मिलेनिअम व्होटर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 02:30 PM2018-01-24T14:30:28+5:302018-01-25T09:05:59+5:30

तुम्ही जर या सहस्त्रकातले मतदार असाल तर निवडणूक आयोग तुमच्याच शोधात आहे!

Millennium Voters! | मिलेनिअम व्होटर्स!

मिलेनिअम व्होटर्स!

Next

आजच्या राष्ट्रीय मतदारदिनी  व्हा गौरवाचे मानकरी!

तुमचं वय काय?..
तुमच्या वयाची वास्तपूस्त अशासाठी, की तुम्ही जर आपल्या वयाची १८ वर्षे नुकतीच पूर्ण केली असलीत, तर तुम्ही मोठे भाग्यवान आहात! कारण त्यामुळे या सहस्त्रकातले तुम्ही पहिले मतदार असू शकाल आणि या सहस्त्रकातली लोकशाहीची धुरा पुढे नेण्यातला तुमचा वाटाही अर्थातच खूप मोठा असेल...
१८ वर्षांपूर्वी म्हणजेच १ जानेवारी २००० रोजी आपण नव्या सहस्त्रकात प्रवेश केला. हा हजार वर्षांचा कालखंड मागं सारून आज १८ वर्षे उलटल्यानंतर त्याची आठवण येण्याचं कारणही तसं खास आहे. भारतात मतदानाचा अधिकार वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळतो. त्यानुसार १९ व्या सहस्त्रकातून २० व्या सहस्त्रकात प्रवेश केल्यानंतर १ जानेवारी २००० साली ज्यांचा जन्म झाला, त्यांच्या वयाची १८ वर्षे यंदा १ जानेवारी २०१८ रोजी पूर्ण झाली आहेत. म्हणूनच या सहस्त्रकात जन्माला आलेले ते पहिले मतदार अर्थात ‘मिलेनिअम व्होटर’ ठरले आहेत.
तुम्ही जर ‘मिलेनिअम व्होटर’ असाल, तर सध्या निवडणूक आयोगही खास तुमचाच शोध घेत आहे. येत्या २५ जानेवारीला म्हणजेच ‘राष्ट्रीय मतदारदिनी’ सहस्त्रकातल्या या ‘पहिल्या’ मतदारांचा गौरव होणार आहे. निवडणूक आयोगाला याच मिलेनिअम व्होटर्सच्या माध्यमातून लोकशाहीची मुळं अधिक बळकट करायची आहेत.
‘मतदार’ असणं हा लोकशाही प्रक्रियेतील पहिला मूलभूत अधिकार आहे आणि हा अधिकार या वर्षी हजारो नवतरुणांना मिळणार आहे. तो त्यांनी घेतलाच पाहिजे.
मतदानाचा हा लाखमोलाचा अधिकार कितीजण बजावतात, हे मात्र मोठं कोडं आहे. राज्य निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते, एकूण मतदारांत १९ वर्षांखालील मतदारांची संख्या फक्त १ लाख ८१ हजार ६ इतकी आहे. त्या तुलनेत १९ ते २० वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या ३ लाख ८७ हजार ४५४ म्हणजेच दुप्पटीहून अधिक आहे. याचाच अर्थ वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तत्काळ मतदार नोंदणी करणाºया तरुणांची संख्या तुलनेनं खूपच कमी आहे.
तरुणांतील हीच उदासीनता दूर करण्यासाठी निवडणूक आयोगानं नवनवीन संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मिलेनिअम व्होटर्स’चा शोध घेताना प्रशासनानं जिवाचं रान केल्याचं दिसतंय.
मिलेनिअम व्होटर्सच्या शोधाची ही कहाणीही मोठी रंजक आहे. या शोधाची सुरुवात झाली ती जन्म-मृत्यू दाखल्याच्या कार्यालयांपासून.
१ जानेवारी २००० रोजी जन्माची नोंद असलेली जन्म-मृत्यू दाखला कार्यालयांतील सर्व कॅटलॉग्ज धुंडाळण्यात आली. त्यानंतर मुख्य प्रश्न होता, तो त्यावेळी जन्माला आलेल्या मतदाराच्या आजच्या वास्तव्याचा.
बहुतेक ‘मिलेनिअम व्होटर्स’चा पत्ता बदलला होता. अधिकारी व कर्मचारी ‘मिलेनिअम व्होटर्स’चा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते; मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे फक्त शोध घेऊन न थांबता, त्यांच्या मतदार नोंदणीची जबाबदारीही प्रशासनानं खांद्यावर घेतली.
त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती न करता हे शिवधनुष्य प्रशासनानं लीलया पेललं. म्हणूनच आजघडीला प्रशासनानं राज्यातून तब्बल २ हजार ६०० ‘मिलेनिअम व्होटर्स’ना शोधून काढलं आहे. त्यात सुमारे पावणेचारशे ‘मिलेनियम व्होटर्स’ मुंबई उपनगरातील आहेत.
तुम्ही आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केली असतील आणि अजूनही आपण मतदार नोेंदणी केली नसेल, तर तातडीनं ही नोंदणी करा आणि व्हा ‘मिलेनिअम व्होटर्स’!
आजच्या राष्टÑीय मतदार दिनानिमित्त मुंबईतील जयहिंद महाविद्यालयात एक विशेष कार्यक्र म होणार आहे. मुंबई शहरातील‘मिलेनिअम व्होटर्स’ना यावेळी गौरवण्यात येणार असल्याचं येथील उपजिल्हाधिकारी अर्चना सोमाणी-आरोलकर यांनी सांगितलं.
हेच मिलेनियम व्होटर्स भविष्यात युवकांसाठी एक प्रकारे ‘मतदारदूत’ म्हणून वावरतील आणि आपल्याप्रमाणेच इतरांनाही वयाच्या अठराव्या वर्षीच मतदार करून लोकशाहीचे पहारेकरी बनवतील, असाही प्रशासनाचा मानस आहे.

तुम्ही ‘मिलेनिअम व्होटर्स’ असाल तर..
तुम्ही जर मिलेनिअम व्होटर्स असाल तर आपल्या नजीकच्या तहसील कार्यालयात किंवा निवडणूक कार्यालयात जाऊन आपली मतदार नोंदणी अवश्य करा. त्यासाठी मतदार नोंदणीचा अर्ज क्र मांक ६ भरावा. एक खबरदारी मात्र घ्या, त्यासाठीची आवश्यक ती कागदपत्रं सोबत घेऊन जा.

कशी कराल मतदार नोंदणी?
गूगलवर जाऊन चीफ इलेक्टोरल आॅफिसर महाराष्ट्र या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाइन नोंदणी करता येते.
या संकेतस्थळावर प्रत्येक मतदाराच्या मदतीसाठी ‘व्होटर्स हेल्प सेंटर’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तिथं आपला निवासी पत्ता असलेला जिल्हा सिलेक्ट केल्यास मतदार नोंदणीसाठी विधानसभानिहाय अधिकाºयांच्या कार्यालयाचे पत्ते व फोन नंबर्स उपलब्ध आहेत. यंदाच्या ‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त मतदार नोंदणी करून आपणही नक्कीच होऊ शकता ‘मिलेनिअम व्होटर’!

नवी संकल्पना
मतदार नोंदणी आणि मतदानासंदर्भात युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही नवीन संकल्पना आयोगानं पुढं आणली आहे. अशाप्रकारे पुढील वर्षीही १ जानेवारी २०१९ साली वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया मतदारांसाठी नवा उपक्रम घेऊन प्रशासन हजर होणार आहे. त्यासाठी युवा पिढीनंही पुढाकार घेण्याची गरज आहे. युवा पिढी स्वत:हून मतदार नोंदणीसाठी पुढं येणं ही लोकशाही सक्षमीकरणाची महत्त्वाची पायरी आहे.

राज्यातील तरुण मतदारांची आकडेवारी
वयोगट मुले मुली इतर
१८ वर्षे पूर्ण १,१५,१६३ ६६८३७ ६
१९ वर्षे पूर्ण २,३७,२३९ १,५०,२०६ ९
२० वर्षे पूर्ण ४,८५,९६८ ३,१०,१३२ ३७

(चेतन लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)
 

Web Title: Millennium Voters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.