गणेश, आॅनलाइन नाखवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 05:23 PM2018-01-31T17:23:01+5:302018-02-01T16:22:23+5:30

स्कॉटलंडमधली इन्व्हेस्टमेंट बँकिंग सोडून आॅनलाइन मासे विकणारा एक तरुण

Ganesh, online nail | गणेश, आॅनलाइन नाखवा

गणेश, आॅनलाइन नाखवा

googlenewsNext

- चेतन ननावरे
उरणच्या करंजा कोळीवाड्यात वाढलेला गणेश. २००५ साली विज्ञान शाखेतून बारावी पास झाल्यावर त्यानं उच्चशिक्षणासाठी स्कॉटलंड गाठलं. फायनान्सची पदवी घेतली. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने लागलीच त्याला महिना दीड लाख पगाराची नोकरी मिळाली; पण गणेशचं मन भारतात खरं तर उरणच्या समुद्रात अडकलेलं होतं. बारावीपर्यंत प्रत्येक दिवाळीच्या सुटीत वडिलांसोबत तो खोल समुद्रात मासेमारी करायला जायचा. कसारा आणि ससून डॉकमध्ये जाऊन मासे विकण्याचं प्रशिक्षणही गणेशला वंश परंपरेनेच मिळालं.
शिडाच्या होडीतून मासेमारी करणाºया आजोबांपासून बॅग नेट अर्थात डोल नेट, ट्रॉल नेट आणि नंतर पर्सेसीन नेट अशा आधुनिक पद्धतीने मासेमारी करणाºया वडिलांपर्यंतच्या दोन पिढ्या गणेशने पाहिल्या होत्या. स्कॉटलंडमध्ये नोकरी करतानाही हा व्यवसाय वेगळ्या उंचीवर कसा नेता येईल याचाच विचार गणेश करत होता.
त्यानं स्वत:लाच विचारलं की आपण मासे पकडतो मग आपणच ते थेट त्यांना का विकू शकत नाही? कोळी बांधव फक्त मासे पकडण्याचं काम करत असल्याचंच त्यानं लहानपणापासून पाहिलं होतं. माशांची घरपोच विक्री किंवा साठवणूक करण्याचा विचार कुणीही करताना दिसत नव्हतं. कोळी बांधवांच्या अज्ञानाचा परप्रांतीयांनी फायदा घेत कोट्यवधी रुपये कमावल्याचंही तो पाहत होता. याच विचारातून जन्म झाला तो त्याच्या ‘ब्ल्यू कॅचचा’. लाख रुपये पगाराची नोकरी सोडून गणेश उरणला परत आला.
बंदरांवर होणारा माशांचा लिलाव गणेशला ठाऊक होता. त्याचा सखोल अभ्यास गणेशने केला. येथील व्यापारी, किरकोळ व घाऊक विक्रेते, मासळी बाजार, आयात व निर्यातदार, मासळी साठवणारे अशा सर्व घटकांचे त्याने निरीक्षण केले. दरम्यान पर्सेसीन फिशिंगचा व्यवसाय त्याने सुरू ठेवला. २०१४ साली गणेश करंजा सोसायटीवर संचालक म्हणून नियुक्त झाला. करंजा सोसायटीमधील पहिला पदवीधर आणि सर्वात तरुण संचालक म्हणून त्याची निवड झाली. आपल्या समाजाला डिजिटल इंडियाची जोड देण्यासाठी त्यानं आपली आॅनलाइन व्यवसायाची संकल्पना समाजासमोर मांडली; मात्र अडचणीत असलेल्या समाजाने ‘आहे ते टिकवा’ अशा शब्दात आॅनलाइन व्यवसायास नकार दिला. निराश न होता त्यानं स्वत:च्या हिमतीवर हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, देशात स्टार्ट अप संकल्पना उसळी घेऊ लागली. आपली संकल्पना स्टार्ट अपच्या माध्यमातून यशस्वी करण्यासाठी गणेशनं बालपणीचा मित्र नीलेशची मदत घेतली. नीलेशचा औरंगाबादला व्यवसाय होता. कोपरखैरणे येथून मुंबईतील काही भागांसह, नवी मुंबई व ठाणे परिसरात आॅनलाइन मासे विक्री करण्याचं गणेशने ठरवलं. मासे ताजे ठेवण्यासाठी स्पेशल कोल्ड रूम, पॅकिंग ट्रान्सपोर्ट आणि डिलिव्हरी बाइक्सची व्यवस्थाही त्याने केली.
वर्षभरात सर्व परवानग्या मिळवत गणेशने आॅक्टोबर २०१७ सालापासून आॅनलाइन मासे विक्रीस सुरुवात केली. गेल्या तीन महिन्यांत तब्बल हजारहून अधिक ग्राहक गणेशनं जोडले आहेत. या व्यवसायात त्याच्यासोबत आता १२ लोकं काम करतात. अशाप्रकारे व्यवसाय करणारा गणेश पहिलाच कोळी बांधव आहे. त्याचाच फायदा घेत त्यानं ‘लोकेट यूवर फिश’ हे अ‍ॅप आणलं. या संकल्पनेत मच्छीमारांनी बोटीवर कोणते मासे पकडले आहेत, संबंधित मासे कुठे पकडले आहेत, याची माहितीही ग्राहकांना मिळते. त्यासाठी मासे पकडणाºया बोटीवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. म्हणजेच ‘डायरेक्ट फ्रॉम बोट टू होम’ ही कन्सेप्ट तो राबवतो. ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवरून फोटो पाठवले जातात. कंपनीच्या वेबसाइटवरही ही सर्व माहिती खुली ठेवण्यात येते. त्यामुळे मासळी कितपत सुरक्षित, स्वच्छ आणि पौष्टिक आहे याची माहिती ग्राहकांना मिळते.
पहिल्या तीन महिन्यांत या स्टार्ट अपला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये आणखी नवेपण आणण्यासाठी ग्राहकांना फिशिंगचा अनुभव देण्याचाही मानस आहे. या संकल्पनेत ग्राहक मासे पकडण्यासाठी किंवा कसे पकडतात हे पाहण्यासाठी बोटीवर घेऊन जाण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. गणेश म्हणतो, ‘व्यवसाय जुना असला तरी तो कल्पक रीतीनं, डिजिटल मदत घेऊन करणं हीच काळाची गरज आहे.’


(चेतन लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे. chetan.nanaware@gmail.com)



 

Web Title: Ganesh, online nail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.