बी. ई. किया, पॅकेज लिया, सेव्हिंग्ज किये! ..और मर गये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 07:00 AM2019-01-24T07:00:00+5:302019-01-24T07:00:02+5:30

आयुष्यात काहीतरी ‘वेगळं’ करण्याकरता धडपडणार्‍या तारुण्याचा चेहरा कसा दिसतो?

Amrut Bang writes about young journey of meaningful life-Nirman! | बी. ई. किया, पॅकेज लिया, सेव्हिंग्ज किये! ..और मर गये?

बी. ई. किया, पॅकेज लिया, सेव्हिंग्ज किये! ..और मर गये?

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक प्रश्नावर काम करू इच्छिणार्‍या, जीवनाचा शोध घेणार्‍या युवक-युवतींना ‘का?’ याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे.

अमृत बंग

सत्तर-ऐंशीच्या दशकात अनेक तरुण-तरुणींनी सामाजिक कार्यात उडी घेतलेली आपल्याला माहीत आहे. त्यावेळचं वातावरणदेखील अशा प्रकारच्या निर्णयाला पोषक असं होतं. दरम्यानच्या काळात झालेल्या भांडवलशाहीच्या प्रसारामुळे आपल्या जीवनाकडे बघण्याचा आजच्या तरुणांचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. ‘अधिकाधिक पैसा कमावणं हेच जणू जगण्याचं एकमेव ध्येय आहे’ असा विचार अनेकांच्या मनावर बिंबलेला दिसतो. आणि म्हणून सामाजिक कृती तर दूर पण साध्या संवेदनशीलतेचादेखील अभाव अनेक ठिकाणी जाणवतो. विविध सामाजिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रश्न सोडविण्याचं आव्हान घ्यायला इच्छुक व सक्षम असे तरुण ‘चेंज मेकर्स’ फारसे नाहीत ही एक मोठीच अडचण आहे. यालाच हातभार लावते आजची शिक्षणव्यवस्था! सध्याचं शिक्षण हे फक्त माहिती देतं, क्वचित काही कौशल्य देतं पण अर्थपूर्ण हेतू मात्र देत नाही, आणि तरुणांचा केवळ आर्थिक शर्यतीत धावणारा घोडा बनवतं. निव्वळ परीक्षार्थी शिक्षणानं तरुणांचा ‘करिअर आणि पैसा’ या चढाओढीतला अभिमन्यू झाला आहे. याहून अधिक समृद्ध, समाधानी व उद्देश्यपूर्ण अशा जीवनापासून ते वंचित होत आहेत. 
अकबर इलाहाबादी यांचा एक प्रसिद्ध शेर जरा बदलून आज असा करता येईल.
‘हम क्या कहे ए इंजिनिअर, 
क्या करेनुमाया कर गये,
बी. ई. किया, पॅकेज लिया, 
सेव्हिंग्ज किये और मर गये.
जर असं व्हायचं नसेल तर मग जीवनात अर्थपूर्ण आव्हानं शोधणार्‍या युवापिढीची व समाजातील प्रश्नांची सांगड घालता येईल का, या विचारातून प्रेरित होऊन ‘निर्माण’चा जन्म झाला. तरुणांच्या आयुष्याला समाजाभिमुख प्रयोजन लाभावं आणि समाजातील प्रश्न सोडवण्याकरता कृतीसाठी त्यांना प्रेरित व सक्षम करावं, हा ‘निर्माण’ प्रक्रि येचा मुख्य उद्देश्य आहे. 
आज भारताची अर्धी लोकसंख्या 25 वर्षाखाली आहे. 2020 साली भारतातील लोकांचं सरासरी वय हे 29 वर्षे असेल जेव्हा की जपानमध्ये ते 48 वर्षे असेल. अर्थातच तरुण हा भारताचा चेहरा, ताकद आणि भविष्य आहे (फेस-फोर्स-फ्यूचर ऑफ इंडिया!). समाजातील जटिल आणि ज्वलंत अशा विविध समस्यांवर उपाय शोधणं हे आव्हान या पिढीसमोर आहे. सोबतच स्वतर्‍च्या जीवनासाठी आनंददायी प्रयोजन मिळणं, सुयोग्य करिअर निवडता येणं हेदेखील त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. हे दुहेरी आव्हान पेलण्यासाठी त्यांना सक्षम करावं या हेतूने चाललेली ‘निर्माण’ ही एक शोधप्रक्रि या आहे. 
या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी दरवर्षी आम्ही एक निवडप्रक्रि या करतो. अ‍ॅप्लिकेशन फॉर्म, मुलाखत आणि असाईनमेन्ट्स अशा तीन टप्प्यातून जाऊन शेवटी साधारण 200 जणांना आम्ही निवडतो. 
  ‘निर्माण’ची ही प्रक्रिया 2006 साली सुरू झाली.
गेल्या तेरा वर्षात या प्रक्रियेतून जाणारे अक्षरशर्‍ हजारो तरुण-तरुणी मी पाहिले. त्यांच्याशी संपर्क आला. बोलणं होत राहीलं. त्यांनी लिहिलेलं वाचायला मिळालं.
- त्यातून मला काय सापडलं?
तर आजच्या तरुण पिढीचा एक चेहरा दिसला.
त्याचेच हे काही रूप-रंग 

***
1. काही तरी करायचंयची अस्वस्थ ऊर्जा


  ‘मला समाजासाठी ‘काही तरी’ करायचं आहे’, असं निदान म्हणणारे असंख्य तरुण आजूबाजूला आहेत, हीच मुळात एक आशादायक गोष्ट! निर्माणमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करणार्‍या तरुणांची संख्या दरवर्षी वाढतच चालली आहे. त्यात मोठय़ा प्रमाणात (जवळजवळ 50 टक्के) मुली आहेत. महाराष्ट्रातील सर्व 36ही जिल्ह्यांतून, 230हून अधिक तालुक्यांतून आणि महाराष्ट्राबाहेरील अन्य 13 राज्यांतून तरु ण-तरु णी निर्माणमध्ये येऊ इच्छितात ही अत्यंत आश्वासक आणि आनंददायी बाब आहे. ‘युवा पिढीला समाजाचं काही पडलेलं नाही’ असं मानणार्‍यांनाही मोठीच चपराक आहे. 
 

2. ‘काही तरी’ म्हणजे नेमकं काय?
याचा प्रचंड गोंधळ

आता खरा प्रश्न मात्र त्याच्या पुढचा आहे. समाजासाठी ‘काही तरी’ करायचं म्हणजे ‘नेमकं काय’ करायचं याबाबतीत मात्र बर्‍यापैकी बोंबाबोंब आहे. रॅन्डम अ‍ॅक्ट्स ऑफ काइन्डनेस (उदा. झाडं लावणं, रक्तदान, अनाथालयात जाऊन कपडे/मिठाई वाटणं, मुलांना शिकवणं इ.) करणारे अनेक गट विविध कॉलेजेसमध्ये आहेत. विकेन्डला इतर टाइमपास करण्यापेक्षा या कामात गुंतणं हे कधीही अधिक चांगलं आहे असं आम्ही मानतो. पण त्याच्या पुढे जाऊन समाजातील एखाद्या विशिष्ट घटकाचा नेमका प्रश्न कसा शोधायचा, त्यावर ठोस कृती कार्यक्रम (ज्याला काही शास्त्रीय आधार आहे असा) कसा आखायाचा आणि या 
उपक्र माचा काही परिणाम होतो आहे किंवा नाही हे कसं बघायचं/ मोजायचं, अशा प्रकारच्या सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मनोवृत्तीचा आणि कृतीचा मात्र मोठय़ा प्रमाणात अभाव जाणवतो. 
भावना, बुद्धी आणि कृती या तिघांचा मेळ आपल्या जीवनात आणि सामाजिक कामात करता येऊ शकतो. किंबहुना त्यामुळे कामातली मजा आणि त्याचा होणारा परिणाम या दोनही गोष्टी वाढू शकतात, याची पुरेशी जाणीव आणि प्रचिती तरुणांना होणं गरजेचं आहे. 
 


3.‘स्व’ला शोधण्याची 
‘संधी’च नाही!

 ‘स्व’ची ओळख हे ‘निर्माण’ शिक्षणप्रक्रि येतील एक महत्त्वाचं गृहीतक आहे. ही ‘स्व’ ओळख काही गुहेत बसून होत नाही. आपला ‘स्व’ हा प्रकाशासारखा आहे असं ही प्रक्रि या मानते. आपल्याला निव्वळ प्रकाश कधीच दिसत नाही, तर जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर आदळून परावर्तित होईल, तेव्हा ती वस्तू प्रकाशमान, दृश्य होते आणि तेव्हा आपल्याला प्रकाश दिसतो. तसंच ‘स्व’बाबतदेखील आहे. जेव्हा आव्हान समोर येतं, तेव्हा स्व  दृश्यमान होतो. कृतींमधून आणि आव्हानांना सामोरं जाऊनच स्वला त्याची ओळख पटते.  
स्वच्या शोधासाठी जेव्हा मी समाजात मिसळेन तेव्हा आपोआपच मला समाज कसा आहे तेही कळेल. सार्वजनिक आरोग्याच्या काय समस्या आहेत हे समजायचं असेल तर सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रावर काय अवस्था आहे, ते तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहायचं. कचर्‍याची काय समस्या आहे, ते कचर्‍याच्या गाडीवर कचरा कामगारांसोबत बसायचं आणि डम्पिंग ग्राउन्डवर जाऊन बघायचं. अशा प्रकारच्या शिक्षणप्रक्रियेला निर्माणमध्ये उत्तेजन मिळतं. कुठल्याही तरुणाला त्याच्या शक्तीची आणि स्वची जाणीव व्हायला हे असं समाजासोबत फेस टू फेस येणं आवश्यक आहे. 
मात्र अनेकदा आम्हाला असं जाणवतं की प्रेमाच्या आणि काळजीच्या भलत्या कल्पनांपायी पालक आपल्या मुलांचा याबाबतीत विकासच होऊ देत नाहीत, अत्यंत प्रोटेक्टिव बनतात. उदा. एका मित्राला कॉलेजहून घरी जाताना बसच्या आजूबाजूच्या दोन्ही सीटचं बुकिंग आईबाबा करून देतात, का तर त्याच्या बाजूला कोण येईल माहीत नाही म्हणून. असं राहून कसं चालेल? 
 

4. मनातलं सांगा-बोलायची भूक,
पण कुणाशी बोलणार हा पेच!

 स्वतर्‍च्या भावना आणि वैचारिक गोंधळ (कन्फ्युजन) व्यक्त करायला सुरक्षित जागा, व्यक्ती (मेन्टॉर) नसणं हीदेखील एक मोठीच पोकळी आम्हाला जाणवते. कॉलेजमधलं आणि कट्टय़ावरचं वातावरण तसं गमतीचं आणि एकमेकांची खेचण्याचं असतं. तेही काही प्रमाणात ठीकच; पण त्यात गंभीर चर्चेला, जीवनाविषयी जास्ती सखोल चिंतनाला, बौद्धिक आणि भावनिक इन्टेन्सिटीला फारसा वाव नसतो. सर्वच गोष्टी या तुलनेनं फुटकळ गप्पांचा आणि क्षणिक विनोदांचा विषय असतात.  
सगळीकडे हे असं ‘वरवरचं’ वातावरण आहे. गंभीर विचारांची, चर्चेची भूक तर त्यांना आहे पण त्यासाठी वाव मिळत नाही. म्हणून निर्माणच्या मुलाखतीदरम्यान अनेकदा मुलं आम्हाला त्यांच्या मनातल्या खोलवरच्या गोष्टी सांगतात, कधी कधी त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, सिलेक्शन होवो अथवा नाही पण बोलून खूप बरं वाटलं असं म्हणतात, इतका चांगला, खोल संवाद कधी झाला नव्हता असं सांगतात. आम्हाला ही फार गंभीर समस्या वाटते. 
जयप्रकाश नारायण म्हणायचे, ‘अध्यात्म यह बुढापे की बुढभस नही तो तरु णाईकी उत्तुंगतम उडान है’. मात्र अशा अध्यात्माला (म्हणजे जीवनाविषयी व्यापक आणि सर्वागीण विचाराला, माझ्या जगण्याचा हेतू काय, माझी दिशा काय, मला हे जीवन कुठल्या मूल्यांवर जगायचं आहे, या चिंतनाला) कुठं वावच दिसत नाही. भारताच्या तरुण पिढीनं हे प्रश्न वयाच्या विशीत आणि तिशीतच विचारले पाहिजेत. (तर तसं प्रत्यक्ष जगता येईल!) साठीत किंवा सत्तरीत नाही. त्यासाठी पोषक असं वातावरण आपण कसं निर्माण करू शकू, कुठलीही एक विचारसरणी न लादता तरुणांना स्वतर्‍ विचार करायला आणि उत्तरं शोधायला कशी मदत करू शकू, ही एक मोठीच जबाबदारी आणि आव्हान आपल्यापुढे आहे. अधिकाधिक तरुणांना अर्थपूर्ण जीवनाची अनुभूती मिळण्यासाठी व ‘निव्वळ ग्राहक’ न बनता ‘जागरूक आणि प्रबुद्ध नागरिक’ बनण्यासाठी प्रवृत्त करणारी परिस्थिती असणं  गरजेचं आहे. ‘निर्माण’ हे त्या दृष्टीनं टाकलेलं एक पाऊल आहे. 
 


 5.  ‘वाचण्या’साठी ‘वाचन’? 
- जवळपास शून्यच!

 तरुणांच्या वाचनाविषयी आम्ही (ऑक्सिजनमध्येच) या आधीही लिहिलं आहे, म्हणून पुनरावृत्ती करत नाही; पण डीप रीडिंग शूड बिकम कूल! याची गरज मात्र प्रकर्षाने जाणवते. आपल्या आवतीभोवती असलेल्या सामान्यत्वाच्या पलीकडं जाऊन उत्तुंग व्यक्तित्वांना, विचारांना भेटण्याची सुवर्णसंधी पुस्तकं आपल्याला देतात. स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून मानवी संस्कृतीतील विविध रूपातलं सत्त्व चाखण्याची संधी पुस्तकांमुळे मिळते. म्हणून गांभीर्यानं वाचलं पाहिजे. वैचारिक प्रगल्भतेसाठी, माझ्या नॅरो टेक्निकल डोमेनच्या पलीकडेदेखील विश्व आहे आणि त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये माझ्या कामाला बघणं आवश्यक आहे, ही जाणीव तरु णांना होणं आवश्यक आहे. अन्यथा  प्रोफेशनल आयडेन्टिटी व त्याचे यशापयशाचे मानदंड यामध्येच हरवून जाण्याची शक्यता आहे. 
‘निर्माण’ प्रक्रि येमध्ये कायमच चांगली पुस्तकं वाचण्यावर आणि त्यावर चर्चा करण्यावर भर असतो. तरुणांनी जरूर वाचावीत अशा काही निवडक पुस्तकांची यादी निर्माणच्या वेबसाइटवर (httpर्‍//ल्ल्र1ेंल्ल.े‘ू’.1ॅ/6िल्ल’ं2ि.ँ3े’) दिलेली आहे. ‘पॉप्युलर’कडून ‘अर्थपूर्ण’ अशा वैचारिक सीमोल्लंघनासाठी आमच्याकडून शुभेच्छा!
 

6.  डोक्यावर बसलेलं रेझ्युमेचं भूत


सध्याची एकूणच व्यक्तिवादी विचारपद्धती कुठल्याही गोष्टीतून ‘मला काय मिळेल’ अशी चाइल्ड मेन्टलिटी तरु णांमध्ये भरवताना दिसतं. जसजशी एखादी व्यक्ती प्रौढ बनते तसतशी ती ‘देणारी’ बनते, निव्वळ घेणारी राहात नाही. वाढत्या वयानुसार हे संक्रमण होणं हे जबाबदार तरुण होण्याचं एक खरं लक्षण आहे. मात्र ते घडण्याची प्रक्रिया बरीच लांबताना अनेकांच्या बाबतीत दिसते. 
अगदी सामाजिक कार्याला सुरु वात करणारे मित्रदेखील ‘इथं मला काय मिळेल, काय शिकता येईल, किती पैसे मिळतील’ असा विचार करताना बर्‍याचदा दिसतात. ‘मी काय करू शकतो, काय देऊ शकतो’ हा विचार बळावण्याची गरज आहे. एखाद्या उदात्त ध्येयानं प्रेरित होऊन मार्गक्रमण करत राहाणं आणि तात्कालिक अडचणींनी विचलित न होता टिकून राहाणं ही साधना कमी लोकांना साधते. आणि म्हणून बरेचसे तरुण कायम अस्वस्थ असतात. 
सध्या करिअरच्या आणि जगण्याच्या सगळ्याच अंगांमध्ये रेझ्युमची चलती आहे. अनेकांच्या मनात एक इमॅजनरी रेझ्युम असतो आणि जगण्याची प्रत्येक पायरी किंवा टप्पा त्या रेझ्युमवर ती लाइन कशी दिसेल अशा पद्धतीने आखला जातो. इथं मग सामाजिक कामदेखील एक ‘एक्झॉटिक एक्सपिरीअस’ असा अनुभव बनतो. इतका शॉर्ट-साइटेड विचार दुर्‍खद आहे. 
निव्वळ ‘मला काय आवडतं, मला काय मिळेल, माझं करिअर कसं पुढं जाईल आणि तो रेझ्युम कसा दिसेल’ याच्या पलीकडे जाऊन ‘समाजाला कशाची गरज आहे, मला काय जमतं आणि मी काय देऊ शकतो’ असा अधिक व्यापक विचार होणं आवश्यक आहे. रेझ्युमवरील फॅन्सी लाइनमध्ये न अडकता प्रत्यक्ष जीवनात काय करून दाखवलं, कुठला प्रश्न सोडवायला घेतला, त्यात काय परिणाम साध्य केला यावर फोकस होणं जरूरी आहे. भारताचे तरुण स्वतर्‍च्याच रेझ्युमचे कन्झ्युमर बनतात की समाजासाठी योगदान देणारे प्रोडय़ुसर बनतात यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. 
 

7. ‘का?’ आणि ‘कशासाठी?’
च्या नेमक्या उत्तरांचा घोळ

 सामाजिक कृती म्हणजे नेमकं काय हे जसं समजणं गरजेचं आहे तसंच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे मी सामाजिक काम / कॉन्ट्रिब्युशन नक्की का, कशासाठी करू इच्छितो हे उमगणं. आम्हाला हे वारंवार जाणवत की याबाबतीत तरुणांची गोची होते. तुला हे ‘का’ करायचं आहे असं दोनदा विचारल्यावर त्यांना उत्तरं देता येईनासं होतं. अनेकदा प्रेरणा खूप छान असते पण त्याची नेमक्या शब्दात मांडणी/आर्टिक्युलेशन करता येणं हे मात्र जमत नाही. आणि ती वैचारिक स्पष्टता नसली तर इतरांच्या (घरचे, मित्र, नातेवाईक, शेजारचे) प्रश्नांना उत्तरं देतांना किंवा काम करताना कठीण अथवा मोहाचे प्रसंग आल्यास त्यांना तोंड देताना दोलायमान परिस्थिती होते. मग तरु ण मंडळी मला अमकी-तमकी ही डिग्री करायची आहे, स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, पॉलिसी बदलायची आहे इ. वरकरणी सहजमान्य पण तशी उथळ अशी ‘काय’ची उत्तरे द्यायला लागतात. 
सामाजिक प्रश्नावर काम करू इच्छिणार्‍या तसंच स्वतर्‍च्या जीवनाचा शोध घेणार्‍या युवक-युवतींना ‘का?’ याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. ते शोधल्यास, ‘काय?’ आणि  ‘कसं?’ ही उत्तरं मिळणं आपसूकच सोपं होतं. मात्र या तीनही प्रश्नांची उत्तरं ही आपापल्या घरात, कॉलेजच्या वर्गात किंवा एसी ऑफिसमध्ये अथवा ‘स्व’च्या गुहेत बसून सापडणार नाहीत. त्यासाठी कर्मभूमीवरच उतरावं लागेल. 
कर के देखो!

 

 ‘निर्माण’विषयी अधिक माहिती - 
     http://nirman.mkcl.org

निर्माण  - 2006 ते 2018

एकूण शिबिरे - 50
एकूण शिबिरार्थी - 1109
महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 230 तालुके,
महाराष्ट्राबाहेरील अन्य 13 राज्यांतून सहभाग
सामाजिक कामात पूर्णवेळ गुंतलेले निर्माणी- 325, 
विविध सामाजिक संस्था जिथे निर्माणी काम करतात- 82
निर्माणींनी दिलेल्या सामाजिक योगदानाचे ‘व्यक्ती-वर्ष’- 850

Web Title: Amrut Bang writes about young journey of meaningful life-Nirman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.