अठराव्या वर्षी होतं असं! ...पण दुसरे आॅप्शन्सही असतात !!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 12:21 PM2018-01-04T12:21:00+5:302018-01-04T12:22:03+5:30

‘मला नुस्तं लोळत पडायचंय बाबांनो, मित्रांसोबत नुसत्याच गप्पा मारायच्यात, फोन हातात घेऊन दिवस दिवस बसायचंय... थंड बसून राहाणं हाच माझा छंद आहे’ - असं ज्याच्या-त्याच्या कानात ओरडून सांगावंसं वाटतं ना?

- It was at the age of eighteen! But there are other alternatives !! | अठराव्या वर्षी होतं असं! ...पण दुसरे आॅप्शन्सही असतात !!

अठराव्या वर्षी होतं असं! ...पण दुसरे आॅप्शन्सही असतात !!

Next

- प्राची पाठक
छंद काय तुझा?
हा एक सहजच विचारला जाणारा प्रश्न. अगदी शाळेपासून लोक आपल्याला विचारत असतात. ‘आवडतं काय तुला?’
मोठ्ठं होऊन अमुक होणार, याचं उत्तर लहानपणी काहीही दिलं तरी चालतं. पण १८ वर्षांचं होता होता मात्र करिअरसह या ‘काय आवडतं?’ प्रश्नाचा एक नवा व्याप मागे लागतो.
आपण आपल्या आवडी-निवडीनुसार एक, दोन, चार छंद सांगतो. त्यात आपल्या अवतीभोवती मित्र-मैत्रिणींचा गराडा असतो. सोशल साइट्सवरचा माहितीचा भडिमार असतो. फोनमधून डोकं वर निघेल तर नां, ही वस्तुस्थिती कमी- जास्त फरकाने आजकाल अनेकांना समजून घ्यावी लागते.
त्यात नवीन प्रश्न आयुष्यात अचानक महत्त्वाचे ठरू लागतात. आपलं दिसणं भारी आहे का? आपला सेल्फी कसा दिसतो? या बाजूने कसा? त्या बाजूने कसा?
त्यात वय असं की, घरात काही जबाबदाºया असतात. अभ्यास, करिअर गोल्स असतात. कुणाला एखादा जॉब घेऊन शिकावं लागतं. कुणाला काही भलत्याच अडचणी येतात. आणि या साºयातून काय आवडतं वा काय आवडत नाही, याचीच आपली यादी मोठी होते. शी, हे नाही करणार मी, असं म्हणत हेच मत जास्त पक्कं होत जातं.
लोक सांगत असतात, ‘हेच वय आहे काहीतरी कर! त्यांच्याकडे आपण ‘काय लेक्चर देतात’ म्हणून बघतो. लेक्चरचा डोस वाढला तर त्या लोकांपासून पळ काढू लागतो.
‘मला केवळ लोळायचं आहे बाबांनो, मित्रांसोबत नुसत्याच गप्पा मारायच्या आहेत, फोन हातात घेऊन दिवस दिवस बसायचं आहे’, असं त्यांच्या कानात ओरडून सांगावंसं वाटतं. हे करायलापण हेच वय आहे, नंतर आहेच करिअर मागे धावपळ, घरात धावपळ. ‘थंड बसून राहाणं, हा माझा छंद आहे,’ असं कधी कोणाला मुद्दाम सांगावं असंही वाटत असतं.
त्यात मुलांना विचारायचे प्रश्न आणि मुलींना विचारायचे प्रश्न असा भेद अनेकदा असतोच. ‘माझं मी ठरवीन, हाच माझा छंद आहे, ते तुम्ही प्लीज समजून घ्या’ असं सांगून टाकावं असंही मुलींच्या मनात येतंच.
मात्र या साºयात होतं काय, या माझं मी ठरवीनमध्ये कळत नकळत मला काय आवडतं, काय करायचं आणि काय काय शिकायचं आहे, यापेक्षा मी काय करणार नाही, काय मला नको आहे, कोणती गोष्ट अजिबातच आवडत नाही, याचीच यादी मोठी आणि पक्की होत असते. आपल्याला काय आवडतं यापेक्षा काय आवडत नाही हे पटकन सांगता यायला लागतं.
काय आवडत नाही, याची यादी म्हणजेच आपली ओळख बनून जाते. मी या चार गोष्टी करून बघितल्या. त्यात हे-हे अनुभव आले. त्यावरून सध्या तरी ही गोष्ट मला पुढे ढकलाविशी वाटतेय, कदाचित ती मला झेपत नाहीये, ते लक्षात आलं आहे, असं फार कमी जण सांगतात.
बाकीचे सारे एकदम स्पेसिफिक आवडी-निवडी वरवरच्या माहितीवरून बनतात. ‘नाही म्हणजे नाहीच्च’ हा शिक्का कितीतरी गोष्टींवर वयाची विशीसुद्धा आलेली नसताना ठामपणे मारून टाकला जातो.
‘करून तर बघू’, हा उत्साह फार लवकर मावळतो. कदाचित आज टाळलेली गोष्टच उद्या आपल्याला आयुष्याची दिशा देऊ शकते. तिचा कुठे नां कुठे वापर करता येऊ शकतो. निदान कोणत्या-कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला ती गोष्ट जमली नाही, ते तरी नीटच लक्षात येतं.
आजूबाजूला त्या विषयांत नावाजलेलं कोणी त्या टप्प्यात चटकन आपल्याला मदत करू शकणारं असतं. तशी संधी कदाचित नंतर मिळणार नाही, अशी परिस्थिती असते. त्यामुळे म्हणून एकदमच विषयाला कुलूप लावून टाकायचं नाही. फाइल डिलीट करून टाकायची नाही; आपल्या डोक्यात डाउनलोड करून ठेवायची. एडीट करता येईल का, ते बघायचं. त्यानिमित्ताने कुठे भटकायला जाता येतं, वेगळ्या फिल्डमधली माणसं भेटतात, नवीन विश्व कळतं. हे सारं या वयातच करून घ्या.
नंतर ना वेळ उरतो हाताशी, ना अनेकदा आयुष्य परवानगी देतं. त्यामुळे ‘खुल के जिओ’ हा एकमेव मंत्र हाताशी ठेवून मनात येईल ते करून पाहणं हा या वर्षीचा मंत्र केला तर खूप बहार येते आयुष्यात!
(prachi333@hotmail.com)

Web Title: - It was at the age of eighteen! But there are other alternatives !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.