चालत्या गाडीतून पचापच थुंकता ..आता नाही चालणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 11:34 AM2017-08-31T11:34:44+5:302017-08-31T11:55:08+5:30

आपण हमखास सिग्नल तोडतो. डबल पार्किंग करतो, दहा लाखांच्या गाडीतून फिरतो; पण मिनरल वॉटरची बाटली हमखास रस्त्यावर फेकतो. चालत्या गाडीतून पचापच थुंकतो. गाडी चालवताना मोबाइलवर बोलतो, कायद्याला घाबरत नाही. दुस-यांचा विचार कधीच करत नाही. कारण आपल्याला माहीत असतं, सब चलता है !

It does not work! | चालत्या गाडीतून पचापच थुंकता ..आता नाही चालणार !

चालत्या गाडीतून पचापच थुंकता ..आता नाही चालणार !

Next

-विनोद बिडवाईक

एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये एकाने प्रश्न विचारला..
प्रश्न होता, भारतात तयार होणाºया प्रॉडक्टच्या क्वालिटीबद्दल. वक्त्याने विचारलं, ‘भारत’ हा शब्द उच्चारल्यावर आपल्या समोर काय येतं?
भारत म्हणजे अतिशय मोठा देश, सुंदर देश; पण काम, उत्पादनाचा दर्जा याबद्दल विचार केला तर दिसते भारतातील मानसिकता. चलता है असं म्हणणारा अ‍ॅटिट्यूड. प्रत्येक बाबतीत ‘चलता है’ असं म्हणत काम केल्यानं, तीच मानसिकता कायम स्वीकारल्यानं आपण गुणवत्ता असून, मागे पडतो आहोत.
खरं तर एरव्ही असं कुणी काही आपल्याला सांगितलं तर वाईट वाटतं. पण यंदा थेट लाल किल्ल्यावरून आपल्या पंतप्रधानांनीच सांगितलं की, हा चलता है अ‍ॅटिट्यूड सोडा. बदल सकता है हा अ‍ॅटिट्यूड अंगीकारा आणि चांगल्या विधायक कामांसाठी, पॉझिटिव्ह चेंजसाठी पुढे या !
यानिमित्तानं जरा आपण विचार करू की, आपण खरंच आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात किती ‘चलता है’ म्हणतो. रेटून नेतो गोष्टी आणि हळूहळू त्या वागण्याचंही आपल्याला काही वाटेनासं होतं. आपणही म्हणू लागतो, जाऊ द्या, चलता है !
जरा घराच्या बाहेर पडा. रस्त्यात खड्डे. पाण्याची डबकी. रस्ते दुरुस्त केले तरी गटारीची जाळी एवढी खाली गेलेली असते की त्यात पडून अपघात होण्याचं भय. रस्त्यांचं काम कसं, ढिगळ लावल्यासारखं. आपण हे सारं पाहतो, सरकारला दोष देतो. आणि लोक काही भांडायला येत नाही. चलता है म्हणून लोक ते स्वीकारतात हे सरकार, मनपा, काम करणारेही गृहीत धरतात. ते तसंच काम करतात म्हणतात, चलता है आणि आपण ते मान्य करतो, म्हणतो तेच, चलता है !
आणि इतरांना दोष का द्या? आपण तरी नियम कुठं पाळतो, कायदा कुठं इमानदारीनं पाहतो, आपण तिथंही म्हणतोच, चलता है !
आपण हमखास सिग्नल तोडतो. डबल पार्किंग करतो, दहा लाखांच्या गाडीतून फिरतो; पण मिनरल वॉटरची बॉटल हमखास रस्त्यावर फेकतो. चालत्या गाडीतून पचापच थुंकतो. गाडी चालवताना मोबाइलवर बोलतो, वाट्टेल ते करतो. कायद्याला घाबरत नाही. दुसºयांचा विचार कधीच करत नाही. कारण आपल्याला माहीत आहे, हे असं वागणं आपल्या या ‘चलता है’ संस्कृतीचा भाग झाला आहे.
जे व्यक्तिगत आयुष्यात तेच व्यावसायिंक आयुष्यातही.
आपल्या कामात आपण किती परफेक्शन दाखवतो? एखादा आरसा किंवा घड्याळ अथवा फोटोफ्रेम भिंतीवर लावायची असेल समजा, तर किती काटेकोर लावतो? फ्रेम थोडी वाकडी झाली तर झाली, बिघडलं कुठं? चलता है हे आपण स्वीकारलेलंच असतं. आपल्या आॅफिसात केबल्स् आणि वायरींचं जंजाळ असतं. टेबलावर कामाचा पसारा, साधी फाईल नीट करत नाही की पेपर्सना नीट एकसारख्या पिना मारता येत नाही. घरातील पसारा असो की आॅफिसातला. ना धड दुसºयांच्या सुरक्षतेची काळजी, ना दर्जाचा आग्रह, ना शंभर टक्के गुणवत्तेची हमी. चालतंय ना, काम भागतंय ना, वेळ मारून नेता येतेय ना, कोण विचारत नाही मग कशाला जीव काढा असं म्हणत बेफिकीर अ‍ॅटिट्यूड सर्रास काम करतो.
हा चलता है अ‍ॅटिट्यूड आपल्या गुणवत्तेला मारक आहेत. आपल्या प्रगतीला मारक आहे हे आपण मान्य करून तो सोडायला हवा. डोक्यातून बाहेर काढायला हवा हा विचार आणि आपण गुणवत्तेचा, दर्जाचा, नेमकेपणाचा, आणि सिन्सिअ‍ॅरिटीचा आग्रह धरू हे स्वत:ला सांगितलं पाहिजे. आपण नव्या कार्पोरेट जगात, आंतरराष्टÑीय स्पर्धेत आणि उत्तम करिअरच्या दिशेनं जायचं म्हणत असू तर आपण स्वत:च्याच मनातून हा चलता है नावाचं सरधोपट विचार काढून टाकायला पाहिजे.
त्यासाठी आपण स्वत:वर काम करायला हवं. स्वत:ला शिस्त लावायला हवी. आणि आपल्या स्वत:कडून असलेल्या अपेक्षा वाढायल्या हव्यात.
कार्पोेरेट जगात सिक्स सिग्मा, लिन सिग्मा, टीपीएम अर्थात टोटल प्रोडिक्टिव्हिटी मॅनेजमेण्ट, टीक्यूएम अर्थात टोटल क्वालिटी मॅनेजमेण्ट यासारख्या बºयाच गुणवत्ता प्रणाली आता अस्तित्वात आहेत. कंपन्यांना याचा फायदाही होतो आहे. म्हणजे आता कार्पोरेट क्षेत्रानंही हे मान्य केलं आहे की एका व्यक्तीच्या नाही तर व्यवस्था म्हणून गुणवत्तावाढीसाठी काही प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी या प्रणाली काम करतात. मग हे जे कंपनीत होतं ते आपल्या जगण्याचा भाग का नाही होऊ शकत?
म्हणजे काय करायचं, ते फार अवघड असतं असंही नाही. अगदी स्वत:पासून सुरुवात करून, लहान-साध्या सोप्या गोष्टी केल्या तरी ते जमू शकतं.
घरातील वस्तू रोज जागच्या जागी ठेवणं हाही एक गुणवत्तेचा भाग आहे. कार्पोरेट जगात फाईव्ह एस म्हणून एक कन्सेप्ट आहे, त्याचाच हा भाग आहे. ही एक जापनीज कन्सेप्ट आहे. सॉर्ट, स्ट्रेन्थ, शाइन, स्टॅण्डर्डाईज, सस्टेन असे हे पाच टप्पे. त्यातलाच एक आता नवा एस म्हणजे सेफ्टी. या साध्या सोप्या गोष्टी वेळ वाचवतात, दर्जा राखतात अशी ही मांडणी. अगदी फरफेक्शन ना सही; पण एखादी गोष्ट चांगली दिसावी, उत्तम व्हावी, अचूक व्हावी, वेळेत व्हावी म्हणून तर आपण प्रयत्न करू शकतो. शेवटच्या क्षणी धावपळ करत काम पूर्ण करणं, म्हणजे हाच तो चलता है अ‍ॅटिट्यूड.
अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या आपल्या हातात आहेत. उदाहरण सांगतो, चीन आपल्यासारखाच मोठा देश. खूप लोकसंख्या, मोठे नागरी प्रश्न. पण आज चीनमधली अनेक शहरं युरोपमधील शहरांपेक्षा नीटनेटकी आणि स्वच्छ आहेत.
आयफोनपासून स्पिकरपर्यंत आणि आकाशकंदिलांपासून तोरणांपर्यंतच्या वस्तू चीनच्या बाजारपेठेत तयार होतात कारण त्यांनी उत्पादन प्रक्रियेचा केलेला अभ्यास. त्यांनी स्वत:तला चलता है अ‍ॅटिट्यूड बाजूला ठेवला म्हणून हे साधलं. युरोप-अमेरिकेविषयी, तिथल्या स्वच्छतेविषयी आपण बोलतो; पण तिथल्या माणसांची सामाजिक शिस्त, त्यासाठीचा आग्रह, हे सारं आपल्या वर्तनात दिसत नाही. आपल्या कामात, आपल्या व्यावसायिक कौशल्यात पाझरत नाही.
आपण आपल्या संस्कृतीबद्दल, मूल्य व्यवस्थेबद्दल खूप बोलतो. त्याचा अभिमान बाळगतो; पण ते आपल्या वर्तनात येत नाही. तेव्हा जे येतं, ते चलता है असंच असतं.
तेव्हा बदलायचंच झालं तर आपल्याला आपलं वर्तन आणि मानसिकता बदलावी लागेल. तर गुणवत्तेचं चीज होईल, आपल्या जगण्यात गुणात्मक बदल दिसू लागतील.
आणि ते नाही केलं तर ही चलता है वृत्ती गोंधळ घालत राहील. आपला दर्जा सुधारणार नाही, आपल्या वेळेचं योग्य नियोजनही होणार नाही. ताण वाढतोच. आणि मग तात्पुरती ठिगळं लावून आपण गोष्टी पुढे ढकलत राहतो. त्यानं आपल्या उच्चतम यश मिळण्याच्या शक्यता फारच कमी होत जातात.
हे सारं टाळायचं असेल तर लहान गोष्टींपासून सुरुवात करू. आपल्या वेळा पाळणं, स्वच्छतेचे नियम, वाहतुकीचे नियम, आपलं काम वेळेत करणं, आपलं स्वत:कडे लक्ष, व्यायाम, आहार इथपासून सुरू केलं तर कदाचित हा चलता है अ‍ॅटिट्यूड आपल्याला सोडेल आणि मग परफेक्शनिस्ट माणसांना मिळतं तसं यश आपल्यालाही मिळू शकेल...
म्हणून तर पाहू, नो मोअर चलता है !


(लेखक कार्पोरेट क्षेत्राचे अभ्यासक आणि मनुष्यबळ विकास तज्ज्ञ आहेत. vinodbidwaik@gmail.com)

Web Title: It does not work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.