3 वर्षे 3 दिवस आणि 35 देश अशी सफर करणाऱ्या विष्णुदास चापकेला भेटा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:26 PM2019-03-28T13:26:05+5:302019-03-28T16:55:29+5:30

35 देश फिरून नुकताच भारतात परतलेला विष्णुदास चापके सांगतोय, आयुष्य बदलून टाकणार्‍या जगभ्रमंतीतले अनुभव.

Meet Vishnudas Chapke who traveled 3 years 3 days and 35 countries. | 3 वर्षे 3 दिवस आणि 35 देश अशी सफर करणाऱ्या विष्णुदास चापकेला भेटा.

3 वर्षे 3 दिवस आणि 35 देश अशी सफर करणाऱ्या विष्णुदास चापकेला भेटा.

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवासाचं एक स्वप्न पूर्ण झालं. आता हा ‘ठहराव’ही हवासा, आपलासा वाटतो आहे.

विष्णुदास चापके

जग पाहायला निघालो. गेलो. जाऊन आलो. लोक आयुष्यात जुगार लावतात. मी आयुष्यच जुगारात लावायला निघालो होतो. मला अजून आठवतात ते दिवस. मी ठरवलं आपण जग पाहायचं. त्याआधी पत्रकार म्हणून एका इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होतो. त्या काळच्या एका घटनेनं हे जग पाहण्याचं वेड माझ्या डोक्यात शिरलं. कमांडर दिलीप दोंडे सागरमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करून आले होते. असा पराक्रम करणारे ते पहिलेच भारतीय आणि सहावे आशियाई नागरिक. मोहीम फत्ते करून आले म्हणून मला त्यांची मुलाखत घ्यायला सांगण्यात आलं. मी गेलो. निघताना मी त्यांना विचारलं, ‘तुमच्यासारखं मलाही करता येईल?’ ते हसले आणि म्हणाले, ‘अवघड काय आहे त्यात, निघ!’
तेव्हापासून माझ्या मनात हे जग पाहायला जायचं स्वप्न रुजलं. 
नोकरी सोडली आणि घरच्यांशी बोलून 19 मार्च 2016 रोजी निघालो.
तो दिवस आणि भारतात परत आलो तो दिवस.
3 वर्षे 3 दिवस. एवढा हा प्रवास झाला. 35 देश मी फिरलो. अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान या देशांचा व्हिसा नाही मिळाला त्यामुळे तिथे न जाता पृथ्वी प्रदक्षिणा करून आलो. 
आता कुणी विचारतं, की एवढं जग फिरलास? काय कमावलंस?
फार सोपं आहे या प्रश्नाचं उत्तर. एका वाक्यात सांगतो, मी मनशांती कमावली!
मी जे स्वप्न पाहिलं ते मी पूर्ण केलं; याहून मोठं समाधान ते काय? छान समाधानी वाटतंय मला!
आणि माझ्यात बदल काय झाला?

एका वाक्यात सांगायचं, तर मजा आली. मी तीन दिवसांपेक्षा जास्त दिवसांचं प्लॅनिंगच करत नव्हतो. पुढं काय, भविष्यात काय, हे प्रश्नच माझ्या आयुष्यातून संपले होते. कुठलाही प्लॅन तीन दिवसांचा. आणि जास्तीत जास्त प्लॅनिंग म्हणजे पुढच्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी करावी लागणारी धावपळ. बाकी प्लॅनिंग शून्य. प्लॅनिंग लागतंय कशाला? आपण अंधारात निघतो, हातात टॉर्च घेऊन. इटुकला, पावलापुरता प्रकाश असतो. दहा-बारा पावलं पुढचं दिसतं, आपण नीट पुढं जातो. मग फार पुढचं दिसायला पाहिजे, ही घाई तरी कशाला? या प्रवासात माझ्या हे लक्षात आलंय, की फार प्लॅनिंग काही कामाचं नाही. प्लॅन वर्कआऊटच होत नाहीत. आपण फार प्लॅनिंग करतो, पण ते प्रत्यक्षात उतरत नाही म्हणून दुर्‍ख होतं. त्यापेक्षा प्लॅनिंग न करता, छोटा प्लॅनने मोठय़ा गोष्टी घडल्या की आनंद होतो. जे हवं ते मिळालं, जे माहितीच नव्हतं तेही मिळालं, आपण खुश! मस्त वाटतं.
मी असा होतो का, मुंबईत पत्रकार म्हणून काम करायचो तेव्हा होतो का असा? 
मी मुळात फार उतावळा होतो. काहीसा अ‍ॅग्रेसिव्हही. वादावादीला, हुज्जत घालायला, आपली मतं सांगायला सतत तयार. माझंच कसं खरं हे समोरच्याला पटवून देण्यात मला फार रस होता. जे हवं ते हवंच आणि आज, आता, लगेच हवं अशा अ‍ॅटिटय़ूडनं जगायचो. कुणावर सहजी विश्वास ठेवायचो नाही. पत्रकारितेचा व्यावसायिक गुण प्रत्यक्ष जगण्यातही उतरला होताच. अगदी घरातल्या माणसांनी कुणी काही माहिती दिली तरी मी ती क्रॉस चेक करून घ्यायचो. नवख्या माणसांवर विश्वास ठेवणं तर फार लांबची गोष्ट होती.
आता मी कुणावरही, अगदी कुणावरही विश्वास ठेवू शकतो. सहज. 
शांत झालोय. कुणी माझ्यावर आरडलं-ओरडलं तरी मी शांत राहतो. स्वतर्‍लाच सांगतो, की ‘लेट हिम कुल डाऊन’ मग बोलू. काहीच प्रतिक्रिया देत नाही. हे प्रतिक्रियाच न देणं माझ्या आयुष्यातच नव्हतं. ते मी शिकलोय. मुख्य म्हणजे कुणी अगदी म्हणालंच की 2 अधिक 2 पाच होतात. तरी मी म्हणेन, की ठीक आहे, तुझं खरं. तुझंच बरोबर. त्याच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा मी प्रार्थना करेन, की कधीतरी या माणसाची सारी गणितं बरोबर येतील, कधीतरी त्यालाही योग्य मार्ग सापडेल. या प्रवासानं मला ही समज दिली. ही ‘शांतता’ दिली!
आणि आपल्या देशात असणं म्हणजे काय याची जाणीवही भारतीय मातीत पाय ठेवल्यावर झाली. म्यानमार आणि भारतामधल्या नो मॅन्स लॅण्डमध्ये मी खूप फोटो काढले. मी म्यानमारमार्गे ‘मोरेह’ला पोहोचलो. मणिपूरमधलं म्यानमार बॉर्डरवरचं गाव. तिथं माझ्या पासपोर्टवर भारतात परत आल्याचा शिक्का बसला आणि मला वाटलं, आता पासपोर्टचं काम नाही. वाटलं, आय अ‍ॅम ब्रिदिंग लाइक विदाऊट व्हिसा! मी बिनधास्त श्वास घेऊ शकतो, आता मला श्वास घेण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. होतं काय, तुम्ही सतत व्हिसावर असता म्हणजे परवानगीनं त्या देशात राहत असता, काही दिवसांत व्हिसा संपला, की निघायचं. पासपोर्ट ही सतत जवळ बाळगण्याची गोष्ट. इफ यू लॉस्ट पासपोर्ट, यू आर गॉन. जिवापेक्षा पासपोर्टला जास्त जपावं लागतं. ते संपलं. आता हा मुक्त श्वास घेताना मला फार फार भारी वाटतंय.
जगभर काय काय खाल्लं. पण परत आल्यावर पहिलं भारी वाटलं ते आपला उकळलेला दुधाचा चहा पिऊन. सगळ्या प्रवासात मी तो डिप डिपचा चहा प्यालो. फक्त इराण आणि उझबेकिस्तानमध्ये असा उकळलेला चहा प्यायलो होतो, पण ते उंटाचं दूध होतं, ते बाधलं. आता परत आल्यावर चहा प्यालो, तर तो पचला.
म्हणजे आता परत मी रुटीनमध्ये येतोय.
प्रवासाचं एक स्वप्न पूर्ण झालं. आता हा ‘ठहराव’ही हवासा, आपलासा वाटतो आहे.


(शब्दांकन -ऑक्सिजन टीम)

Web Title: Meet Vishnudas Chapke who traveled 3 years 3 days and 35 countries.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.