इन बिटवीन- डोक्याला भुंगा लावणारी ही शॉर्टफिल्म पाहिली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 04:29 PM2018-12-13T16:29:11+5:302018-12-13T16:29:23+5:30

आपल्याला जे हवं ते आताच हवं, थ्रिल हवं, आनंद हवा म्हणून माणसं पळतात. पण जे हवं ते मिळून तरी आनंदी असतात का? की शोधतच राहतात, आपल्याला नेमकं काय हवंय? या प्रश्नाचा भुंगा डोक्याला लागतो तेव्हा.

In between - did you see the short film? | इन बिटवीन- डोक्याला भुंगा लावणारी ही शॉर्टफिल्म पाहिली का?

इन बिटवीन- डोक्याला भुंगा लावणारी ही शॉर्टफिल्म पाहिली का?

Next
ठळक मुद्देआपल्याला काय हवं,  हा प्रश्न भुंगा लावतोच.

- माधुरी पेठकर

शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढतोय. शहराच्या पोटात राहणार्‍या माणसांचा धावण्याचा वेग वाढलाय. माणसांची भूक वाढलीय, हाव वाढलीय. एक मिळवलं की दुसरं मिळवण्याची मग तिसर्‍यावर झेप घेण्याची इच्छा बळावलीय. आपल्याकडे जे आहे ते पटकन जुनं झाल्यासारखं वाटतं. जगणंच रूटीन होतंय, जगण्यात थ्रिल हवं असं वाटतं. हरएक नात्यातली माणसं साचेबद्ध वागत असल्याचा भास होतो. माणसांनी चौकटी तोडून वागण्याची अपेक्षा वाढलीये.
इच्छा नुसती इच्छेच्या पातळीवर राहून नंतर पाण्याच्या थेंबासारखी सुकून आणि शोषून जाण्याचे हे ते दिवस नाही. जे जे मनात उगवतंय ते ते पटकन पिकवून संपवण्याचे हे आधुनिक दिवस आहे. मनातली एकही इच्छा अपुरी राहता कामा नये असा फिल देण्या-घेण्याचा हा आधुनिक काळ. पण याच आधुनिक जगानं माणसाला गोंधळाचा अन् संभ्रमाचा शापही दिलाय. चकचकीत जगण्याच्या झगमगाटात तो दिसत नाही एवढंच.
या संभ्रमामुळेच माणसं नुसती हवं हवं म्हणत पिसाट पळत सुटलीय.  पण आपल्याला नेमकं हवं काय हे एक क्षण थांबून, स्वतर्‍मध्ये डोकावून स्वतर्‍ला विचारण्याची शक्ती हरवून बसली आहेत. पैसा, वस्तू, अनुभव, माणसं गोळा करत सुटली पण जे मिळतंय त्याचा आनंद घेण्याचा धागा त्यांच्या हातातून केव्हाच निसटून गेलाय. या संभ्रमानं माणसाला असमाधानी आणि अस्वस्थ राहण्याची चटक लावली आहे.
हे सारं उलगडतं अशुंमन जोशी लिखित दिग्दर्शित ‘इन बिटवीन’ या शॉर्ट फिल्ममध्ये. आपल्या 27 मिनिटांच्या अवकाशात ही फिल्म असं बरंच काही विचारत, सांगत राहाते.
आजूबाजूला टोलेजंग इमारती असलेल्या मोठय़ा शहरातल्या एका उंच इमारतीतल्या आलिशान फ्लॅटमध्ये प्रिया आणि विवेक हे जोडपं राहात असतं. दोघंही आधुनिक राहाणीमानाचे आणि आधुनिक विचारांचे प्रतिनिधी. बायको झोपेत असताना आपलं आपलं आवरून कामावर जाणारा विवेक. बायकोनं उठून चहा करून द्यावा एवढीही अपेक्षा तो ठेवत नाही. प्रिया नवर्‍याच्या मागे त्या मोठय़ा फ्लॅटमध्ये एकटी. टीव्हीसमोर बसून टाइमपास करणारी, मेकअपमध्ये गुंतून राहाणारी. पण इतकं आरामदायी जगणं दिमतीला असूनही प्रिया आनंदी नाही. तिला रोजच्या रूटीनचा उबग आलाय. तिला काहीतरी नवीन हवं आहे. नवर्‍यासोबतच्या शरीरसंबंधांमध्येही तिला तोच तोचपणा आल्यासारखा वाटतोय. हे फक्त प्रियालाच वाटतं असं नाही. विवेकचंही तसंच. जे वाटतं ते दोघंही करून बघतात. त्यासाठी प्रिया आणि विवेक आपल्या असण्याच्या चौकटी मोडून थोडं कल्पनेतल्या गोष्टींचा आधार घेतात. नात्यात आणि संबंधांमध्ये जे नावीन्य हवं आहे ते नवरा-बायको या भूमिकांना फाटा देऊन वेगळ्याच भूमिकांमध्ये शिरून अनुभवून बघतात. 
पण तरीही प्रिया आणि विवेक आनंदी असतात का, असा प्रश्न पडतोच. बायकोच्या हातचंच खायचं असा आग्रह धरणारा, धसमुसळ्या प्रणयाची अभिव्यक्ती करणारा विवेक एका टप्प्यानंतर त्या रोलमधून बाहेर पडतो. त्या रोलमध्ये उत्सुकतेनं शिरणारा विवेक त्यातून बाहेर पडताना मात्र अस्वस्थ दिसतो. प्रियाला नावीन्याचा अनुभव हवा असतो त्यासाठी ती तिच्या नेहमीच्या चौकटीतून बाहेरही पडून पाहाते. पण ज्यातून बाहेर पडली त्या जुन्याच दारावर पुन्हा थापा मारत राहाते. समाधान, आनंद, नवीन अनुभवाचं थ्रिल यातलं काहीही तिच्या चेहर्‍यावर दिसत नाही. दिसतो तो फक्त संभ्रम. मनातला गोंधळ. आपल्याला जे हवं ते मिळूनही नेमकं काय मिळालं किंवा मिळवलं हे चाचपडत ठेवणारा संभ्रम. 
इन बिटवीन या फिल्ममध्ये दोन टप्पे दिसतात. प्रिया  आणि विवेकच्या दोन भूमिका दिसतात. एका टप्प्यात नवा अनुभव घेण्यासाठी नैतिकतेची पायरी ओलांडून वागणारी ही दोघं दुसर्‍या टप्प्यात आपापल्या  नवरा-बायकोच्या भूमिकांमध्येही शिरतात. पहिल्या टप्प्यात मागणी, हाव, उपभोग दिसतो, तर दुसर्‍या टप्प्यात जुन्या झालेल्या लग्नामुळे नात्यात आलेली मरगळ दिसते, अपेक्षा आणि उपेक्षाही दिसते.  विवेकला छान वाटावं म्हणून प्रिया चहा शिकून घेते.  ‘उद्या सकाळी जाताना उठव माझ्या हातचा चहा करून देते ’ म्हणत विवेकला खुश करण्याचा प्रयत्न करते; पण विवेक या सगळ्याची गरज नाही म्हणत तिच्या उत्साहावर पाणी टाकतो. विवेककडून नावीन्याची अपेक्षा ठेवणारी प्रिया त्याला तू कॉलेजात जसा भेटला होता तसा होण्याची इच्छा व्यक्त करते. ‘माणसं बदलतात ती जशी पूर्वी असतात तशी राहात नाही आणि मी जर तसाच राहिलो तर तू बोअर होशील’ असं व्यावहारिक उत्तरं देऊन विवेक प्रियाची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. पण या उत्तरानंही प्रियाचं समाधान होत नाही. प्रियाच्या चेहर्‍यावर हो, नाहीचा संभ्रम मात्र तसाच राहातो.
आणि त्या संभ्रमात काही प्रश्न ठाशीवपणे दिसतात.
मानसशास्त्राची पदवी घेतलेल्या अशुमननं व्यवहारवादी वाटणार्‍या जगातला हा मानसिक स्तरावरचा झगडा संवेदशीलपणे दाखवला आहे. उथळ झालेल्या जगण्यात मनातला खड्डा खोदून स्वतर्‍च्या नितळ इच्छांचं प्रतिबिंब बघण्यासाठीचा जोरदार धक्का ही फिल्म देते. हा संवेदनशील झगडा थोडा स्फोटकपद्धतीनं मांडण्यासाठी झटणार्‍या अंशुमनला अमोल उपटेकर यांनी फिल्म निर्मितीसाठी मदत केली. अंशुमनची  ही पहिली शॉर्ट फिल्म तयार झाली. 
अंशुमनच्या मते, स्वतर्‍ला समजण्याचा प्रयत्न करणं ही आजच्या काळाची गरज आहे. शहरीकरणाला भुललेला माणूस आज स्वतर्‍शी, नात्यातल्या माणसांशी, मित्रांशी सगळ्यांशी दुटप्पीपणानं वागतो. हरप्रकारे वागून स्वतर्‍चं समाधान करून घेण्याचा प्रयत्न करतो; पण तरीही आपल्याला काय हवं,  हा प्रश्न त्याच्यामागे भुंगा लावतोच. तो भुंगा ती फिल्म पाहूनही मागे लागतोच.

ही फिल्म हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये आहे.
त्यासाठी लिंक  

https://vimeo.com/269387865 

 

Web Title: In between - did you see the short film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.