ब्रिटिश फॉर्म्युला थ्री कार रेसिंग स्पर्धेत पराक्रम करणार चॅम्पिअन कृष्णराज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 02:47 PM2017-09-06T14:47:59+5:302017-09-07T07:09:04+5:30

१९ वर्षांचा कोल्हापूरचा तरुण. गाड्या आणि स्पीड हे त्याचं पॅशन.त्या पॅशनसाठी मेहनत घेत तो पहिल्यांदाच ब्रिटिश फॉर्म्युला थ्री कार रेसिंग स्पर्धेत उतरला आणि थेट जिंकलाच. १९ वर्षानंतर असा पराक्रम करणारा हा दुसरा भारतीय तरुण. त्याच्याशी या खास गप्पा..

Champion Krishnaraj will be leading the British Formula 3 car racing championship | ब्रिटिश फॉर्म्युला थ्री कार रेसिंग स्पर्धेत पराक्रम करणार चॅम्पिअन कृष्णराज

ब्रिटिश फॉर्म्युला थ्री कार रेसिंग स्पर्धेत पराक्रम करणार चॅम्पिअन कृष्णराज

googlenewsNext

सचिन भोसले

मुलं लहान असल्यापासून गाड्या गाड्या खेळतात, त्यांना स्पीडचं वेड असतं. घरात गाड्यांचा ढीग होतो. आता तर रिमोटवरच्या कारचा स्पीडच काय मोबाइल गेममधल्या गाड्यांच्या रेसही अनेकजण इर्ष्येनं खेळतात. जिंकतात. पण वयाच्या आठव्या वर्षापासून गाड्या, त्यांचा स्पीड, गो कार्टिंगचे ट्रॅक हे सारं पाहणाºया, त्याचं पॅशन असणाºया एका तरुणानं वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी एक अत्यंत प्रतिष्ठेची रेसिंग स्पर्धा जिंकण्याची कमाल करून दाखवली.
कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकची ही गोष्ट. युरोप खंडातच नव्हे तर जगभर अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाºया ‘बीआरडीसी ब्रिटिश फॉर्म्युला थ्री’ रेसिंग स्पर्धेत त्यानं अलीकडेच पहिलं स्थान पटकावलं. विशेष म्हणजे फॉर्म्युला थ्री रेसिंग स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू. १९ वर्षांपूर्वी नरेन कार्तिकेयन यानं ही स्पर्धा जिंकली होती. आणि आता कृष्णराजनं ही कमाल करून दाखवली आहे. कोल्हापूरचा हा चॅम्पिअन खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा. खरं तर तो २०१८ सालच्या स्पर्धेत उतरायची तयारी करत होता. मात्र त्याच्या टीमनं डबल रेसिंग स्पर्धेचं डील साइन केलं आणि कृष्णराजला सांगितलं की याच वर्षी स्पर्धेत उतर. आव्हान होतंच; पण कृष्णराजची तयारी सुरूच होती. त्यानं सहभागी व्हायचं ठरवलं. आणि जगभरातून आलेल्या सरस, कुशल ड्रायव्हर्सच्या स्पर्धेत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करत ही फॉर्म्युला थ्री स्पर्धा जिंकली. आता तो ग्रँड प्रिक्स-२, फॉर्म्युला-२ या प्रतिष्ठित लढतींसाठी पात्र होण्यासाठी तयारी करतो आहे.
आपण रेसिंग स्पर्धा पाहतो, सिनेमातलं रेसिंग पाहतो, गो कार्टिंग ट्रॅकवरचा थरार अनुभवतो. पण तो वेग हाताळणं सोपं नसतं. त्यातही कार रेसिंग हा तर वेगाचा खेळ. अत्यंत वेगवान गाड्या, त्या चालवणारे, कण्ट्रोल करणारे अत्यंत कुशल ड्रायव्हर, प्रत्येक सेकंदाला या खेळात चुरस असते. एका सेकंदानं हार-जीत ठरते. आणि दर क्षणी चढाओढ करत वेगावर स्वार होत रेसिंग कार ड्रायव्हर आपलं ध्येय गाठतात. जो खेळ पाहणं इतकं थरारक तो प्रत्यक्षात खेळणं किती थरारक असेल असा प्रश्न होताच..
तोच सोबत घेऊन ठरवलं की कृष्णराजला भेटायचं. त्याची कोल्हापुरात भेट झाली आणि त्याला विचारलंच की, एवढ्या लहान वयात रेकॉर्डब्रेक कामगिरी केलीस, कसं जमवलंस? काय तयारी केली?
कृष्णराज सांगतो, फॉर्म्युला वन रेसिंग म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती व मनाची एकाग्रता फार महत्त्वाची. एकेका क्षणाची ही स्पर्धा. फॉर्म्युला थ्री मध्ये सहभागी व्हायचं ठरण्याआधीपासून मी फिटनेसवर काम करत होतोच. वजन नियंत्रित होतं. वजन वाढता कामा नये, स्टॅमिना उत्तम हवा हे तर फार गरजेचं. थोडं जरी वजन वाढलं तरी आपल्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव आम्हाला असतेच. आणि दुसरीकडे रेसमध्ये एका मायक्रो सेकंदाचा फरक पडला तरी काही खैर नाही अशी स्थिती. त्यामुळे मनाची एकाग्रता, फोकस्ड असणं हे फार महत्त्वाचं असतं. गाडीचा वेग तर राखायचा, वाढवायचा, गाडीचा कण्ट्रोल उत्तम हवा आणि तितक्याच चपळाईने ओव्हरटेकिंगही करायचं असतं. आपल्याला तत्काळ निर्णय घ्यायचा असतो. तोही अचूक. त्यात रेसमध्ये प्रत्येक मायक्रो सेकंदाला वळणं असतात. त्यावेळी कशी गाडी पळवायची याचा निर्णय करावा लागतो. निर्णय अचूक घेतला तर वेळ गाठली जाते.’
कृष्णराज सांगत असतो. चॅम्पिअनशिप जिंकून आलेला हा मुलगा. पण तो बोलतो तेव्हा त्याच्याकडे पाहताना रेसिंगची पॅशन जाणवते. तो भरभरून बोलतो. सांगतो की, जगभरातील विविध देशांना भारताबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. उद्योग-व्यापाराबरोबरच खेळ, पर्यटन अशा विविध माध्यमांतून जगभरातले लोक भारताशी जोडले जात आहेत. रेसिंगसारख्या खेळात तर आता दिल्ली, कोईम्बतूर, चेन्नईसारख्या शहरांतले ट्रॅक्स जगप्रसिद्ध आहेत. नरेन कार्तिकेयन, करुण चंडू यांसारख्या भारतीय खेळाडूंनी जगभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. जिहान दारूवाला, अर्जुन मैनी, तरुण रेड्डी हे प्रख्यात रेसिंग कारचालक फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये नाव कमवत आहेत. या खेळाविषयी माहिती आणि उत्सुकता तरुण मुलांमध्येही वाढते आहे. त्यामुळे रेसिंगला आपल्याकडेही उत्तम फ्युचर आहे असं सांगत कृष्णराज आपले पुढचे प्लॅनही सांगत असतो.


जिंकण्याचं सातत्य
गो-कार्टिंग, फॉर्म्युला फोर या स्पर्धांमध्ये कृष्णराज महाडिकने आपला ठसा आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटविला आहे. २००७ मध्ये मोहितेज रेसिंग ट्रॅकवर धु्रव मोहिते यांच्यासह गो-कार्टिंग शर्यतीमध्ये प्राथमिक स्तरावर त्यानं सहभाग घेतला. गो-कार्टिंगचे प्रशिक्षक सचिन मंडोडी यांनी कृष्णराजचे रेसिंगमधील गुण हेरून त्याला अधिकचा सराव करण्यासाठी प्रोत्साहन दिले. याच ट्रॅकवर ‘एमआरएफ’ने राष्ट्रीय गो-कार्टिंग स्पर्धा भरविली होती. त्यात सहभाग घेत त्याने पाचवा क्रमांक मिळविला. २००८ साली जे. के. टायर्सच्या राष्ट्रीय गो-कार्टिंग स्पर्धेत त्याने अव्वल क्रमांक मिळविला. त्यानंतर २०१२-१३ मध्ये ज्युनिअर राष्ट्रीय गो-कार्टिंगचे विजेतेपद मिळविले. मलेशिया येथेही त्याने याच दरम्यान चॅम्पियनशिप मिळविली. सन २०१३ मध्ये न्यू ओलीस (अमेरिका) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गो-कार्टिंगमध्ये सहभाग घेत अव्वल क्रमांक मिळवला. २०१३ मध्ये जे. के. टायर्सने भरविलेल्या रेसिंगमध्ये फॉर्म्युला बीएमडब्ल्यूने कृष्णराजला प्रायोजकत्व दिले. यात त्याने मजल-दरमजल करीत २०१४ व २०१५ मध्ये पहिल्या तीनमध्ये येण्याची किमया केली. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल इंग्लंडमधील ख्रिस डिटमन रेसिंग टीमचे प्रमुख ख्रिस डिटमन यांनी घेतली. आपल्या टीममध्ये रेसर म्हणून करारबद्ध करत ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर्स क्लबमध्ये त्याला संधी मिळाली.

आणि पहिल्याच संधीचं त्यानं सोनं केलं.
या प्रवासात कृष्णराजला त्याचे वडील खासदार धनंजय महाडिक, आई अरुंधती महाडिक, भारतातील प्रशिक्षक सचिन मंडोडी, चित्तेश मंडोडी व वेलोची स्पोर्ट्सचे जॅक क्लार्क, रूपर्ट कुक यांनी सोबत केलीच. त्यांचं प्रोत्साहनही बळ देणारंच ठरलं.

कृष्णराजची गाडी
बीआरडीसी ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत टायटॅस क्रॉसवर्थचे २००० सीसीचे इंजिन असलेली जगातील सर्वांत वेगवान, परदेशी कार वापरली. ही कार कार्बन फायबरपासून अत्यंत हलक्या वजनाची बनविलेली आहे. या कारसाठी कोरड्या हवामानाला उपयुक्त टायर वापरले जातात. ताशी २०० किमीपेक्षा अधिक वेगाने पळणारी ही कार.

Web Title: Champion Krishnaraj will be leading the British Formula 3 car racing championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.