आलम दुनियेला ठोकरुन म्हणा, हम को तो यारी से मतलब है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:58 PM2017-08-05T14:58:57+5:302017-08-05T15:00:33+5:30

वाचता-वाचता तरळलेच काही जुन्या मित्रमैत्रिणींचे चेहरे नजरेसमोर, तर करा त्यांना एखादा फोन. खूप दिवसांपासून लिहायचंच म्हणून ठरवलं असेल तर पूर्ण करून पाठवा ते पत्र. आणि शक्य असेल तर भेटा एकमेकांना, जुन्या कटय़ावर नव्यानं!

Friendship Is the Best Things in the World. | आलम दुनियेला ठोकरुन म्हणा, हम को तो यारी से मतलब है!

आलम दुनियेला ठोकरुन म्हणा, हम को तो यारी से मतलब है!

Next
ठळक मुद्देएकमेकांच्या साथीनं समृद्ध व्हावं.. भरपूर आनंदानं जगावं. म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच ‘ऑक्सिजन’चा ऑनलाइन विशेष अंक.

-ऑक्सिजन टीम

 

मैत्री. दोनच अक्षरं! उजळणी करायला घ्या. शब्द कमी पडतील. मनातलं सारं मनापासून सांगून टाकू असं लाख ठरवलं तरी काय काय सांगाल या नात्याविषयी? नातं तरी का म्हणायचं मैत्रीला? नात्यांच्या बेडय़ा आणि रिश्तोंके इल्जाम कधी मान्य केलेत का मैत्रीने? मैत्रीचं नातं असा शब्दप्रयोग तरी बरा वाटतो का कानाला? नात्यासारखं हिशेबाचं काही नसतंच मैत्रीत! असते ते निखळ मैत्र! ज्याला फक्त देत राहणं माहिती असतं, कसला हक्क नाही, कसली अपेक्षा नाही, कसली मागणीही नाही.

मग काय हवं असतं?

मित्रांचं बरोबर असणं, आपल्या लहानशा आनंदात त्यांचं मनापासून खुश होणं, चुकत असेल काही तर अधिकारानं कान धरुन चांगली कानउघाडणी करणं, वेळ पडलीच तर दाखवणं आपल्याला आरसा.

डोळ्यात झणझणीत अंजन आणि मोडून पडलोच आपण तर द्यावी आपल्याला उमेद, नव्यानं आयुष्य उभारण्याची! त्याचा आपल्या वाटांवर कदाचित नसेल विश्वास, पण आपल्या पावलांवर त्यानं ठेवावा भरोसा!

हे सारं फार अवघड असतं का?

तर नाही! नाहीच!!

पण ‘वेळ नाही’, ‘जमतच नाही’ या सबबीखाली आपण आपल्या जिवाभावाच्या मित्रांनाच गृहीत धरतो, सगळ्या जगाचे सगळे शिष्टाचार पाळतो. जे जग आपल्याला छळतं त्याच्याशी किती प्रेमानं वागतो?

- आणि आपले मित्रमैत्रिणी; ते म्हणजे आपली हक्काची चिडायची-रागवायची-संताप काढण्याची जागा. आपल्या या वागण्याचं समर्थनही करतोच ना आपण! ‘मित्रमैत्रिणींवर नाही चिडणार तर कोणावर काढणारा राग?’ चिडचिडाट आणि गृहीत धरण्याचं हे चक्र एकदा सुरु झालं की आपले जिवाभावाचे मित्र आपल्यापासून कधी लांब गेले हे कळतही नाही! तसं होऊ नये म्हणूनच तर जगभरात साजरा होतो एक हक्काचा दिवस!

खास जगभरातल्या

मित्रमैत्रिणींसाठी!

आपल्यासाठी!

हा दिवस म्हणजे ऑगस्ट

महिन्याचा पहिला रविवार.

फ्रेण्डशिप डे!

‘डे’ संस्कृतीच्या नावानं कितीही सांस्कृतिक आरडाओरड झाली तरी आपल्या जगण्याला उत्सवाचं निमित्त लागतं हे मान्यच करायला हवं!

तोच हा उत्सव!

जगण्यालाच मूलभूत आधार देणार्‍या क्षणांचा! खांद्यावर पडणार्‍या आश्वासक हातांचा! एकेक कटिंग चहाचा, एकात पाच मिसळ-पावचा! रात्ररात्र जागून भटकणार्‍या वेडय़ा दिवसांचा! जगावरच्या रागाचा. नवीन जग घडवण्याच्या निर्धाराचा! वडापावच्या गाडय़ांवरच्या उधारीचा! प्रेमात पडण्याच्या आणि प्रेमभंगाचे चटके सोसत हुरहुरणार्‍या पागल अवस्थेचा! असा हा उत्सव!

जिवाला जीव देण्याचा!

हम को तो यारी से मतलब है..

असं म्हणत आलम दुनियेला ठोकर मारण्याच्या उद्धटपणा. नितळ आत्मविश्वासाचा!

या उत्सवात रंगणारेच जाणोत त्याचं खरं मोल!

मनामनांत मैत्रीची ही श्रीमंती आपण जपावी.

एकमेकांच्या साथीनं समृद्ध व्हावं.. भरपूर आनंदानं जगावं. म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच ‘ऑक्सिजन’चा ऑनलाइन विशेष अंक.

आणि हा अंक वाचता-वाचता तरळलेच काही जुन्या मित्रमैत्रिणींचे चेहरे नजरेसमोर, तर करा त्यांना एखादा फोन. खूप दिवसांपासून लिहायचंच म्हणून ठरवलं असेल तर पूर्ण करून पाठवा ते पत्र. आणि शक्य असेल तर भेटा एकमेकांना, जुन्या कटय़ावर नव्यानं!

शुभेच्छा!

आपल्या सगळ्यांना जुने मित्र नव्यानं भेटोत आणि नवे कायमचे आपले होऊन जावीत म्हणून..! एन्जॉय!

Web Title: Friendship Is the Best Things in the World.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.