॉलेज रोड या भागात सायकल स्टेशन्स असल्यानं सध्या तरुणांच्या जगात सायकल नावाची एक नवीच गोष्ट नव्यानं दाखल झाली आहे. ‘पुण्यात सायकलवर भटकायचं’ या तीन शब्दातली क्रेझ अधिक जादू सध्या अनेकजण अक्षरश: जगताना दिसत आहेत. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेण्ट कॉर्पोरेशन आणि पुणे महानगरपालिकेनं ही ‘सायकल शेअरिंग योजना’ सुरू केली आहे.
मुख्य म्हणजे हे प्रकरण स्वस्त आणि तरुणांच्या खिशाला परवडणारं असल्यानं त्याची क्रेझही पटकन वाढली. सायकलचं भाडं किती विचारा, फक्त एक रुपया. अर्ध्या तासासाठी फक्त एक रुपये मोजले की आपण सायकल फिरवायला मोकळे.
अर्थात भाडं कमी असलं तरी बाइकप्रेमी तारुण्यांच्या जगात हे सायकलप्रेम कितपत जागं होईल याचा कुणालाच अंदाज नव्हता. म्हणूच सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही योजना फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि औंध भागात राबवण्यात आली; मात्र फार कमी कालावधीत तरुण सायकलवर स्वार झाले आणि आता हळूहळू पूर्ण शहरभर सायकल योजना राबवणं सुरू झालं आहे. पेडल कंपनीच्या या सायकल पुण्यातल्या विविध आता फिरताना दिसतात.
गरवारे कॉलेजला शिकत असलेली तेजस्विनी सध्या रोज ही सायकल वापरते. तेजस्विनी राहाते येरवड्याला. ती बसने प्रवास करते. जंगली महाराज रस्त्याला उतरते. तिथून सायकल घेते आणि कॉलेज गाठते. सकाळी कॉलेज लवकर असल्यानं व्यायाम करणं शक्य होत नाही. मग काय सायकल स्टेशनवरून सायकल घ्यायची आणि कॉलेज गाठायचं. यातून चांगला व्यायाम होतो असं तेजस्विनीचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे आपण सायकलनं आलो, ती कुठं लावायची असं काही सायकलचं लोढणं होत नाही. अनेक ठिकाणी सायकल स्टॅण्ड असल्यानं कॉलेजच्या एखाद्या जवळच्या स्टॅण्डवर सायकल लावून टाकता येते, त्यामुळे सायकल ठेवायची कुठे, असा प्रश्नही निर्माण होत नाही.
तेजस्विनीसारखंच अनेक तरुण पुणेकर सध्या व्यायामासाठी या सायकलींचा वापर करत आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी बागेत फिरायला आलं की बागेच्या बाहेरून सायकल घ्यायची आणि एक-दोन किलोमीटर फिरून यायचं असा नवा उपक्रम अनेकांनी सुरू केला आहे. शहरात काही रस्त्यांवर तर महापालिकेने सायकल ट्रॅकसुद्धा तयार केलेत. त्यामुळे पुण्यातला भयंकर ट्राफिकला न घाबरताही मनसोक्त सायकलिंग करणं सुरू झालं.
पुन्हा सायकल चालवायला काही वेळ-काळ नाही. या सायकली चोवीस तास उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक रोमॅण्टिक जीव आता रात्रीही सायकलींवरून रपेट मारू लागलेत. काहीजण तर रात्री उशिरा काम संपलं की मस्त चांदण्यात, शांत-निवांत रस्त्यावर एक सायकलचा राउण्ड मारून येतात. एकूण ज्यांना सायकलचा रोमान्स कळतो ते बिनधास्त जीव सध्या भन्नाट जगून घेत आहेत.
काही रोमॅण्टिक नसलेले जीव फिटनेस फ्रिकही असतात. त्यांना आता स्वस्तात मस्त पर्यायही सापडलाय. जिममध्ये पैसे देऊन सायकलिंग करण्यापेक्षा दोन रुपयात तासभर सायकलवर फिरून येणं त्यांना जास्त सोपं वाटतंय. मुलांपेक्षा मुली त्यामुळे जास्त सायकल वापरताना दिसतात.
एफसी, जंगली महाराज रोडवर वीकेण्डला फिरायला येणारे अनेक तरु ण-तरु णी आता आपल्या टुव्हीलर घेऊन येण्यापेक्षा रिक्षा किंवा कॅबने येतात. इथं आले की सायकल भाड्यानं घेतात. गाडी कुठं लावायची, पार्किंगची काय सोय, मामांनी गाडी उचलली तर या सगळ्याची काळजीच उरली नाही. त्यापेक्षा मस्त मित्र-मैत्रणींसोबत सायकल चालवत फिरतात. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण किती कूल आहोत हे सगळ्यांना सांगायचं म्हणून फेसबुक/ इन्स्टाग्रामवर फोटोही टाकतात. न्यू लव्ह सायकल, आॅन व्हील्स वगैरे हॅशटॅगही चिकटवतात ते वेगळेच.
मुळात काय सायकल सोय आहे, रोमान्सही आहे. आपल्याच धुंदीत जगण्याची मुभा आहे आणि निसर्गाला काहीही हानी न पोहोचवता जगण्याची एक नवीन तºहाही आहे. पुण्यातल्या स्मार्ट तारुण्याला सायकलबरोबरचा हा नवा रोमान्स आवडू लागलाय. सायकल चालवणं म्हणजे काहीतरी ‘जुनाट’, ‘गरीब’, लो क्लास अर्थात एलएस वाटण्याचा काळ होता, आता सायकल नव्या काळात स्मार्ट तर झालीच; पण आॅनलाइन अ‍ॅप वापरून मस्त सायकल फिरवू लागलेले एकदम ‘एसएस’ अर्थात हाय क्लास म्हणूनही मिरवू लागलेत..
सायकलची ही आशिकी पुण्यातल्या सळसळत्या उत्साहात नवे रंग भरतेय हे नक्की..


सायकल भाड्यानं मिळते कशी?

* www.pedl.in या साइटवर जाऊन किंवा ९ङ्मङ्मेूं१ या अ‍ॅपच्या माध्यमातून सायकल भाड्याने घेता येते.
* या साइटवर गेल्यावर जीपीएसच्या माध्यमातून जवळ उपलब्ध सायकलची व सायकल स्टेशनची माहिती मिळवता येते.
* सायकल जवळ गेल्यानंतर अनलॉक सायकल यावर क्लिक केलं की त्यानंतर सायकलवरील कोड स्कॅन करून किंवा सायकल वरील नंबर टाकून सायकल मिळवता येते.
* एखाद्या कामासाठी तुम्ही सायकल लॉक करून जाऊ शकता त्यासाठी हाताने सायकल लॉक करता येते किंवा आॅनलाइन सायकल लॉक करता येते. काम झाल्यानंतर पुन्हा अनलॉक सायकल केल्यानंतर तुमची राइड पुढे चालू राहते. एण्ड ट्रीप केल्यानंतरच ट्रीप संपते.
* सायकल वापरून झाल्यानंतर आॅनलाइन एण्ड ट्रीपवर क्लिक केलं की आपला प्रवास थांबतो. सायकल लॉक होते. त्याचबरोबर तुम्ही जितका वेळ सायकल वापरली तितके पैसे पेटीएम खात्यातून वजा होतात.
* सायकल भाड्यानं घेण्यासाठी पेटीएम अकाउंट असणं आवश्यक आहे. त्यात किमान १० रु पये असणं आवश्यक आहे.
* सायकल वापरून कुठंही सोडता येत नाही, ती सायकल स्टॅण्डलाच उभी करावी लागते.


सायकल पंक्चर झाली तर?

सायकलवर सामान ठेवण्याचीसुद्धा सोय आहे त्यामुळे सामान बाळगायचा प्रश्नही निकाली निघतो. कुठंही बिनधास्त जाता येतं; पण सायकल पंक्चर झाली तर काय? त्यावरही स्मार्ट पुणेकरांसाठी स्मार्ट सोल्यूशन शोधण्यात आलं आहे. या सायकलचे टायर टाुबलेस असल्याने त्या पंक्चर होत नाहीत. त्यात तुम्ही आॅनलाइन सायकल घेतल्यानंतरच सायकलचं लॉक उघडतं त्यामुळे चोरी होण्याचा प्रश्न नाही. एखाद्याने उचलूनच नेली सायकल तर जीपीएस यंत्रणा असल्यानं ती सायकल नेमकी कुठं आहे, हे शोधता येतं. त्यातच एखाद्या सायकलमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही एण्ड ट्रीप करताना तो प्रॉब्लेम आनलाइन नोंदवू शकता. तो नोंदवल्यावर सायकल लॉक होते. कंपनीचे लोक मग ती सायकल घेऊन जातात आणि रिपेअर करून पुन्हा त्या स्टेशनला आणून सोडतात. यासाठी मोठी यंत्रणा काम करते.

( राहुल लोकमतच्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आहे.)

Web Title: Smart Cycle Sharing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.