आदिवासींच्या बुडग्या, हलत्या दातांची डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 05:58 PM2017-07-28T17:58:42+5:302017-07-28T18:35:44+5:30

दातांची डॉक्टर झाले. पुण्यात आयुष्य तसं मजेतच सुरू होतं. पण माझ्यासमोर प्रश्न होता की, मूठभर सधन लोकांसाठी काम करायचं,

oxygen | आदिवासींच्या बुडग्या, हलत्या दातांची डॉक्टर

आदिवासींच्या बुडग्या, हलत्या दातांची डॉक्टर

- डॉ. चेतना सोयाम

दातांची डॉक्टर झाले.
पुण्यात आयुष्य तसं मजेतच सुरू होतं.
पण माझ्यासमोर प्रश्न होता की,
मूठभर सधन लोकांसाठी काम करायचं,
की जिथं दंतआरोग्याची खरी गरज आहे
तिथं जायचं?
निर्णय झाला आणि मी गडचिरोलीला आले.
आता गावागावांत जाऊन
दात दुखणाºया माणसांना भेटते
तेव्हा कळतं की, बदल घडवायचा असेल
तर आपणच काहीतरी करायला हवं..

मी दातांची डॉक्टर. पुण्यात प्रायव्हेट प्रॅक्टिस करताना जाणवलं की, अलीकडे शहरांमध्ये डेण्टल क्लिनिक्स खूप ग्लॅमरस होत चालले आहेत. एकमेकांच्या स्पर्धेत सुशोभिकरण, झगमगाट वाढले आहेत. याचा परिणाम थेट रुग्णांना सांगितल्या जाणाºया उपचाराच्या किमतीवर होतो. त्यातही जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तेच दंत आणि मुख आरोग्याबाबत जागरूक दिसतात. बरेच लोक जमेल तितके दिवस दुर्लक्ष/सहन करतात आणि दातदुखी सहन करण्यापलीकडे गेली कीउपचाराला येतात.
माझ्यासमोर मात्र प्रश्न होता, फक्त सधन मूठभर लोकांसाठी सुविधा पुरवण्यापेक्षा याच सुविधा इतर लोकांपर्यंत कमी खर्चात कशा पुरवता येतील?
त्याच काळात मला सरकारी नोकरीची संधी मिळाली. भारतीय वायुसेना, लोहगाव, पुणे येथे. इथे येण्यासाठीची परीक्षा सोडली तर बाकी जॉब कम्फर्ट झोनमधला होता. या नोकरीमध्ये मान-सन्मान, आर्थिक सुबत्ता होती. पण माझं मन रमत नव्हतं.
माझे आजोबा स्वातंत्र्यसंग्रामात, विनोबांसोबत भूदान यज्ञात सहभागी होते. त्यामुळे आपलं समाजाला काही तरी देणं आहे, शेवटच्या माणसासाठी काम करायला हवं या गोष्टीचं भान आधीपासूनच होतं. या शेवटच्या माणसासाठी सध्या कोण काम करत आहे हे शोधण्याच्या प्रयत्नात डॉ. बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांची जवळून ओळख झाली आणि ते माझे प्रेरणास्थान झाले.
याच दरम्यान मी ‘निर्माण’मध्ये आले. निर्माणने मला स्वत:कडे बघायला, स्वत:चा पाठपुरावा करायला शिकवलं. काम करत असताना माझ्या मनात काय विचार येतात, कसली घालमेल होते याचा विचार करता आला. एखाद्या सामाजिक प्रश्नावर काम करण्याचा निर्णय भावनिक असू शकतो, पण जेव्हा प्रत्यक्ष काम करायला लागतो तेव्हा भावनिकतेच्याही पुढे जाऊन निर्णय घ्यावे लागतात हे शिकवलं. तेव्हा मला वाटलं की ‘रिटायरमेंटनंतर मी किती बदल घडवू शकेन? रिटायरमेण्टपर्यंत मी राहते की नाही हे कोणाला माहिती? कामाला सुरुवात आत्तापासूनच करायची. आणि पुणे सोडून गडचिरोलीला येण्याचं ठरवलं.
मीडियाने आपल्यासमोर रंगवलेली गडचिरोली तशी भीतिदायक आणि नकारात्मक आहे, फार सुखावह नाही. जेव्हा पुणे सोडून गडचिरोलीला येण्याचं ठरलं तेव्हा मित्र-मैत्रिणींनी आणि ओळखीच्या लोकांनी सीमेवर सैनिक लढायला जातो तशा भावना व्यक्त केल्या. काहींनी तर घरी जेवायला बोलवलं कारण म्हणे काय माहीत तू परत कधी दिसशील का?
गेली दोन वर्षे मी ‘सर्च’मध्ये डेंटिस्ट आणि ओरल हेल्थ आॅफिसर म्हणून कार्यरत आहे. सध्या सर्चमध्ये डेण्टल क्लिनिक नियमितपणे सुरू आहे, आदिवासी गावांमध्ये दातांचा फिरता दवाखाना सुरू झाला आहे, शाळा कार्यक्र म, बचतगटांच्या स्त्रियांसोबत मुख कर्करोग तपासणी कार्यक्र म, दंत आणि मुख शस्त्रक्रिया शिबिर सुरू झाले आहे.
आदिवासी गावांमध्ये डॉक्टर असतात हे लोकांना माहिती होतं; पण दातांचे डॉक्टर ही संकल्पना नवीन होती. अशा प्रकारचा फिरता दवाखाना गावात येण्याची पहिलीच वेळ होती. सुरुवातीला कोणाला तरी तोंड उघडून दाखवण्यासाठी त्यांना संकोच वाटे. दात तपासण्याचं साहित्य हातात घेतलं की ते खुर्चीवरून ताडकन उठून जात. म्हणून मग त्यांची सुरुवातीला तपासणी फक्त टॉर्च लाईट वापरून केली. जसा गावांशी संपर्कवाढला तसं लोक आता डेण्टल चेअरवर बसून तपासणी आणि उपचार करून घेतात. अजूनही काहींना ‘काय माहिती काय तपासतात?’ असं वाटतं.
या भागामध्ये तंबाखू आणि खर्रा वापराचं प्रमाण खूप जास्त आहे. ५-६ वर्षाच्या मुलांपासून ते ८० वर्षांच्या म्हाताºयांपर्यंत सगळेच ते खातात. कार्यक्रमात मानपान म्हणून खर्रा दिला जातो. तो ‘मान’ त्याला ‘नाही’ म्हणता येत नाही. त्यामुळे बहुतांश मुखरोग या सवयींशी निगडित आहेत आणि त्याचे प्रमाणही प्रचंड आहे.
प्रायव्हेट क्लिनिकमध्ये पेशंट गुगलवर सगळं वाचून यायची आणि माझी उत्तरं त्यांच्या ज्ञानाशी जुळतात का हे पडताळून बघायची. हे करण्यापेक्षा शास्त्र न समजणाºया लोकांना समजून सांगण्यात मला खूप समाधान आणि आनंद मिळतो. रोज गाड्यांच्या गर्दीत आपली गाडी घुसवायची आणि जीव मुठीत घेऊन वेळेत क्लिनिकमध्ये पोहोचायचं आणि जो माझ्या दारात येईल त्याचाच इलाज करायचा, यापेक्षा रोज दोन वेगवेगळ्या गावांत जायचं, तिथल्या लोकांना एकत्र आणायचं, त्यांना समजावून तपासणी करायची आणि गरज असलेले उपचार द्यायचे, हे आव्हान मला जास्त आवडतं.
मी जेव्हा त्यांना ‘दात का दुखतो?’ किंवा ‘दात हलतो का?’ असं विचारते तेव्हा ‘माणूस बुडगा होते तसा दात ई बुडगा होते अन् माणूस मरते तसा दात ई पडते जी’ असं उत्तर मिळतं. तेव्हा मी शिकलेलं शास्त्र त्यांच्या प्रश्नांचं निरसन करताना कमी पडतं का? हा संभ्रमही होतो. इथे काम करताना माझ्या लक्षात आलं की कुठल्याही समस्येवर अभ्यास करून किंवा त्यावर भाष्य करून आपण काही बदलू शकत नाही, जे काही बदल घडवायचे आहे ते त्यांच्या सोबत राहूनच घडवता येतात.
त्यासाठीचा एक प्रयत्न सध्या मी करते आहे.

‘निर्माण’मध्ये सहभागी व्हायचंय?


@‘निर्माण’च्या या प्रवासात आजवर आपण अनेक मित्रांना भेटलो. त्यांनी ‘कर के देखो’ हा मंत्र वापरून आपल्या जगण्याचं ध्येय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.
तुम्हाला पडत असतील असेच काही प्रश्न? शिक्षण - नोकरी - निवृत्ती याहूनही वेगळं जगण्यात असं काही असतं का? काय केलं म्हणजे आपण आयुष्यात सेटल झालो? पैसे कमवण्यापलीकडे आपल्या आयुष्याचं काही ध्येय असू शकतं का? आपल्या कौशल्यांचा व क्षमतांचा उपयोग करून आपण समाजातले प्रश्न कसे सोडवू शकू?
- असे अनेक प्रश्न तुम्हालाही छळतात का?

मग निर्माण तुमची वाट पाहत आहे..
महाराष्ट्रातील अस्वस्थ युवांनी आपल्याला पडणाºया प्रश्नांचा कृतिशील शोध घ्यावा यासाठी सुरू केलेली शिक्षणप्रक्रि या म्हणजे निर्माण!
निर्माणची आठवी बॅच येत्या जानेवारीमध्ये सर्च, गडचिरोली येथे सुरू होत आहे. यामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर ही वेबसाइट पाहा..
http://nirman.mkcl.org 
या वेबसाइटवर जा. प्रवेश अर्ज डाउनलोड करा. आणि भरून त्वरित निर्माणला पाठवा. पूर्ण भरलेला फॉर्म निर्माणला nirmaanites@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावा. किंवा पोस्टाने सर्च, गडचिरोली-४४२६०५ या पत्त्यावर पाठवावा. व्हॉट्सअ‍ॅप करू नये.
प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख
१५ आॅगस्ट २०१७ ही आहे !!

अधिक माहितीसाठी- ६६६.ल्ल्र१ेंल्ल.े‘ू’.ङ्म१ॅ
ही वेबसाइट पहा.

Web Title: oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.