फेडरर...हरणं हा शब्दच माहिती नसावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:28 PM2017-07-19T16:28:54+5:302017-07-19T17:11:22+5:30

वयाची तिशी कधीच उलटली. तब्येतीनं छळलं, दुखापतींनी ग्रासलं. मात्र तो हरला नाही. पुन्हा पुन्हा त्यानं स्वत:ला कोर्टावर उतरवलं.

Federer ... Hernan does not contain the word | फेडरर...हरणं हा शब्दच माहिती नसावा

फेडरर...हरणं हा शब्दच माहिती नसावा

Next

- रोहित नाईक,

वयाची तिशी कधीच उलटली. तब्येतीनं छळलं, दुखापतींनी ग्रासलं. मात्र तो हरला नाही. पुन्हा पुन्हा त्यानं स्वत:ला कोर्टावर उतरवलं. सिद्ध केलं. आणि आता तर काय १९ ग्रँडस्लॅम जिंकत विक्रमाचं एव्हरेस्टचं गाठलंय.

‘फेडरर भलताच फॉर्मात आहे. त्याला रोखणं कठीण. मरिन सिलिचच्याही पायाला दुखापत झाली आहे. हा सामना पूर्णपणे एकतर्फी होणार..’, असं मी माझ्या एका सरांना सांगितलं. तेव्हा ते पटकन म्हणाले, ‘देव विरुद्ध माणूस असा सामना कायम एकतर्फीच होतो.’ रविवारी झालेल्या विम्बल्डनच्या फायनल मॅचच्या आधीचे हे शब्द. आणि अपेक्षेप्रमाणे रॉजर फेडरर जिंकलाच. तेव्हा वाटलं हा टेनिससाठीच जन्माला आलाय! सचिन तेंडुलकरला आपण क्रिकेटचा देव म्हणतो. क्रिकेट आणि सचिन एकरूप झालेले दिसतात तसंच सारं फेडररसाठीही म्हणावंसं वाटतं. चाहत्यांनाच काय पण तो न आवडणाऱ्यांनाही खूश करणारा त्याचा खेळ, प्रतिस्पर्धी खेळाडूचंही मन जिंकणारा त्याचा सर्वोत्कृष्ट खेळ आणि खेळाप्रतीचं समर्पण. आपले शब्द संपतात तिथं फेडररचा खेळ सुरू होतो आणि जिंकण्या-हरण्यापलीकडचा आनंद देतो. हरणं हा शब्दच माहिती नसावा त्याच्या जिंकण्याच्या जिद्दीला. कितीही अडचणी आल्या, वयानं का-कू करायला सुरुवात केली, काही लोकांनी फेडरर संपला म्हणून ढोल पिटले. पण तो शांत होता. स्वत:च्या खेळावरच फोकस करत राहिला. आणि शेवटी जिंकून दाखवत त्यानं एकच गोष्ट पुन्हा सांगितली, आपल्याला जिंकायचं असलं, जिंकायचंच असं आपण ठरवलं तर जिंकता येतंच. खरंतर फ्रेंच ओपनमधलं त्याचं रेकॉर्ड म्हणावं तसं चांगलं नाही. यूएस आणि आॅस्टे्रलियन ओपन प्रत्येकी ५ वेळा, तर विम्बल्डन तब्बल आठ वेळा त्यानं आजवर जिंकली. फ्रेंच ओपन मात्र एकदाच जिंकता आली. पण प्रयत्न त्यानं कधीच सोडले नाही. आणि अमेरिकेचा महान खेळाडू पीट सँप्रासच्या १४ ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विम्बल्डन जिंकताना तर फेडररने सँप्रासचा विक्रम मोडला आणि नवा विश्वविक्रम रचला. आता तर फेडररने १९ ग्रँडस्लॅमचं विक्रमाचं एव्हरेस्टच गाठलंय. हा फरक असतो हिरो आणि सुपरहिरोमध्ये! हिरो हा काही काळापुरता राजा असतो. सुपरहिरो मात्र कायमचा राजा असतो. पुन्हा पुन्हा स्वत:ला पणाला लावतो. हरण्यासारखं खूप काही असताना जिंकण्याच्या ईर्ष्येनं मैदानात पुन्हा पुन्हा उतरतो. हरण्याचं भय कमी आणि जिंकण्याची जिद्दच जास्त असते त्याच्यात. आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा जिंकतो. त्याचं यश हे तात्कालिक नसतं. यश हेच त्याच्या सातत्याचं नाव असतं. फेडररने हेच तर सिद्ध केलं आहे. तो टेनिसविश्वाचा सुपरहिरो आहे. आज वयाच्या पस्तिशीत तो एखाद्या युवा खेळाडूप्रमाणे टेनिस कोर्टवर उतरतो. वावरतो. आणि जिंकतो. १०-१२ वर्षांपूर्वी तो ज्या चपळाईनं, ज्या तडफेनं खेळायचा तीच तडफ, तेच पर्फेक्शन त्याच्या आजच्या खेळातही दिसतं. म्हणून तर आजही त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना प्रत्येक स्पर्धेत घाम फुटतो. फेडररचं, त्याच्या जिद्दीचं आणि इनिंगचं हे ‘सेकंड व्हर्जन’ आहे. आणि त्याचं रहस्य आहे तंदुरुस्ती. कोणत्याही खेळाडूनं कितीही मोठं यश मिळवलं किंवा कितीही मोठा कीर्तिमान रचला, तरी टीकाकारांचा ग्रुप काही ना काही कमीपणा शोधत असतोच. आताही बोलणारे बोलतातच की, विम्बल्डनमध्ये नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल आणि अँडी मरे हे प्रमुख प्रतिस्पर्धी लवकर बाद झाल्यानं फेडररला विजयाची संधी मिळाली. पण मुळात या तिन्ही खेळाडूंपेक्षा वयाने ४-५ वर्षानं मोठा असलेला फेडरर कोणत्याही दुखापतीविना आणि विशेष म्हणजे एकही सेट न गमावता जेतेपद जिंकतो ही गोष्ट काय सांगते? त्याचे तरुण प्रतिस्पर्धी दुखापतीशी झुंजत उपांत्य फेरीआधीच स्पर्धेबाहेर पडतात आणि फेडररचा फिटनेस मात्र याही वयात आश्चर्यचकित करतो हे सारं काय आहे? ही आहे त्याची फिटनेस आणि खेळावरची मेहनत. आजही फेडरर आपला पूर्वीसारखाच खेळतोय. वेगवान सर्व्हिस, दमदार फोरहँड- बॅकहँड, जबरदस्त रिटर्न आणि अप्रतिम ड्रॉप शॉट. फेडररने २०१२ साली विम्बल्डन जिंकली होती. मात्र २०१२ नंतर येत असलेल्या अपयशामुळे फेडररसाठी ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणं शक्य होईल की नाही अशी अनेकांना शंका होती. दरम्यान, जोकोविच आणि मरे यांनी आपली सत्ता गाजवण्यास सुरुवात केली होती. वयाची तिशीही यादरम्यान उलटलीच. खरंतर रुढार्थानं टेनिसमध्ये आणखी काही मिळवण्याचं शिल्लक नव्हतं. त्यामुळेच फेडररच्या निवृत्तीबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या. तरीही आपले प्रयत्न न सोडता फेडररने दोनदा विम्बल्डनच्या आणि एकदा अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली. परंतु जेतेपद हुकलंच. त्यातच त्याला दुखापतींनी ग्रासलं. पाठ आणि गुडघा दुखापतीमुळे त्यानं अनेक स्पर्धांतून माघार घेतली. त्याचं माघार घेणं अनेकांना तो संपल्याचं निदर्शक वाटत होतं. मात्र त्यानं फक्त आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं. आणि कमबॅक करत फेडररने जानेवारी २०१७ पासून सर्व गणितं पुन्हा बदलण्यास सुरुवात केली. कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालला नमवून आॅस्टे्रलियन ओपन पटकावत २०१७ वर्षाची धडाक्यात सुरुवात केली. यानंतर त्यानं इंडियान वेल्स, मियामी मास्टर्स आणि हॅले ओपन स्पर्धा जिंकत प्रतिस्पर्धी खेळाडूंपुढे पुन्हा तगडे आव्हान उभे केले. फ्रेंच ओपनसह इतर क्ले कोर्ट स्पर्धांमध्ये न खेळण्याचा निर्णय त्यानं घेतला. त्याचा त्याला नक्कीच फायदा झाला. कारण जी कमजोरी ते त्यानं टाळलं आणि फक्त जिंकण्यावरच फोकस केलं. गेल्या रविवारी विम्बल्डन जिंकल्यानंतर आनंदानं रडत असलेला फेडरर पाहिला आणि वाटलं याला म्हणतात जिंकणं. जिंकण्यासाठी खेळणं. टेनिस कोर्टावरच नाही, तर आयुष्याच्या कोर्टात आव्हानांशी खेळतानाही तो जिंकलाच, कायमच. कारण तो फेडरर आहे.  

Web Title: Federer ... Hernan does not contain the word

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.