हत्तींशी बोलणारा आनंद

By अोंकार करंबेळकर | Published: January 17, 2018 04:32 PM2018-01-17T16:32:38+5:302018-01-18T09:49:51+5:30

हत्ती बोलतात काय, सांगतात काय हे समजून त्यांची भाषा शिकणारा एक तरुण दोस्त हत्ती म्हटलं की काय येतं डोळ्यांसमोर?

The joy of speaking with the elephants | हत्तींशी बोलणारा आनंद

हत्तींशी बोलणारा आनंद

Next

हत्ती बोलतात काय, सांगतात काय
हे समजून त्यांची भाषा शिकणारा एक तरुण दोस्त
हत्ती म्हटलं की काय येतं डोळ्यांसमोर?
- बरंच काही सुंदर, देखणं, भव्य आणि लोभसही डोळ्यांसमोर येतं; पण अलीकडच्या काळात कर्नाटकासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचा धुमाकूळ हा बातम्यांचा विषय बनला. अत्यंत चिंतेचा आणि दहशतीचाही.
का वागत असतील हे हत्ती असे?
त्यांच्या अत्यंत बुद्धिमान डोक्यात नेमका काय गदारोळ असेल, हे आपल्याला कळेल का?
हेच प्रश्न आनंदच्याही मनात असावेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची तयारी त्याला मिळालीही. नोकरीच्या निमित्ताने आनंद शिंदे केरळला गेला. आणि हत्तींच्या एका वेगळ्याच जगात दाखल झाला.
तिरुवनंतपूरमला नोकरी करताना, कोडनाड हत्ती केंद्रामध्ये असताना आनंद शिंदेला एक छोटुसं हत्तीचं पिलू भेटलं. कृष्णा त्याचं नाव. आईपासून वेगळं झालेलं, एकटं बसलेलं हे उदास पिल्लू. आनंद त्याच्याजवळ गेला तर त्याला वाटलं ते काहीतरी बोलायचा, संवाद साधायचा प्रयत्न करतंय. त्यानं तो आवाज रेकॉर्ड केला. वारंवर ऐकून त्याची प्रॅक्टिस सुरू केली. नंतर त्यांच्या लक्षात आलं हा आवाज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ही हत्तींची भाषाच आहे. आपल्या विशाल पोटामधला हा आवाज हत्ती बाहेर काढतात. त्याला 'रम्बलिंग' असं म्हटलं जातं. रम्बलिंगची माहिती मिळाल्यावर आनंदने ते आवाज शिकण्याचा ध्यासच घेतला. हत्तींबरोबर रोज दहा-बारा तास तो घालवू लागला. आनंदच्या या अभ्यासानं माहूतही चक्रावून गेले; पण आनंदला हत्तींशी बोलण्याचा मार्ग सापडला होता. हत्ती साधारणत: दहा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. त्यांचं हे रम्बलिंग ७ किलोमीटरच्या परिसरातील हत्तींशी संवाद साधू शकेल इतकं प्रभावी असतं.
हत्तींशी दोस्ती करत, त्यांच्या संगतीत वारंवार आणि दीर्घ काळ राहत आनंद हत्तींच्या प्रेमात पडला. हत्तींना समजून घेण्यात आपण माणसं, आपला समाज कमी पडतोय हे त्याच्या लक्षात आलं.
मग त्यांनं सरळ नोकरी सोडली. हत्तींसाठी काम करण्याचं ठरवलं. 'ट्रंक कॉल' नावाची संस्थाच स्थापन केली. हत्तींची भाषा त्याला यायला लागली, अनेक माहुतांनीही त्याच्यावर भरवसा ठेवायला सुरुवात केली. हत्तींचा अभ्यास केल्यावर हा प्राणी जैवसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा प्राणी असल्याचंही आनंदच्या लक्षात आलं. हत्तीच्या पावलांमुळे तयार झालेल्या लहानशा खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यावरही अनेक किडे-मुंग्या जगतात. आनंद या खड्ड्यांना ‘किड्यांचं फास्टफूड सेंटर’ म्हणतो. हत्तीच्या शेणामुळेही जैवसाखळीतील अनेक प्राण्यांना आणि जंगलाला मदत होते, निसर्ग सुदृढ राहातो हे आनंद आता लोकांना पटवून देतो आहे. हत्ती हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. परिसरातल्या भूगोलाचं ज्ञान हत्तींकडे असतं आणि हे सगळं ज्ञान आणि डोक्यात साठवलेली माहिती हत्ती एका पिढीकडून दुसºया पिढीकडे सुपुर्द करतात. त्यामुळे एखाद्या परिसरात आधी कधीही गेले नसले तरी हत्तींना त्या परिसरामध्ये जंगल आहे, पाणी आहे याची कल्पना असते. त्या माहितीच्या आधारावर हत्ती अशा नव्या परिसरात येतात.
मात्र ते माणसांच्या हद्दीत येतात असं माणसांना वाटतं आणि मग असे कसे हत्ती यायला लागले, त्यांनी शेतांची नासधूस केली अशा बातम्या होतात;
पण मुळात माणसांनाच हे माहिती नसतं की या परिसराबद्दल हत्तींना आधीपासूनच माहिती होती. आपल्याही आधीपासून ते या भागात येत-जात होते.
आनंद म्हणतो, 'हत्ती हा सर्वात मोठा मेंदू आणि सर्वात मोठं हृदय असलेला प्राणी आहे. त्याचा स्वभाव त्याच्या मेंदूत दडलाय आणि त्याचं हृदय केवळ प्रेमानं भरलेलं असतं. आपण ठरवायचं त्यातलं आपण काय मिळवायचं. त्याचं मन आपण समजून घेतलं पाहिजे.!’
आपण प्रयत्न करूच; पण आनंदला मात्र ते अत्यंत सुंदर जमलंय. हत्ती त्याच्याशी बोलतात आणि तो हत्तींशी तेच मोठं विलोभनीय आहे..

आनंद म्हणतो, ‘हत्तींनी मला माणूस केलं. शब्दांमध्ये न अडकता व्यक्त होता येतं याची जाणीव मला झाली. हत्ती बोलतात, आपण ऐकून, समजून घेण्याची तरी किमान तयारी केली पाहिजे!’

हत्तीण साधारणत: १२ वर्षांची झाली की ती प्रजननक्षम होते. मग २२ महिन्यांच्या गर्भधारणेच्या काळानंतर पिलाचा जन्म होतो. हत्तीच्या छोट्या पिलाला संपूर्ण कळपच सांभाळतो. त्याला गवत खायला, अंघोळ करायला, खेळायला, चालायला, सोंडेनं पाणी प्यायला शिकवलं जातं. हत्तीच्या पिलाच्या आयुष्यामध्ये कळपाचं स्थान फारच महत्त्वाचं असतं. कळपाशिवाय हत्तीचं पिलू जगणं कठीण असतं. आईपासून वेगळं झालेलं पिलू जगण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होते, असं आनंद सांगतो.

( ओंकार आॅनलाइन लोकमतमध्ये उपसंपादक आहेत.)

Web Title: The joy of speaking with the elephants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.