जिंदगी वसूल झाल्यासारखं वाटतं तेव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:06 AM2018-12-13T11:06:45+5:302018-12-13T11:08:51+5:30

इंजिनिअरिंग केलं, स्पर्धा परीक्षेच्या किडय़ानं डोकं पोखरलं; पण कळत नव्हतं मी कुणासाठी काम करतोय? मला काय करायचंय आयुष्यात? ती उत्तरं शोधत ‘निर्माण’मध्ये गेलो आणि तिथून गेलो माण तालुक्यात. दुष्काळाशी लढताना माणसांशी जोडत गेलो. त्या प्रवासाची ही कहाणी जी सांगतेय कार्पोरेट जॉब सोडून ग्रामीण भागात मिळालेल्या समाधानाची एक गोष्ट.

jindagi vasul! a story of a young man who left job for water conservation work! | जिंदगी वसूल झाल्यासारखं वाटतं तेव्हा

जिंदगी वसूल झाल्यासारखं वाटतं तेव्हा

Next
ठळक मुद्दे मनासारखं काम करत असताना लोकांकडून खूप प्रेम, सन्मान मिळाला आणि त्यांच्याकडून शिकायलाही बरंच मिळालं.

- प्रफुल्ल सुतार

मी मूळचा खटाव तालुक्यातील कलेढोण गावचा, जिल्हा सातारा. तिथेच दहावीर्पयत शिक्षण झालं. सगळ्यांनाच पडतो तसा ‘पुढं काय करायचं,’ हा प्रश्न पडला. त्यावेळी इंजिनिअरिंगला ‘लई डिमांड’ असते म्हणून डंका वाजत होता.  म्हणून मग कराडला शासकीय महाविद्यालयात डिप्लोमा पूर्ण केला. ते करत असतानाच वडिलांचं छत्न हरवलं. घरची परिस्थिती बेताची, पुढे पदवी करायची की नाही असा प्रश्न उद्भवला. सुदैवाने मामांच्या सहकार्यानं चंद्रपूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. इंजिनिअरिंग सुरू असताना मी विश्वास नांगरे पाटील आणि भरत आंधळे यांची भाषणं ऐकली. त्या काळात ही दोन भाषणं मोबाइलवर खूप फिरत होती. ज्यांनी ज्यांनी या दोघांची भाषणं ऐकली त्या सगळ्यांना स्पर्धा परीक्षेचं खूळ लागलं. आणि त्यात मीदेखील होतो!
इंजिनिअरिंग करत असताना मन सतत अस्वस्थ असायचं, त्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये शेवटर्पयत कधी मन लागलचं नाही. डोक्यात स्पर्धा परीक्षेचा किडा असल्यामुळे नेहमीच गोंधळलेल्या अवस्थेत राहिलो. त्याचवेळेस एका मित्नाने ‘सर्च’मधील डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या ‘निर्माण’ या उपक्रमाबद्दल सांगितलं. ते सारं ऐकून भारी वाटलं मी लगेच फॉर्म भरला. निवडप्रक्रि येतून जाऊन माझी निर्माण शिबिरासाठी निवड झाली. शिबिर गडचिरोलीला होतं, शोधग्राममध्ये.
शिबिर सुरू असताना मी कोण? मी कुणासाठी? माझ्या जीवनाचा हेतू काय? मला आयुष्यात काय साध्य करायचं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी चाचपडून बघितली. हळूहळू स्पष्टता येऊ लागली. माझ्या आजूबाजूचे, मला सतावणारे कुठले प्रश्न आहेत, ज्यावर मी काम करू शकतो हे लक्षात यायला लागलं. त्यात एक होता प्रशासनात माजलेला ‘भ्रष्टाचार’ आणि दुसरा म्हणजे ‘दुष्काळ’. बरं या प्रश्नांवर काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? काम करण्यासाठी काय पद्धत असावी? प्रशासनात राहून काम करावं की प्रशासनाच्या बाहेर राहून काम करावं? हे मात्र माझं मलाही कळत नव्हतं. 
या संभ्रमात असतानाच मी पालघर जिल्ह्यात जव्हार येथे आदिवासींच्या हक्कासाठी काम करणार्‍या मिलिंद थत्ते यांनी सुरू केलेल्या ’वयम’  चळवळीसोबत जोडलो गेलो. जव्हारमध्ये आदिवासींसोबत काम करताना लक्षात आलं की, आपल्याला एखादा प्रश्न महत्त्वाचा वाटत असेल पण ज्यांच्यासाठी काम करायचं त्या लोकांना तो प्रश्न महत्त्वाचा, स्वतर्‍चा वाटत नाही तोर्पयत त्या प्रश्नाला हात घालायचा नाही. तसं न झाल्यास त्या प्रश्नावर काम करणं ही आपली गरज बनते, लोकांची नाही. यादरम्यान माहिती अधिकार कायदा, पेसा कायदा, वनहक्क कायदा याविषयी माहिती मिळत गेली. प्रशासनात माजलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी माहितीचा अधिकार हे शस्त्न कसं वापरायचं, हे मी तिथं शिकलो.
‘वयम’ सोबतचं काम मी स्वतर्‍च्या आवडीने करत होतो त्यामुळे मला तिथून फार काही अर्थसाहाय्य नव्हतं. घरची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे आर्थिक अडचणी होत्याच. घरच्यांची अपेक्षा होती की मी चांगल्या पगाराची नोकरी करून पैसे मिळवावेत. आर्थिक अडचणी वाढत गेल्या आणि मी ठरवलं की आपण कॉर्पोरेटमध्ये जॉब करूया. मी पुण्यात एका खासगी कंपनीत जॉब करायला सुरुवात केली. जॉबला दोन महिनेही झाले नाही तोच मी त्या कामाला कंटाळलो. सकाळी नऊला कंपनीत हजार व्हा, संध्याकाळी सातला रूमवर परत या, नंतर जेवण करा आणि झोपा. दुसर्‍या दिवशी परत तेच. आठवडय़ातून एक सुट्टी मिळायची. ती सुट्टी कधी रूमवर, तर कधी बागेत फिरायला निघून जायची. बागेत जा कुठेही जा, सगळीकडे गर्दी. छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी रांगा. शहरात गेलं तर तिथे गाडय़ांची रांग. दोन-दोन तास ट्राफिकमधून लोकांना सुटका नसायची. या शहरी जीवनाचा कंटाळा आला. त्या काळात ‘निर्माण’मध्ये शिकलेल्या गोष्टी स्वस्थ बसू देत नव्हत्या. मी लवकरच निर्णय घेतला की, कुणी लाख रुपये दिले आणि म्हणालं माझ्या कंपनीत जॉब कर तरी करायचा नाही. कारण मी काय करत आहे आणि का करत आहे, हा प्रश्न मला रात्नरात्र  झोपू द्यायचा नाही. कॉर्पोरेट आयुष्याला पूर्णविराम दिला. हातात काही नसताना जॉब सोडला; पण आता पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न होता. 


महाराष्ट्राला त्या काळात सलग दोन र्वष प्रचंड मोठय़ा दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. ‘पानी फाउण्डेशन’ने नुकतंच पाणी प्रश्नावर काम करायला सुरुवात केली होती. ‘दुष्काळ’ हा प्रश्न मानणार्‍या मला ही चांगलीच संधी होती. मी ‘पानी फाउण्डेशन’मध्ये तालुका समन्वयकपदासाठी अर्ज भरला. चार-पाच टप्प्यातून गेल्यावर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा समन्वयक म्हणून माझी नेमणूक करण्यात आली.
माण तालुका माणसांना राहण्यासाठी लायक नाही, असं ब्रिटिशांनी दीडशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं. नेहमीच घोटभर पाण्यासाठी हा तालुका झगडत राहिलाय. इथल्या शाळकरी पोरांनी पाण्यानं भरगच्च नदी-नाले धबधबे केवळ अभ्यासाच्या पुस्तकातच बघितलेले असावेत. दिवसभर टँकरसमोर रांगा लावूनच दोन-तीन पिढय़ा मोठय़ा झाल्या. अशा परिस्थितीत स्थलांतर हा मोठा प्रश्न. तिथंच भेटले अजितदादा पवार आणि  डॉ. प्रदीप पोळ! हे दोघेही तालुका समन्वयक होते. त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढून जनचळवळ उभी केली आणि तालुक्याचा 30 टक्के दुष्काळ मिटवला असे हे दोघे. मला पहिली जबाबदारी होती सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेचे अर्ज गावोगावी जाऊन सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून भरून घेणं. रोज सात-आठ गावांच्या भेटी करायचो. सकाळी रूमवरून आठ वाजता बाहेर पडायचं ते रात्नी रूमवर यायला दहा-अकरा वाजत असत.
त्याच काळातला एक अनुभव आहे. अर्ज वाटत असताना रात्नी दहा वाजता एका गावातून तालुक्याच्या ठिकाणी परतत होतो. गावातून बाहेर पडलो आणि तेवढय़ात दुचाकीची हेडलाइट बंद पडली. रात्नी दहाचा सुमार. मिट्ट काळोख. आता काय करायचं? कुणाला तरी फोन लावावा असा विचार मनात आणला; पण दोन्ही सिमकार्डला नेटवर्कनाही. रस्ताही नीट माहिती नव्हता. कुत्नी भुंकत होती. रस्त्याने कुणीच दिसत नव्हतं. शेवटी खिशातून नोकिया 1600 चं मॉडेल बाहेर काढलं. त्याचा टॉर्च चालू केला आणि तोंडात मोबाइल धरून गाडी हळूहळू चालवत निघालो. जिथं जिथं कुत्नी असायची ती असा अवतार बघितल्यावर अजून जोरात भुंकत मागे लागली. तोंडात टोर्च तसाच धरून घाटाघाटातून रूम गाठली. अशी तारांबळ बघून ‘पानी फाउण्डेशन’चं काम करावं की नको असाही विचार मनात येऊन जायचाच.
त्यानंतर स्पर्धेला अर्ज केलेल्या गावांच्या ग्रामसभा घेऊन 5 गावकरी, त्यात दोन महिला आणि तीन पुरु ष, यांची ट्रेनिंगसाठी निवड करायची होती. महिलांची निवड सक्तीची असल्यामुळे गावोगावी अडचण झाली. महिलांना घराबाहेर पाठवायला कोणी तयार होईना. मग पुढे गावकर्‍यांच्या ट्रेनिंग सेंटरचा प्रवास. निवडलेल्या प्रशिक्षणार्थीऐवजी ऐनवेळी भलतीच माणसं असायची. काहींना ट्रेनिंग सोडू वाटत नव्हतं तर काही पळून गेलेल्या प्रशिक्षणार्थीना पकडून आणावे लागत असायचं. अशाप्रकारे ट्रेनिंगमध्ये मजेशीर अनुभव यायचे. ट्रेनिंग संपलं. तालुक्यातील 66 गावांनी ट्रेनिंग पूर्ण करून सहभाग पक्का केला होता. 
अखेर 8 एप्रिलला दुष्काळाविरु द्ध ‘सत्यमेव जयते’ वॉटरकपचं तिसरं महायुद्ध सुरू झालं. माणवासीयांनी रात्नी 12 वाजता कुदळ, फावडं घेऊन कामाचा शुभारंभ केला. 8 एप्रिलला तालुक्यातील 35  हजार लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. गावागावांत टीम बनल्या. डावपेच ठरू लागले. जे प्रशिक्षक गावकर्‍यांना शिकवायला होते तेच पुन्हा तालुक्यात मदतीसाठी आले. गावांचा आवाका मोठा असल्यामुळे आम्ही मंडलनिहाय गावं वाटून आपापली जहागिरी फिक्स केली. प्रत्येकजण आपापली कामगिरी बजावत होता. मग गावातच मुक्काम ठोकणं सुरू झालं. सकाळी उठून त्या गावच्या श्रमदानात हजेरी लावत असू. गावातील लोकं  ग्रामसभेसाठी रात्नी अकरा-बारा वाजेर्पयत आमची वाट बघत बसायची, इतक ी लोकं कामाने भारावून गेली होती. कुकुडवाड गावाने तर इतिहासच रचला! महाश्रमदानासाठी 8 हजार 700 लोकांनी श्रमदान केले. हे सर्व घडत असताना प्रशासकीय अधिकार्‍यांची साथ इथे मोठय़ा प्रमाणात मिळाली. बडेबडे आयुक्त स्तरातले आजी-माजी अधिकारी सुट्टी काढून श्रमदानाला यायचे. 45 दिवसात गावागावांत भरपूर काम झालं. 15 गावांनी 87 मार्काचा पेपर सोडविला. परीक्षण झालं. राज्यस्तरावर दोन गावं गेली. एक म्हणजे ‘भांडवली’ आणि दुसरं ‘टाकेवाडी’. त्या गावांचं पोपटराव पवारांच्या टीमनं परीक्षण केले. आता चाहूल लागली होती ती वॉटरकप स्पर्धेच्या अंतिम निकालाची. पुण्यात बालेवाडी स्टेडिअममध्ये 
कार्यक्र म होणार होता. सगळ्यांच्या छातीत धडधड सुरू होती. राज्यात द्वितीय क्र मांक ‘भांडवली’ असं पुकारलं आणि आमच्या अंगात भूतच संचारलं!
आता प्रथम क्र मांक जाहीर होणार होता.
 ‘सत्यमेव जयते वॉटरकप 2018 प्रथम 
क्र मांक. आणि विजेते आहेत..
आता उत्कंठा शिगेला पोहोचली होती. छातीची धडधड आणखी वाढली. 
‘टाकेवाडी!!!’’ 
हा आवाज आला आणि संपूर्ण स्टेडिअम सातारकर आणि माणकर लोकांनी घोषणांच्या आवाजांनी दुमदुमून गेलं. माण तालुक्यातील टाकेवाडी (आंधळी) हे गाव स्पर्धेचं प्रथम क्र मांकाचं मानकरी ठरलं. हे सगळं यश पदरात पाडून घेत असताना समाधान वाटत होतं की, मी त्याच पाणीप्रश्नावर काम करतोय जो मला ‘निर्माण’मध्ये असताना जाणवला होता. माझ्या मनाला समाधान वाटत होतं की मी समाजासाठी काहीतरी महत्त्वाचं करतोय. मनातल्या भावनेला मूर्त स्वरूप देण्याचं काम आपण प्रत्यक्ष करतोय याचा आनंद वाटला.  मनासारखं काम करत असताना लोकांकडून खूप प्रेम, सन्मान मिळाला आणि त्यांच्याकडून शिकायलाही बरंच मिळालं. आता मला ‘जिंदगी वसूल’ झाल्यासारखं वाटतंय!

Web Title: jindagi vasul! a story of a young man who left job for water conservation work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.