मयत, २०१७ च्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शॉर्ट फिल्मची एक काळीज हेलावणारी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:00 AM2018-05-17T09:00:27+5:302018-05-17T09:00:27+5:30

मृतदेहावरचे पैसे कुणी उचलत नाही; पण ‘त्यानं’ उचलले. हाताला काम आणि पोटाला भाकरी हवी तर त्यानं हे भलतंच काम पत्करलं तेव्हा..

 It is a matter of great regret that one of the national award winning short films of 2017 | मयत, २०१७ च्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शॉर्ट फिल्मची एक काळीज हेलावणारी गोष्ट

मयत, २०१७ च्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शॉर्ट फिल्मची एक काळीज हेलावणारी गोष्ट

Next


- माधुरी पेठकर
 सातारा जिल्ह्यातलं एक दुष्काळी गाव. या गावातला नामा नावाचा मजूर. हातावर पोट. काम मिळालं तर त्याच्या घरची चूल पेटते. त्याचा फाटका संसार शिवून शिवून बायकोही वैतागते. ‘मिळालं का काम? ’ हा विझल्या चुलीसमोर बसून बायकोनं विचारलेला प्रश्न आणि मुलीची म्हणजे नंदीचं पोटभर जेवायला मिळण्याची आणि नवीन दप्तराची आस नामाला अस्वस्थ करते.
रोजच्या दिवसाबरोबरच काम मिळण्याची आशा नामाच्या मनात उगवते. काम मिळेल, चूल पेटेल या आशेनं तो रोज बाहेर पडतो. पण, दुष्काळामुळे गावातले जमीनदारच घरात बसून असलेले तिथे नामासारख्या मजुरांसाठी काम कुठलं?
रोजच्या सारखाच हा दिवसही उजाडतो. नामाची बायको त्याला कामासोबतच गावातल्या पाटोळे नामक व्यक्तीकडून राहिलेले २०० रुपये घेऊन येण्याची आठवण देते. त्या पैशांवर किमान तीन-चार दिवस भागेल अशी तिला आशा असते. पण त्याच दिवशी पाटोळेचा मृत्यू होतो. पाटोळे गेल्याच्या दु:खापेक्षाही पैसे बुडाल्याचं दु:ख घेऊन नामा मयतीला जातो. त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा त्या दिवशीचा उपवास निश्चित असतो. पण मयतीनंतरची एक परंपरा नामाच्या उपाशी नजरेत आशा भरते. मयतीवर ओवाळून टाकलेले पैसे. त्या पैशांना हात लावणं म्हणजे मोठं पाप या समजुतीमुळे कोणी त्या पैशांना हात लावण्याचा विचारही करत नाही. पण पोटाची भूक मात्र नामाला ते पैसे उचलण्याचं धैर्य देते. नामा पैसे गोळा करतो. त्या दिवशी त्याच्या घरची चूल पेटते. दुसऱ्या दिवशी नामा पुन्हा कामाच्या नाहीतर गावात, जवळपासच्या दुसºया एखाद्या गावात मयतीच्या शोधात निघतो. आणि मग मेलेला माणूस ३०-३५ किलोमीटरवरचा असला तरी भर उन्हात सायकल रेटून गावात पोहोचतो. मयतावर ओवाळून टाकलेले पैसे उचलतो. घरी येतो. चूल पेटते. नंदीला नवीन दप्तरही येतं. यापुढे नामाचा पैसे मिळवण्याचा हाच मार्ग ठरतो.
पण एक दिवस नामाच्या नशिबात या मयतीचाही दुष्काळ कसा येतो आणि त्यासाठी तो कोणता मार्ग निवडतो हे उलगडणारी ही शॉर्ट फिल्म म्हणजे मयत. फिल्मचा शेवट करताना दिग्दर्शकानं धक्कातंत्र अनुभवलं आहे. या शेवटामुळेही मयत प्रभावी होते. ही २५ मिनिटांची शॉर्ट फिल्म. या शॉर्ट फिल्मला नुकताच २०१७ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
डॉ. सुयश शिंदेनं ‘मयत’ची कथा, पटकथा लिहिली. आणि फिल्मचं दिग्दर्शनही केलं. व्यवसायानं डेण्टिस्ट असलेला सुयश, मूळचा सातारा जिल्ह्यातला. कोरेगावच्या चौधरीवाडीत सुयश लहानाचा मोठा झालेला. गाव, गावातल्या लोकांची मानसिकता, गावातली गरिबी जवळून बघितलेली. पुण्यात डेण्टिस्टचं शिक्षण घेत असताना २००५ मध्ये साताºयात मांढरदेवीच्या यात्रेत चेंगराचेंगरीची घटना घडली. यात सुयशच्या कुटुंबातले चार जण गेले. सुयशच्या मनातून ही घटना पुढे कधीच पुसली गेली नाही. या घटनेवर आधारित एक नाटक त्यानं आणि त्याच्या टीमनं कॉलेजमध्ये बसवलं. त्यानंतर सुयशला थिएटर, नाटक आवडू लागलं. पुढे फिल्म करावीशी वाटली. आवडीपोटी डायरेक्शनचा एक छोटा कोर्स केला. उमेश कुलकर्णींकडे फिल्म मेकिंगचे धडे गिरवले. या शिक्षणातून सुयशला फिल्मच्या टेक्निकल नॉलेजसोबतच फिल्ममधली फिलॉसॉफी समजली. सांगायची कथा पण फिलॉसॉफी असलेली. अशी कथा ज्यात संदेश, उपदेश असं काही नाही. फिल्म म्हणजे फक्त कथा. फिलॉसॉफी असलेली.
‘मयत’ ही फिल्म सुयशनं फक्त हौसेखातर करून पाहू अशी केलेली नाही. प्रोफेशनल शॉर्ट फिल्मचा ध्यास घेतलेल्या सुयशनं पहिले तीन महिने फक्त कथेवर काम केलं. मग ५०-६० जणांचा क्रू जमवला. प्रोफेशनल कॅमेरा वापरून फिल्म शूट केली. फिल्ममधल्या प्रत्येक फ्रेमनं कथा सांगायला ंहवी, फिल्ममागची फिलॉसॉफी फ्रेममधून , संवादातून व्यक्त व्हायला हवी, फिल्ममधल्या संगीतानं कथेचा भाव अधिक गहिरा करायला हवा या सर्व गोष्टींचा बारीक विचार करून सुयशनं ही फिल्म तयार केली. एक प्रेत जळल्यानंतरचा दुसरा शॉट नामाच्या घरात चूल पेटल्याचा असतो. मयतीवर पैसे मिळवण्याची चटक लागलेला नामा ‘आज काम मिळेल का?’ या बायकोच्या प्रश्नाला ‘आपल्या हातात नसतं, ते सर्वकाही शेठच्या हातात’ असं म्हणून उत्तर देतो.’ अर्थपूर्ण शॉट आणि नेमके संवाद यांच्या सहाय्यानं सुयश शिंदेनं ‘मयत’ला एक फिलॉसॉफी दिली आहे.
‘मयत’ची फिलॉसॉफी आणि त्याची फिल्ममधली प्रत्यक्षात मांडणी इतकी प्रभावी ठरली की राष्ट्रीय पुरस्कार देताना ज्यूरींनी या फिल्मचा ‘एक लेअर्ड फिल्म’ म्हणून गौरव केला. एक लेअर्ड फिल्म म्हणून फिल्मचा गौरव होणं ही फिल्ममेकरसाठी खूप मोठी कौतुकाची थाप असते.

(madhuripethkar29@gmail.com )

Web Title:  It is a matter of great regret that one of the national award winning short films of 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.