काठीची तलवार करणारा ‘छत्रपती’!

By समीर मराठे | Published: March 23, 2019 05:40 PM2019-03-23T17:40:45+5:302019-03-23T17:59:05+5:30

लहानपणापासूनच अक्षयला खेळाची खूप आवड. इतकी, की पालकांनी घरात कोंडल्यावर खिडकीच्या बारीक गजांतूनही तो पसार व्हायचा. तलवारबाजीची आवड लागल्यावर तलवार नव्हती, तर काठीचीच तलवार करून खेळला, पण जिद्द सोडली नाही. राष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलं. नव्या ध्येयासाठी तोे आता सज्ज झाला आहे.

shri shiv chhatrapati award winner Akshay Deshmukh shares his struggle, journey in fencing | काठीची तलवार करणारा ‘छत्रपती’!

काठीची तलवार करणारा ‘छत्रपती’!

googlenewsNext
ठळक मुद्देश्री शिवछत्रपती पुरस्कार - पुरस्कारांची रक्कम जमा करून परदेशात प्रशिक्षणासाठी जाऊ पाहणाऱ्या अक्षय देशमुखचं स्वप्न आहे ऑलिम्पिक खेळण्याचं..

- समीर मराठे
नाशिक जिल्ह्यातल्या भाऊसाहेबनगरसारख्या एका खेड्यात वाढलेला मुलगा. खेळाची आणि खेळायची प्रचंड आवड. जो खेळ दिसेल, खेळायला मिळेल, तो आपल्याला चांगला आलाच पाहिजे, अशी खुमखुमी.
अशातच तलवारबाजी खेळाशी त्याची ओळख झाली. पण हाती कुठलीही साधनं नव्हती. कोणाचं फारसं मार्गदर्शन नव्हतं. ज्या साधनानं खेळायचं, ती ‘तलवार’ही त्याच्याकडे नव्हती. मग त्यानं काठीचीच तलवार केली. ही काठीच तलवार समजून तो प्रॅक्टिस करायचा. काठीची तलवार करणारा हा जिद्दी खेळाडू आज राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी स्पर्धेत नाव कमावतो आहे.
अक्षय देशमुख त्याचं नाव. त्याच्या याच कर्तबगारीमुळे महाराष्ट्र शासनाच्या श्री शिवछत्रपती पुरस्कारानं त्याला नुकतंच गौरवण्यात आलंय.


अक्षय सांगतो, आजूबाजूला खेळाचं फारसं वातावरण नसलं तरी मला खेळायला फार आवडायचं. जो दिसेल तो खेळ मी खेळायचो. शाळेतून घरी आलो, दप्तर फेकलं की मित्रांबरोबर मैदानावर! कबड्डी, खो खो, थ्रो बॉल.. असे अनेक खेळ मी शिकलो, पण तलवारबाजीशी माझी ओळख झाली आणि मग या खेळाच्या मी प्रेमातच पडलो..
अक्षयचे आई-वडील दोन्ही शिक्षक. खेळायला त्यांचा विरोध नसला तरी अभ्यासावर त्यांचा भर होता. अक्षयचे वडील ड्यूटीसाठी घराबाहेर पडताना त्याच्यासाठी पाटीवर सूचना लिहून जायचे.. बाहेर फिरू नकोस, अभ्यास कर, जेवण कर.. वगैरे.. पण यातली कुठलीच सूचना अक्षयनं फारशी कधी मनावर घेतली नाही.
अक्षयचं अभ्यासात लक्ष नाही, मित्रांसोबत सारखा बाहेरच असतो, म्हणून नंतर अक्षयच्या वहिलांनी ते ड्यूटीवर जाताना अक्षयला घरात ठेवून खोलीला कुलूप लावून जायला सुरुवात केली.
पण त्यावरही अक्षयने उपाय शोधून काढला. झाडावर चढणं, चिंचा पाडणं, मैदानावर रनिंग करणं, वेगवेगळे खेळ खेळणं.. यामुळे त्याचं अंग चांगलंच लवचिक झालं होतं. त्यामुळे वडील जरी खोलीला कुलूप लावून गेले असले तरी तो खिडकीच्या बारीक गजांतून बाहेर पडायचा, मनसोक्त खेळायचा आणि वडील घरी यायच्या वेळेत पुन्हा खिडकीच्या गजांतून आत घुसून घरात हजर असायचा!
भाऊसाहेबनगरच्या कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यालयात शिकत असताना अशोक दुधारे सरांमुळे त्याच्या खेळात लक्षणीय बदल झाला. ते तिथे स्पोर्ट्स टिचर होते. राहायचे नाशिकला, पण रोज अपडाऊन करायचे. तरीही खेळाच्या प्रेमापोटी ते शाळा सुरू होण्याच्या आधी आणि नंतरही मुलांची प्रॅक्टिस घ्यायचे.
आईची बदली नाशिकला झाल्यामुळे २००८मध्ये अक्षय नाशिकला आला. मराठा हायस्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घेतली, पण अक्षयला पाहिजे होतं सेमी इंग्लीश. ते न मिळाल्यामुळे तो खूपच नाराज झाला. पण वडिलांनीच त्याला समजावलं, ‘अरे, तुला सेमी इंग्लीश मिळालं नाही, हे चांगलंच झालं. त्यासाठी तुला जास्त अभ्यास करावा लागला असता. खेळायला मिळालं नसतं. तुला खेळायला आवडतं ना, मग त्यासाठी तुला आता जास्त वेळ मिळू शकेल. अभ्यासात जास्त वेळ गेला, तर प्रॅक्टिस कशी करशील? जे झालं ते चांगलंच झालं..’
प्रत्येक टप्प्यावर वडिलांनी असं समजून घेतलं, त्याला कायम प्रोत्साहन दिलं, याचा अक्षयला फारच अभिमान वाटतो.
दहावीत असताना अजिंक्य दुधारेला अक्षय पहिल्यांदा भेटला. अजिंक्य हा दुधारे सरांचा मुलगा. उत्तम तलवारबाजपटू. नुकताच तो एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपला मेडल घेऊन आला होता. त्याच्याशी अक्षयची चांगली दोस्ती झाली. त्याच्याबरोबर खेळायला मिळालं, त्याचं मार्गदर्शन मिळालं आणि खूप काही शिकायलाही मिळालं.
अक्षय सांगतो, माझ्या यशात अजिंक्यदादाच्या मार्गदर्शनाचा खूप मोठा वाटा आहे.
शालेय शिक्षण संपल्यानंतर अक्षयनं डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेतली. पण खेळाचं वेड डोक्यात घुसलेलं असल्यानं त्याचं अभ्यासाकडे कायम दुर्लक्ष झालं. अनेकदा विषय राहिले. शिक्षकाचा मुलगा असूनही ‘नापास’ होतोस म्हणून बऱ्याचदा अनेकांनी हिणवलं, आाईवडिलांना वाईट वाटायचं, मात्र त्याबद्दल त्यांनी त्याला कधीच बोल लावले नाहीत कि खेळणं सोडून फक्त शिक्षणाकडेच लक्ष दे म्हणून त्याच्यावर दबाव आणला नाही.
अक्षय म्हणतो, अनेक घरांत याच्या नेमकी उलट स्थिती असते. माझ्या पालकांनी मला खेळू दिलं, म्हणूनच मी खेळात प्रगती करू शकलो.
खेळातली प्रगती बघून नंतर अशोक दुधारे सरांनी अक्षयला पतियाला, पंजाब येथे जाऊन प्रॅक्टिस करायचं सुचवलं. त्यानुसार अजिंक्य आणि अक्षय दोघंही पंजाबला गेले. तिथल्या खेळाडूंबरोबर त्यांनी प्रॅक्टिस केली. दोघांनी मिळून भाड्याची रुम घेतली. आर्थिक परिस्थितीमुळे आणि बाहेरचं खाणं कसं असेल, म्हणून दोघं मिळूनच रुमवर स्वयंपाकही करायचे. पण इथल्या प्रशिक्षणाचा त्यांना खूप फायदा झाला.
बाहेरदेशांत जाऊन सराव करायचा, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवायचा, हे अक्षयचं स्वप्न होतं. ही संधीही लवकरच चालून आली.
याबाबतचा अनुभव सांगताना अक्षय म्हणतो, त्या दिवशी अचानक अजिंक्यदादाचा फोन आला, मी सरावासाठी बुडापेस्टला (हंगेरी) चाललोय. तू पण येतोस का? मी त्याला सांगितलं, घरी विचारून सांगतो. वडिलांना फोन केला.. त्यांना सांगितलं, माझ्यासाठी संधी चालून येतेय, पण किमान अडीच लाख रुपयांचा खर्च येईल. काय करायचं? वडिलांनी तत्काळ सांगितलं, अजिंक्यदादाला तिकिट बुक करायला सांग, खर्चाचं आपण कसंही जमवू... तो क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता..
त्यानंतर अक्षय आणि अजिंक्य दोघंही बुडापेस्टला सरावासाठी गेले. नव्या वातावरणात अक्षय आधी दबावाखाली होता. घाबरत घाबरत खेळायचा. पण अजिंक्यनं त्याला हिंमत दिली. वातावरणबदलाचाही संघर्ष मोठा होता. खूप थंडी होती. कायम बर्फ पडायचा. खाण्याचेही प्रॉब्लेमच होते. भारतीय खाद्यपदार्थ मिळायची तिथे मारामार होती आणि तिथलं अन्न खाल्लं जात नव्हतं. मग बऱ्याचदा अंडी आणि ब्रेडवरच भागवावं लागायचं. डाएट कमी पडत असल्यानं त्यांची ताकदही कमी पडायची. पण जिद्दीच्या जोरावर त्यांनी त्यावर मात केली.
तिथल्या अनुभवाबद्दल अक्षय सांगतो, इथे आल्यावर आमच्या लक्षात आलं, इथल्या खेळाडूंपेक्षाही आपल्याकडे जास्त हुनर आहे, जिद्द आहे, आपल्याकडे फॅसिलिटीजची फक्त कमतरता आहे, अन्यथा आपण या खेळाडूंपेक्षा कुठेही कमी नाही. तिथल्या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंनाही आम्ही अतिशय स्ट्रॉँग फाइट द्यायचो. त्यामुळे तिथले कोचही खूप प्रभावित झाले. त्यांनीही सांगितलं, तुम्ही पुन्हा जास्त कालावधीसाठी इथे या. आॅलिम्पिकसाठी नक्कीच क्वॉलिफाय व्हाल..
अक्षयचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. आपल्यातल्या कमतरता त्याला माहीत आहेत, तशा जमेच्या बाजूही. अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांबरोबर तीन अंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभवही त्याच्या गाठीशी आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा चान्स तसा त्याला बºयाच वेळा आला, पण पैशांच्या अभावी त्याला जाता आलं नाही. त्याचा प्रवास अजूनही सुरूच आहे. या प्रवासात त्याच्या शिक्षिका निर्मला चौधरी, दुधारे सर, अजिंंक्य, अक्षयचे पालक, पंकज मोहन सर, सोबती, मित्रपरिवार, नातेवाईक या साऱ्यांची त्याला खूप मदत झाली. मला कायम त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल, असं तो आवर्जुन नमूद करतो.
या साऱ्याच प्रवासात अक्षयला अनेक चढउतार पाहायला लागले. पण त्याविषयी त्याला खेद नाही. आयुष्यात असे प्रसंग येणारच, त्यावर मात करत पुढे गेलो तरच यशस्वी होऊ हे त्याला उत्तमपणे माहीत आहे. अक्षयची नजर आता आॅलिम्पिकवर आहे, पण त्यासाठी आणखी कठोर मेहनत, परदेशी कोचकडून प्रशिक्षण.. या साºयाची आवश्यकता आहे. त्याचीही तजवीज तो स्वत:च करतोय. नॅशनल स्पर्धा खेळल्यानंतर नुकतेच मिळालेले दीड लाख रुपये, आत्ताच छत्रपती पुरस्कारासोबत शासनानं दिलेले एक लाख रुपये आणि घरच्यांची मदत घेऊन जास्त काळासाठी बुडापेस्टला जाण्याची तयारी तो करतोय. तिथे उत्तम प्रशिक्षण तर मिळेलच, शिवाय महिन्याला किमान एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळेल, त्या पॉइंट्सचा उपयोग ऑलिम्पिक क्वॉलिफाय होण्यासाठी होऊ शकेल, ऑलिम्पिकचं ध्येय कठीण जरूर आहे, पण अशक्य मात्र निश्चितच नाही, असं अक्षय सांगतो. सध्या त्याच ध्येयानं त्याचा प्रवास चालू आहे..
(लेखक लोकमत वृत्तसमुहात उप वृत्तसंपादक आहेत.)
sameer.marathe@lokmat.com

क्रमश:
श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा आणखी मजकूर वाचा याच ठिकाणी..
http://www.lokmat.com/oxygen/ वर..

Web Title: shri shiv chhatrapati award winner Akshay Deshmukh shares his struggle, journey in fencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.