जाणत्या वाघोबाची दोस्त

By अोंकार करंबेळकर | Published: April 12, 2018 10:07 AM2018-04-12T10:07:26+5:302018-04-12T10:07:26+5:30

ती पर्यावरणशास्त्र शिकली आणि थेट जंगलात आणि जंगलालगतच्या माणसांत कामासाठी निघून गेली. माणसं आणि वन्यप्राणी यांचं भांडण न होता, दोस्ती कशी होईल, यासाठी ती सध्या काम करते आहे.

Mrunal Ghosalkar, wildlife enthusiast working for awareness in Nashik , wise big cat | जाणत्या वाघोबाची दोस्त

जाणत्या वाघोबाची दोस्त

Next

घरापासून दूर राहून काम करायचं, ते काम काय तर लोकांना वन्यजीवांची माहिती द्यायची, त्याविषयी जनजागृती करायची, आणि तेही एका मुलीनं. हे सारं ऐकून अनेकांचे कान टवकारतात. मृणाल घोसाळकरला हे सारं नवं नाही. ती आपलं काम मनापासून शांतपणे करताना दिसते. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडीज आहे. तिथं जाणता वाघोबा प्रकल्पासाठी सध्या मृणाल काम करते आहे. मुंबई विद्यापीठात पर्यावरणशास्त्रामध्ये तिनं पदव्युत्तर पदवी घेतली. मग सुरू झाला नोकरीसाठी शोध; पण एका जागी बसून काम करण्याच्या नोकरीऐवजी काहीतरी नवं, साहसी करण्याचं तिनं ठरवलं. तशी संधी मिळाली म्हणून ती नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशनतर्फे हॉर्नबिल पक्ष्याच्या अभ्यासासाठी ईशान्य भारतात जाऊ लागली. त्यानंतर अरुणाचल प्रदेशात पाके व्याघ्र प्रकल्पामध्ये तिनं काम केलं. तिथल्या स्थानिक निशी जमातीतील लोक, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर अहवाल तयार करण्याचं हे काम होतं. पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर पुणे जिल्ह्यातल्या सुपे तालुक्यातील मयूरेश्वर अभयारण्यात तिनं काम सुरू केलं. येथे पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये धनगर आपल्या बकऱ्या, मेंढ्या, कुत्रे घेऊन राहायला येतात. कधी कधी अभयारण्यातील गवताळ प्रदेशातही त्यांचं जाणं होतं. त्यामुळे तयार होणाºया समस्या शोधणं आणि त्यावर उपाय सुचवण्यासाठी तिनं थेट तिथंच अभ्यासाला जायचं ठरवलं. तिथल्या एका मेंढीपालक कुटुंबात सलग तीन महिने राहण्याचा निर्णय घेतला. त्यांची राहणी, काम याचा जवळून अभ्यास केला.

अरुणाचल प्रदेशामध्ये निशी लोकांसोबत आणि नंतर सुप्यामध्ये धनगर समुदायाबरोबर काम केल्यानंतर स्थानिक लोक आणि वन्यजीव यासंदर्भातले प्रश्न, अडचणी याची तिला जाणीव झाली. जंगलं, अभयारण्यं यांच्या जवळच्या प्रदेशात राहणा-या लोकांवर होणारे वन्यप्राण्यांचे हल्ले, त्या प्राण्यांच्याही जिवाला होणारा धोका असा परस्पर सहजीवनाचा संघर्ष कसा सोडवायचा, याबाबतीतील माहिती ती अनुभवातून जोडत होती. यातूनच पुढे ती सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडीजच्या जाणता वाघोबा या प्रकल्पात काम करू लागली. गेली अनेक वर्षे बिबट्या मानवी वस्तीत येणं किंवा शेतामध्ये, येण्या-जाण्याच्या वाटेवरती येण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वारंवार बिबट्या दिसण्याच्या प्रदेशात तिनं काम करायचं ठरवलं. पुणे जिल्ह्यात जुन्नरमध्ये त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आणि आता नाशिकच्या निफाड तालुक्यात तिचं काम सुरू आहे.

एखाद्या वस्तीमध्ये बिबट्या घुसला की त्याची मोठी बातमी होते, त्यानं जनावरांवर हल्ला केला तर त्याच्या मोठ्या बातम्या प्रसिद्ध होतात. त्यामुळे तेथील लोकांच्या बाबतीत हा प्रश्न मोठा संवेदनशील होतो. अशा प्रदेशातील लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याबरोबर काम करणं अत्यंत आव्हानात्मक असतं. खरं तर बिबट्या हा प्राणी माणसाला घाबरणारा आहे. त्याचा एका ठरावीक क्षेत्रात वावर असतो. बिबट्याच्या मादीबरोबर त्याची पिलं एक-दोन वर्षे राहतात आणि ती पिलं नवा प्रदेश शोधेपर्यंत मादी नव्या पिलांना जन्म देत नाही. माणसांवर झालेले हल्ले हे अनवधानाने किंवा कोणीतरी त्रास दिल्यामुळे होतात अशी माहिती ती निफाडच्या गावागावांत जाऊन देते. लहान मुलांनी शाळेत जाताना, शेतात जाताना, संध्याकाळी फिरताना काय काळजी घ्यावी, रात्री शेतात मोटर सुरू करण्यास जाताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत ती लोकांना सूचना देते. ‘जेथे कचरा तेथे कुत्रा आणि कुत्रा तेथे बिबट्या’ असं समीकरण असल्यामुळे लोकांना आजूबाजूचे प्रदेश स्वच्छ ठेवण्यासही ती सांगते. हे सगळं काम गावागावांतील ग्रामपंचायती आणि शाळांमध्ये जाऊन केलं जातं. काही गावांमध्ये कॉलेजमध्ये जाणाºया मुलांना निवडून त्यांच्यामध्ये बिबट्यादूत तयार करण्यात आले. त्यांना बिबट्याची सर्व माहिती देऊन प्रशिक्षित करण्यात आलं आहे. ही मुलं चित्रांच्या आणि माहितीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरात जाऊन बिबट्याबद्दल लोकांना साक्षर करतात. त्यामुळे स्थानिकांना बिबट्याच्या सवयी कळतात. त्याचे हल्ले होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्याची माहिती मिळते. काही मुलांनी कॉलेजमधला पर्यावरण प्रकल्प म्हणूनसुद्धा बिबट्यादूत होण्याचं काम केलं. अशा प्रकारचं लोकशिक्षण देण्यासाठी तिला वनखात्यातर्फे सहकार्यही मिळतं. बिबट्याच्या समस्येवर स्थानिक उपाय लोकच काढू शकतात, असा तिला विश्वास वाटतो.
मृणाल म्हणते, शहरी भागात बिबट्या आल्या की त्याच्या मोठ्या बातम्या होतात. अशा बातम्यांनी लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. बिबट्या वस्तीत का आला किंवा त्यानं हल्ला का केला, या कारणांचा शोध घेतला तर हे प्रश्न अधिक लवकर सुटतील आणि माणसाचा त्रास कमी होईल.’

( ओंकार लोकमत आॅनलाइनमध्ये उपसंपादक आहेत. onkark2@gmail.com )

Web Title: Mrunal Ghosalkar, wildlife enthusiast working for awareness in Nashik , wise big cat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.