अ‍ॅग्रीकल्चरच्या डिग्रीला काही किंमत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:52 PM2018-07-05T16:52:28+5:302018-07-05T16:54:31+5:30

बीएस्सी अ‍ॅग्री केलं, पण नोकरी मिळवण्यासाठी जी वणवण केली त्यानं शिक्षणाची किंमत कळली.

Agriculture degree no importance in job market? | अ‍ॅग्रीकल्चरच्या डिग्रीला काही किंमत नाही?

अ‍ॅग्रीकल्चरच्या डिग्रीला काही किंमत नाही?

Next

- ज्ञानेश्वर युवराज भामरे

 धुळे जिल्ह्यातल्या आनंदखेडे या छोटय़ाशा गावातला तरुण. बारावी झाला. तालुक्याला जाऊन  बीएस्सी अ‍ॅग्री झाली, शिकून शिकून डोक्याचा व स्वतर्‍चा पार भुगा झाला. मग शंभर ठिकाणी अर्ज केले. परीक्षा दिल्या फक्त नोकरीसाठी; परंतु काहीच उपयोग झाला नाही. नोकरीसाठी वणवण फिरलो, भटकलो, अतोनात खर्चही केला परंतु हात रिकामाच होता. माझ्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी झालेला खर्च पाहून घरच्यांनी नाबोल संताप व्यक्त केला. मीही न बोलता समजून घेतलं. घरातून गोडीनं पाय काढला तो थेट पुण्यालाच थांबला. नोकरीच्या शोधार्थ फिरलो परंतु मनासारखी नोकरी न भेटल्यानं नाइलाजास्तव एका गाडीच्या कंपनीत कामाला लागलो. कामाच्या पहिल्या दिवशी मनात  अनेक प्रश्न होते, काम काय असेल? कसं असेल? 
आत गेलो तर एकानं माझ्या हाती एक जुना कापडाचा तुकडा दिला व म्हणाला आतून निघणार्‍या सर्व गाडय़ा पुसायच्या. मला थोडं वाईट वाटलं. मनात विचार आला की ज्या हातानं 17 वर्षे नोकरीच्या आशेने हातात पेन धरला, आज त्याच हातात गाडय़ा पुसायला फडकं यावं? एक जुनं फडकं, समोर दुसर्‍याची गाडी आणि काम काय तर ती पुसायची. तेव्हा वाटलं की माझं शिक्षण वाया गेलं, काय वेळ आली माझ्यावर. डोक्यात विचार असताना त्या  गाडीवरून हात फिरवत होतो. माझा सर्व भूतकाळ त्या गाडीच्या काचेत दिसत होता अगदी पहिलीपासून तर बीएस्सी अ‍ॅग्रीच्या तिसर्‍या वर्षार्पयत. वाटत होतं की शिकलोच नसतो तर  आई-वडिलांना किती मदत झाली असती. परंतु शिकलो आणि त्यांची स्वप्नं वाढली, अपेक्षा वाढल्या. मी कुणाचंही स्वप्नं साकार करू शकलो नाही . डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब त्या गाडीच्या काचेवर पडले आणि कुणी बघणार नाही तोच मी तेही फडक्यानं पुसले.  
तेथील सहकारी, सिनिअर्सनी मला शिक्षण विचारलं, मी बीएस्सी अ‍ॅग्री सांगितलं तेव्हा सगळे हसले. टिंगलही व्हायची. मग मी ठरवलं यापुढे सांगायचं फक्त चवथी. पण ते सांगितलं तर एकानं सांगितलं, बाबा थोडाफार शिकला असता तर एखादी चांगली नोकरी मिळाली असती. मी फक्त ऐकायचो.
हा सिलसिला बरेच दिवस चालला. अशातच काही दिवस गेले. पुण्यात राहणं न परवडल्याने पुन्हा पुण्याहून धुळं गाठलं. तेथील एका कापड मिलमध्ये पाच वर्षे काम केलं. परंतु माझ्या शिक्षणाचा व त्या मिलचा काहीही संबंध नसल्याने मला कामगार म्हणूनच काम करावं लागलं. त्यानंतर 5 वर्षानी माझ्या शिक्षणासंबंधी राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेत मला नोकरी लागली. आता मी उच्चपदावर नसलो तरी चांगल्या पगारावर काम करतोय. पण, या प्रवासानं मला काय नाही शिकवलं. जग दाखवलं!


आनंदखेडे (धुळे)

Web Title: Agriculture degree no importance in job market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.