D आणि F च्या मधला E

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 12:34 PM2018-01-04T12:34:25+5:302018-01-04T12:34:31+5:30

अठरावं लागणं ही घटनाच मोठी रोमांचक! डोक्याचं बिनधास्त भिरभिरं होण्याचा आणि उडते पाय जमिनीवर टेकण्याची सक्ती डाचण्याचा टप्पा!!! २०१८ च्या सुरुवातीला अठरावं लागलेल्या पिढीच्या आयुष्यात ‘डोकावणारा’ विशेष अंक

E between D and F | D आणि F च्या मधला E

D आणि F च्या मधला E

Next

- विश्राम ढोले

२००० सालात जन्मलेले तुम्ही! आता अठराचे होणार!!!
...तुमची गोष्ट इतरांपेक्षा जरा वेगळी.
या डिजिटल शतकातले तुम्ही पहिले नेटिव.
इंटरनेट तर तुमच्या पाचवीलाच पुजलेले.
गुगल तुमच्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठा.
हॅरी पॉटरही फक्त तीन वर्षांनी मोठा.
तुम्ही केजीमध्ये होता तेव्हा म्हणजे
2004 मध्ये जीमेल, फेसबुक आणि आॅर्कुटचा जन्म झाला.
आॅर्कुट अल्पायुषी ठरला, गेला बिचारा!
यूट्यूब तर तुमच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान.
ट्वीटर तिच्यापेक्षा एकच वर्षांनी लहान.
पण तुम्ही काही त्याला तुमच्यात घेत नाही.
आणि बडबड्या व्हॉट्सअ‍ॅप तर तुमच्याहून नऊ वर्षांनी लहान.
पण सध्या तोच तुमचा बीएफएफ ठरलाय.
या अशाच जगाचे तुम्ही पहिलेच प्रौढ नागरिक.
नव्या आयुष्यात लॉग इन करताय पण..

ऐसा पहली बार हुआ है १७-१८ सालोमें, अनदेखा अन्जाना कोई, आने लगा खयालोेमे... दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नावाच्या सिनेमात साडेसतरा वर्षांची काजोल तिच्या आईला हे सांगत होती, तेव्हा ते फार नवलाचं होतं. ... आपल्याला ‘कुणीतरी’ खुणावतोय हे पावसात भिजत आईला सांगायचं म्हणजे काय चेष्टा आहे का?
आज पस्तिशी ओलांडलेले तेव्हा १७-१८ वर्षांचे होते. किती बदललं जग!!
सचिन रिटायर्ड होऊन थेट कोहलीचा काळ आला.. हे सारं होत असताना एक पिढी खºया अर्थानं ‘तरुण’ होतेय.. त्यांचं वय आणि कॅलेण्डरवरचं वर्ष यापुढची सारी वर्षे एकच असणार आहे.
पाठीवर भूतकाळाचं ओझं कमी आणि अभावाच्या, खस्ता खाण्याच्या आठवणीही तुलनेनं कमीच. अठरावं लागलं की एरव्हीही जगण्याचा नूर बदलतोच. इथं तर एका पिढीलाच अठरावं लागतंय..
... त्या तरुण होण्याचं हे सेलिब्रेशन.
१८ व्या वर्षी डोक्यात वळवळणाºया पागल किड्यांच्या मस्तीचं.
जगापासून पळत जगणं घडवणाºया जिंदादिलीचं आणि काही करण्याच्या आणि अजिबात ‘न’ करण्याच्या
मनमुक्त स्वातंत्र्याचंही..
२०१८ च्या सुरुवातीला या ‘अ‍ॅडल्ट’ होण्याचं सेलिब्रेशन नाही करायचं,
तर कधी?

..तर तुम्ही या वर्षी अठराचे होणार. जे चालू वर्ष तेच वय. कोणतीही वजाबाकी न करता आपले नेमके वय सांगण्याची अशी सोय शंभरात एखाद्याच्याच वाट्याला येते. भारीच. नव्या शतकात जन्मलेल्यांमध्ये तुम्ही सर्वात सिनिअर. मिलेनियमची पहिली बॅच. खरे म्हणजे तुमच्या रुपाने यावर्षी हे शतकच अठराचे म्हणजे अ‍ॅडल्ट होते आहे. हे तर अजूनच भारी.
आता उजळ माथ्याने ‘ए’ पिक्चर बघता येणार. म्हणजे याआधी डोअरकिपर आयकार्ड वगैरे मागत होते असे काही नाही; पण आता सगळं आॅफिशिअली. पोलीसमामांचेही तेच. गिअरची गाडी चालवताना दूर पोलीसमामा दबा धरून बसलेला दिसला की, जवळच्या गल्लीने कलटी मारण्याची आता गरज नाही. यावर्षी गिअरच्या गाडीचं पर्मनंट लायसन्स मिळणार. गाडीवरचा लाल रंगाचा ‘एल’ जाणार. उलट गुलाबी रंगाचा एल गाडीवर बसण्याची शक्यता जास्त. तसे झाले तर बेस्टच.
अठराचे झालो म्हणजे परवानग्या मिळण्याचे दिवस सुरू. काही आॅफिशिअली तर काही अनआॅफिशियली. म्हणजे असे की, मतदानाचा अधिकार मिळतो. मुलगी असाल तर लग्नाचाही अधिकार मिळतो. बँकेत फक्त आपल्या नावाचे स्वतंत्र खाते सुरू करता येते, पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स मिळते, प्रॉपर्टीबिपर्टीवर आपले नाव स्वतंत्रपणे लागू शकते. थोडक्यात म्हणजे मायनरचे मेजर, चिल्ड्रनचे अ‍ॅडल्ट, कायद्याने अज्ञानचे सज्ञान होता येते; पण हे झाले सरकारी. अनआॅफिशियलीही काही परवानग्या मिळू लागतात अठरापासून. स्वत:चा मोबाइल अजूनपर्यंत मिळाला नसेल तर तो मागण्याची आणि वाढदिवसाला तो मिळण्याची यावर्षी सर्वात चांगली संधी. तीच गोष्ट गाडीची. डेटिंगसाठी आॅफिशिअली परवानगी वगैरे देण्या-मागण्याची प्रथा फार रुळली नाहीय अजून आपल्याकडे. पण डेटिंगसदृश काही करत असाल तर मायबापूस थोडेबहुत दुर्लक्ष करण्याची शक्यताही आता वाढू लागते. ते जरा कूल कॅटॅगिरीतले असतील तर थोडाफार पॉकेटमनी वाढवून देणे, नाइटआउटला जास्त खळखळ न करणे, थोडी प्रायव्हसी देणे वगैरे बारकुले बारकुले चमत्कार घडू शकतात. आणि ते एकदमच कूल डूड कॅटॅगिरीतले असेल तर एखादे ड्रिंक आॅफर करणे, तुमच्या डेटिंगसाठी बॅटिंग करणे यासारखे महाचमत्कारही घडू शकतात; पण अर्थात त्यासाठी तुम्ही सहस्त्रकातले एक भाग्यवंत असावे लागता. बाकी एरवी अठरा लागले की, बहुतेकवेळा पालकांशी आपले छत्तीस व्हायला लागतात. एकतर बारावीपर्यंत रट्टा मारमारून दमायला झालेले असते. शरीराच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या प्रेशर कुकरमध्ये नुसती गरम वाफ कोंडलेली असते. दहावी, बारावीच्या आणि अ‍ॅडमिशनच्या शिट्या नीट वाजल्या तर ठीक, नाहीतर आतले करपून तरी जाते नाही तर वागण्या-बोलण्याचा सेफ्टिव्हॉल्व्ह तरी उडतो. त्यात कॉलेजचा आणि अठराचा उंबरा एकामागे एक लागतो. सरकारी परवानग्यांचे दरवाजे उघडू लागतात. घरगुती परवानग्यांच्या खिडक्या किलकिल्या होऊ लागतात. कॉलेजच्या हवेत मग कोंडलेले सारेच बाहेर येऊ बघते. कशाला आणि कसे आवरावे कळेनासे होते. अचानक आलेल्या अठरामुळे घरी-दारी छत्तीस होण्याचा धोका वाढू लागतो.
अठरासोबत फक्त ड्रायव्हिंग आणि डेटिंगचे ऊ च येतात असे नाही. काही ऋ देखील नव्याने भेटू लागतात- फन, फुड्, फॅशन, फिल्म्स, फे्रण्ड्स आणि फेसबुक.. बस बस.. इतकेच ‘फ’ पुरे. अजून ऋ अ‍ॅड करू नका, यू डर्टी मार्इंड!! या ऊ आणि ऋ च्या नादात मधल्या ए म्हणजे एज्युकेशनचे मधल्यामध्ये सँडविच नाही झाले म्हणजे मिळवले.. नाहीतर अठरा संपता संपता बॅक लागण्याचा किंवा डीसी होण्याचा नवा धोका आहेच. थोडक्यात काय, अठरा म्हणजे टर्निंग पॉर्इंट. गिअर नीट पडले, ब्रेक नीट लागले तर ठीक, नाही तर गाडी स्कीड होण्याची भीती आहेच.
आता हे अठराचे हे पुराण फक्त तुम्हालाच लागू आहे असे काही नाही. दरवर्षी अठराची रेषा पार करणाºयांना हे लागू आहेच. पण तुमची गोष्ट इतरांपेक्षा जरा वेगळी आहे. या शतकातच जन्म घेऊन प्रौढ झालेली तुमची पहिली बॅच. या डिजिटल शतकातले तुम्ही पहिले नेटिव्ह. एतद्देशीयसारखे एतद्शतकीय. त्यामुळे इंटरनेट तर तुमच्या पाचवीलाच पूजलेले. तुमच्या मित्रमंडळींची गॅँगही वेगळी. म्हणजे गुगल तुमच्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठा. तुमच्या कानात सदैव गुणगुण करणारे एमपी-थ्री प्लेअर्स आणि हाताशी असलेले जीटीए तीन वर्षांनी मोठे. तुमचा सवंगडी हॅरी पॉटरही फक्त तीन वर्षांनी मोठा. त्याचा पडद्यावरचा आणि तुमचा प्रत्यक्षातील जन्म तर एकाच वर्षातला. एक्सबॉक्स एक वर्षांनी लहान. तुम्ही केजीमध्ये होता तेव्हा म्हणजे २००४ मध्ये जी-मेल, फेसबुक आणि आॅर्कुटचा जन्म झाला. आॅर्कुट अल्पायुषी ठरला. तुम्हाला त्याच्याशी फार खेळताच आले नाही. चार वर्षांपूर्वी गेला बिचारा. तुमची आवडती यू ट्यूब तुमच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान. ट्विटर तिच्यापेक्षा एकच वर्षांनी लहान. पण तुम्ही काही त्याला तुमच्यात घेत नाही. याउलट २००७ चा आयफोन तुमच्यात जास्त मिसळत नाही; पण तुम्हाला मात्र त्याचे जाम आकर्षण. बडबड्या व्हॉट्सअ‍ॅप तर नऊ वर्षांनी लहान. पण सध्या तोच तुमचा बीएफएफ ठरलाय. बाकी इन्स्टा-स्नॅपचॅट वगैरे तर दहा-अकरा वर्षांनी लहान. पण तुम्ही त्यांच्याशीही दोस्ती केलीय.
जन्मापासूनच इतक्या वेगळ्या मित्रमंडळींच्या संगतीत वाढलेली तुमची कदाचित पहिलीच पिढी. तुम्हाला त्यांच्या सगळ्या लीला अंगवळणी-हातवळणी पडल्या आहेत. तुमच्या आई-बाबांच्या किंवा शिक्षकांच्या पिढीचे तसे नाही. एखादा नवा स्मार्टफोन हाती आला की, मित्राच्या गळ्यात गळा घालून त्याच्याशी गप्पा कराव्या तसे तुम्ही त्याचे सारे अंतरंग-बहिरंग काढून घेता. आणि तिकडे तुमच्या आई-बाबांचा मोबाइलच्या नव्या फिचर्सबाबत ‘ढुंढो ढुंढो रे साजना’चा खेळ चाललेला असतो. ते साहजिकही आहे, कारण जेव्हा ते १८ चे झाले तेव्हा म्हणजे १९८५-९० च्या सुमारास पीसी तर सोडाच साधा लॅण्डलाइनही बहुतेकांच्या आवाक्याबाहेर होता. तुम्ही घसरबसल्या क्षणात तुमच्या फोनवर शंभर-दोनशेचा रिचार्ज मारू शकता. त्यांना त्यावेळी साधा एसटीडी करायचा तर घराबाहेर पडून पिवळ्याकाळ्या बूथमध्ये रांगेत नंबर येण्याची वाट पहावी लागायची. कॉलरेट कमी पडतो म्हणून रात्री दहा-अकरानंतर बूथवर जायचे ते. तुमच्या मोबाइलमध्ये हॉटस्टार, व्हूट, यू ट्यूब वगैरे आहे. आणि तुम्ही तुमच्या मर्जी आणि सोयीनुसार वाट्टेल तो टीव्ही बघू शकता. गेम आॅफ थ्रोनचा सीझन तिकडे रिलिज होत नाही तर तुम्ही इकडे तो डाउनलोड करून पाहू शकता. आई-बाबा-मास्तरांची पिढी तुमच्याएवढी होती तेव्हा असलाच तर दूरदर्शनचा एकमेव पडदा त्यांना उपलब्ध होता. सिनेमा थिएटरातही पडदा एकच. पण ढेकणं हजार. त्यांच्यासोबत पंख्याच्या हवेत चणेफुटाणे खात त्यांनी अमिताभ-रेखाचे पिक्चर बघितलेत. तुम्ही बहुतेकवेळा मल्टिप्लेक्सच्या एसीत बसून वाफाळलेले कॉर्न किंवा गरमागरम पॉपकॉर्न खात बाहुबलीचा थरार अनुभवता. तुम्ही जन्मापासून इंटरनेट, मोबाइल, सुपर मार्केट किंवा मॉल पाहात आलाय. त्यांना ते अनुभवायला किमान तिशी-पस्तीशी गाठावी लागलीय.
सुकाळाचीही काही आव्हाने असतात आणि दुर्भिक्षाचे काही फायदेही असतात. सगळे काही उपलब्ध असेल ना तर त्याची किंमत काही राहत नाही. आपण गोष्टी गृहीत धरायला लागतो. त्यांच्यावर विसंबून राहायला लागतो. आता संवादाची साधने इतकी उपलब्ध आहेत. म्हणून आपण माणसे गृहीत तर धरायला लागलेलो नाही ना? लव यू, मिस यू, आॅस्सम, अमेझिंगची कारंजी सगळीकडे उडताहेत म्हणून आपण भावनांचे खोलवरचे झरे तर विसरत चाललो नाहीत ना? फोटो, व्हिडीओ आणि इमोजी सगळा संवाद व्यापून टाकत असताना आपले भाषेचे बोट सुटत तर चालले नाही ना? चकाकत्या स्क्रीनवरच्या दुनियेमध्ये रममाण होताना धूळभरल्या दुनियेशी आणि त्यातल्या हाडामासांच्या माणसांशी आपला स्पर्श कमी तर होत चाललेला नाही ना?

आई-बाबाच्या किंवा मास्तरांच्या पिढीशी कन्व्हर्शन करा. तिथे टेक्नॉलॉजीची तेवढी गरज नाही. कारण दुर्भिक्षाच्या काळाने त्यांना गोष्टींची किंमत करायला, विसंबणे कमी ठेवायला, भाषेशी खेळायला, चालत्या-बोलत्या माणसांशी संवाद साधायला जरा बºयापैकी शिकवले आहे. पाहा तुम्ही त्यांना टेक्नॉलॉजी शिकवा. ते तुम्हाला संवाद शिकवतील. विन विन आहे ना प्रपोजल?
पण एक गोष्ट ते नाही शिकवू शकणार तुम्हाला. ती तुम्हालाच शिकावी लागेल. सुकाळ म्हणजे खूप उपलब्धता. पर्यायांचा महापूर. म्हणजे त्यातून नेमकी निवड करणे आले. अनेक पर्यायांमधून नेमका योग्य पर्याय निवडणे हे काही तुमच्या आई-बाबांच्या आणि मास्तरांच्या पिढीला असे आतून येत नाही. त्यांच्या कळत्या वयात, पिंड घडण्याच्या काळात नव्हतेच पर्याय इतके. इतका चॉईस नव्हताच. तुम्हाला तर पदोपदी निवड करावी लागते. थोड्याथोडक्या नव्हे तर अनेकानेक पर्यायांमधून. माहितीचा महापूर, प्रॉडक्ट्सचा महापूर, संवादाचा महापूर. इतकेच कशाला करिअर, आभासी नाती, आकर्षण आणि खºया-खोट्याचाही महापूर. जत्रेत किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर लहान मुलांचे जसे हे करू का ते, हे खाऊ का ते असे भिर्रर्र होते ना, तसे तुमचे होत चालले आहे. निवड केली तरी अरेरे, याऐवजी ते निवडले असते, तर बरे झाले असते; अशी हळहळ तुमच्या वाट्याला अधिक येणार आहे. निवडीची आणि निवड करण्याच्या स्वातंत्र्याची किंमत चुकवावीच लागते. ‘चॉईस फ्रीमे नही होता, उसपे डिस्काउंट भी नही मिलता बॉस’ हे शिकावे लागेल. निवडीची तत्त्वे शिकावी लागणार आहेत. त्याचे काहीएक शास्त्र बनवावे लागणार आहे. त्याची काही नीतिमूल्ये ठरवावी लागणार.
नव्या प्रदेशात पहिली वस्ती करणाºयांना कसे सगळे कष्टाने, चुकत-धडपडत पण नेटाने आणि प्रामाणिकपणे उभारावे लागते; दूरदृष्टीने विचार करून सिस्टिम्स लावाव्या लागतात; तसेच आहे हे. एकविसाव्या शतकातले, डिजिटल विश्वातले, नेटवर्क

 

दूरी नाही दरीच!
तुम्ही सुकाळातील बालके आहात. यू आर चिल्ड्रन आॅफ अबण्डन्स अ‍ॅण्ड दे आर प्रॉडक्ट आॅफ स्केअर्सिटी. अर्थात, ही तक्र ार नाही. फक्त वास्तव आहे. जनरेशन गॅप सगळ्याच पिढ्यांमध्ये असते, पण मागच्या शतकातले पालक आणि त्यांची या शतकातील प्रौढ मुले यांच्यातील ही गॅप नाही, गल्फ आहे. दूरी नाही, दरी आहे. म्हणून त्यांनी जसे तुम्हाला समजून घेतले पाहिजे तसे तुम्हीही त्यांना समजून घेतले पाहिजे. तुमच्या या सगळ्या शाळूसोबतींशी, त्यांच्या स्वभावाशी जमवून घेताना त्यांची बरीच दमछाक होते, कधीकधी तर भंबेरी उडते. टीव्हीएफचे ‘टेक कन्व्हर्सेशन्स वुईथ डॅड’चे भाग पाहिलेत का? त्यांच्याप्रमाणेच तुमचे आई-बाबा या गॅजेट्स आणि अ‍ॅपचे अतरंगी फिचर्स कदाचित शिकतीलही. पण तुमच्या इतके त्यांचे अंतरंग नाही जाणू शकणार. म्हणूनच तुमच्यातले कन्व्हर्सेशन फक्त टेक्नॉलॉजीपुरते नाही तर अंतरगांपर्यंत जाण्याची गरज आहे. दोघांसाठीही.

 vishramdhole@gmail.com

 

Web Title: E between D and F

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.