विजयी गोडवा

By admin | Published: March 29, 2017 01:24 AM2017-03-29T01:24:33+5:302017-03-29T01:24:33+5:30

भारताने आॅस्ट्रेलियाचा चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून पराभव केला आणि वाद व तणाव यामुळे

Winsome Sweetness | विजयी गोडवा

विजयी गोडवा

Next

धरमशाला : भारताने आॅस्ट्रेलियाचा चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून पराभव केला आणि वाद व तणाव यामुळे चर्चेत राहिलेल्या मालिकेत २-१ ने बाजी मारत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे राखली.
भारताने सलग सातव्या कसोटी मालिकेत विजय मिळवला. भारताने २०१५ पासून आतापर्यंत श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश या संघाचा पराभव केला आहे.
१०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला आज चौथ्या दिवशी विजयासाठी ८७ धावांची गरज होती. सलामीवीर लोकेश राहुलने (नाबाद ५१) मालिकेत सहाव्यांदा अर्धशतकी खेळी करीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. ही लढत तीन दिवस आणि एका सत्रात संपली. भारताने मुरली विजय (८) व चेतेश्वर पुजारा (०) यांच्या विकेट एकापाठोपाठ गमावल्या, पण प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने २७ चेंडूंमध्ये ३८ धावांची खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला. रहाणे व राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची अभेद्य भागीदारी केली.
राहुलने विजयी धाव घेतल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कर्णधार विराट कोहलीसह सर्व खेळाडूंनी उभे राहून अभिवादन केले. खांद्याच्या दुखापतीमुळे कोहलीला या कसोटीत खेळता आले नाही.
राहुलने आपले हेल्मेट काढण्यापूर्वी आॅस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममध्ये दौड लगावली आणि विजयाचा आनंद साजरा केला. तणाव व आक्रमकतेने खेळल्या गेलेल्या या मालिकेच्या शेवटी उभय संघांतील खेळाडूंनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केले.
राहुलच्या ७६ चेंडूंच्या खेळीमध्ये ९ चौकारांचा समावेश आहे, तर रहाणेने चार चौकार व पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकले.
या लढतीसोबतच भारतीय क्रिकेट संघाच्या मायदेशातील मोसमाचा शेवट झाला. भारताने या मोसमात १३ पैकी १० कसोटी सामन्यांत विजय मिळवले, तर दोन लढती अनिर्णीत संपल्या. संघाला एकमेव पराभव पुणे येथे आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत स्वीकारावा लागला. स्टार फलंदाज व नियमित कर्णधार कोहलीविना खेळताना भारतीय संघाने सरशी साधल्यामुळे या विजयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याव्यतिरिक्त येथील खेळपट्टी आॅस्ट्रेलियासाठी अधिक अनुकूल होती. त्यात भारताने चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली.
राहुलने हेजलवूड व ओकिफेयांच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत आक्रमक सुरुवात केली. भारताची एक वेळ २ बाद ४६ अशी अवस्था होती, पण त्यानंतर रहाणेने आक्रमक खेळी करीत विजयाचा मार्ग प्रशस्त केला. कमिन्सच्या गोलंदाजीवर रहाणेने दोन षटकार ठोकल्यानंतर आॅस्ट्रेलियन संघ स्तब्धच झाला. अलीकडच्या कालावधीत भारतात खेळली गेलेली ही सर्वांत चुरशीची मालिका होती. उपखंडात खेळण्याचा विशेष अनुभव नसतानाही आॅस्ट्रेलियन संघाने भारताला कडवी लढत दिली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा निराशाजनक फॉर्म आॅस्ट्रेलियन संघाच्या पराभवाचे एक कारण ठरले. भारतीय संघाने मात्र कोहलीवर अवलंबून नसल्याचे सिद्ध केले.
कोहलीला या मालिकेत फलंदाजीमध्ये विशेष छाप सोडता आली नाही, पण तरी यजमान संघाने विजय साकारला. चेतेश्वर पुजाराने एक शतक व दोन अर्धशतकी खेळींसह ५७.८५ च्या सरासरीने ४०५ धावा फटकावल्या. राहुलने ६५.५० च्या सरासरीने ३९३ धावा केल्या.
सामन्यानंतर बोलताना पुजारा म्हणाला, ‘‘ही मालिका विशेष होती. विशेषत: पहिल्या लढतीतील निराशाजनक कामगिरीनंतरही आम्ही ३-१ ने विजय मिळवण्यात प्रयत्नशील होतो, पण २-१ ने विजय मिळवल्यानंतरही आनंद झाला. दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. आम्ही चांगल्या भागीदाऱ्या केल्या.’’ (वृत्तसंस्था)

धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ३००. भारत पहिला डाव : ३३२. आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : १३७.
भारत दुसरा डाव : के. एल. राहुल नाबाद ५१, मुरली विजय झे. वेड गो. कमिन्स ८, चेतेश्वर पुजारा धावबाद ०, अजिंक्य रहाणे नाबाद ३८. अवांतर : ९. एकूण : २३.५ षटकांत २ बाद १०६. बाद क्रम : १-४६, २-४६. गोलंदाजी : कमिन्स ८-२-४२-१, हेजलवूड ६-२-१४-०, ओकिफे ४.५-१-२२-०, लियोन ५-०-१९-०.

जशास तसे : विराट कोहली
आॅस्ट्रेलियाविरुद्ध २-१ ने मिळवलेला मालिकाविजय सर्वोत्तम मालिकाविजय असल्याचे सांगत भारतीय कर्णधार विराट कोहलीने आमच्या संघाला जर कुणी डिवचले तर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास संघ सक्षम असल्याचे म्हटले आहे.
चौथ्या कसोटी सामन्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना कोहली म्हणाला, ‘‘सामन्यामध्ये आमचे पारडे वरचढ असो किंवा नसो, पण जर कुणी आम्हाला डिवचले तर आम्ही नक्कीच त्यांना उत्तर देऊ. सर्वांच्या हे पचनी पडेलच असे नाही, पण आम्ही जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहोत.’’
आॅस्ट्रेलियन मीडियाने या मालिकेत कोहलीला लक्ष्य केले असले तरी त्याची तमा बाळगत नसल्याचे कोहलीने सांगितले. कोहली म्हणाला, ‘‘काही व्यक्ती जगाच्या एका कोपऱ्यातून सनसनाटी निर्माण करण्यास प्रयत्नशील असतात. त्यांना स्वत: परिस्थितीला सामोरे जावे लागत नाही. घरी बसून ब्लॉग लिहिणे किंवा माईकवर बोलणे सर्वांत सोपे काम असते. मैदानात खेळणे कठीण काम असते.’’
संघाच्या नेतृत्वाचा आनंद घेत असल्याचे सांगताना कोहली म्हणाला, ‘‘मला जबाबदारी स्वीकारणे आवडते. भारतातर्फे खेळताना प्रत्येक लढतीत काही तरी विशेष करण्याची संधी असते. सध्या शरीर तंदुरुस्त असून कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना आनंद होत आहे.’’
कोहली म्हणाला, ‘‘हा आमचा सर्वोत्तम विजय आहे. आम्ही जगातील क्रमवारीत सातव्या स्थानावरून अव्वल स्थान गाठले आणि कर्णधार म्हणून मला त्याचा अभिमान आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही चुरस होती, पण आॅस्ट्रेलियाने दिलेले आव्हान चकित करणारे होते.

मानाची गदा ‘टीम इंडिया’कडे कायम
 ऑस्टे्रलियाविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकून ‘टॉपर’ टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) क्रमवारीतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम करताना आयसीसीची मानाची गदा आपल्याकडेच कायम ठेवली. यासह आयसीसीकडून अव्वल संघास मिळणाऱ्या १० लाख डॉलर रोख बक्षिसावरही भारतीय संघाने कब्जा केला. माजी क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनिल गावसकर यांच्या हस्ते कर्णधार विराट कोहलीने मानाची गदा आणि रोख पारितोषिक स्वीकारले. आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेआधी भारताला ही गदा आपल्याकडे कायम राखण्यासाठी एक कसोटी सामना जिंकणे अनिवार्य होते. आॅक्टोबर २०१६मध्ये न्यूझीलंडला इंदूर कसोटीत नमवून भारताने अव्वल स्थानी कब्जा केला होता.

अजिंक्य रहाणे नववा कर्णधार
कर्णधार म्हणून पहिलीच कसोटी जिंकणारा अजिंक्य रहाणे नववा भारतीय खेळाडू ठरला. जखमी कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणारा रहाणे आता पॉली उम्रीगर,सुनील गावस्कर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या पंक्तीत दाखल झाला.

प्रत्येक खेळाडूला ५०-५० लाख!
चार सामन्यांची मालिका २-१ ने जिंकणाऱ्या टीम इंडियातील प्रत्येक सदस्याला ५०-५० लाख रुपये पुरस्कार देण्याची घोषणा बीसीसीआयने केली. हा पुरस्कार सामना खेळल्याच्या आधारे दिला जाईल. सर्व चारही सामने खेळणाऱ्यास ५० लाख दिले जातील. कोच कुंबळे यांना २५ लाख, तसेच सहयोगी स्टाफला १५ लाखांचा पुरस्कार मिळेल.

आता परदेशातही जिंकायला हवे : गावसकर
आॅस्ट्रेलियावर कसोटी मालिकेत विजय मिळवल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन करताना माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघाने आता अशीच कामगिरी परदेशातही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गावसकर म्हणाले, ‘‘प्रत्येक भारतीय खेळाडूला परदेशात जिंकावे असे वाटते, कारण याचा आनंद काही वेगळाच असतो. मायदेशात आपण येथील परिस्थिती ओळखून असतो, त्यामुळे तुम्ही विजय मिळवणे अपेक्षित असते. परंतु परदेशात विभिन्न परिस्थितीत जिंकल्याचा आनंद यापेक्षा मोठा असतो.’’
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, ‘‘अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली संघाचे मार्गक्रमण योग्य दिशेने होत आहे.

परदेशातही जिंकू शकतो : कुंबळे
आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकाविजयाने दाखवून दिले आहे, की हा संघ परदेशातही विजय मिळवू शकतो. विजयानंतर कुुंबळे म्हणाला, ‘‘हा शानदार विजय आहे. पहिली कसोटी हरल्यानंतर अशा प्रकारे मालिकाविजय मिळवणे खरोखरच चांगल्या संघाचे लक्षण आहे. विराट जखमी झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने दमदार नेतृत्व केले.’’ गोलंदाजांचे कौतुक करताना कोहली म्हणाला, ‘‘सर्व सत्रात गोलंदाजांनीचांगली कामगिरी केली. ही कामगिरी पाहता परदेशात आम्ही जिंकू शकू, असे मला वाटते.’’ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपासून आजच्या सामन्यापर्यंत आम्ही २५ खेळाडू आजमावले.

परदेशात जिंकल्यावर आणखी आनंद होईल : कोहली
सध्याच्या संघाने परदेशातील कसोटी मालिका जिंकली तर माझा आनंद द्विगुणीत होईल, असे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. १३ पैकी १० कसोटी सामने जिंकूनही तू आनंदी दिसत नाहीस, असे विचारले असता, कोहली म्हणाला, ‘‘कोणत्याही गोष्टीला अंत नसतो. या विजयावर अतिआनंदी होण्याची गरज नाही. आम्ही नंबर वन रँकिंग मिळवले असले तरी आमचा खडतर रस्ता आता सुरू होणार आहे.

आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसोबतची मैत्री संपली : कोहली
कसोटी मालिकेत मैदानात आणि मैदानाबाहेर लक्ष्य करण्यात आलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने आता आॅस्ट्रेलियन खेळाडूंना मित्र मानत नसल्याचे सांगितले.
‘डीआरएस ब्रेन फेड’ प्रकरणानंतर कोहलीने आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला जवळजवळ लबाड असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या विद्यमान व माजी क्रिकेटपटू आणि मीडियाने भारतीय कर्णधाराला लक्ष्य केले. कोहलीची तुलना अमेरिकेचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करण्यात आली.
क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी टीका करताना रेडिओवर म्हटले, की कोहलीला कदाचित ‘सॉरी’ शब्दाचे स्पेलिंग ठाऊक नसावे. आॅस्ट्रेलियन संघाला अद्याप मित्र मानतो का, याबाबत बोलताना म्हणाला, ‘‘नाही, आता परिस्थिती बदलली आहे. तणावामध्ये प्रतिस्पर्धी असतो, असे मी म्हटले आहे, पण त्यांनी मला चुकीचे ठरविले. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी मी जे म्हटले होते, ते चुकीचे ठरले आहे. मी पुन्हा असे वक्तव्य करणार नाही.’’

...त्यामुळे स्मिथ निराश

च्आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने बीसीसीआयने अखेरच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा व मॅथ्यू वेड यांच्यादरम्यानच्या वादाचा व्हिडीओ अपलोड केल्यामुळे निराशा व्यक्त केली. बीसीसीआयच्या मीडिया टीमने व्हिडीओ अपलोड केलेला आहे. त्यात जडेजा फलंदाजी करीत असताना वेड सातत्याने यष्टिमागे त्याला त्रास देत असल्याचे दिसत आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्मिथ म्हणाला, ‘‘बीसीसीआयने वेड व जडेजा यांच्यादरम्यानची बातचीत अपलोड केल्यामुळे निराश झालो. या मालिकेत उभय खेळाडूंदरम्यान हे घडत होते आणि त्यांनी व्हिडीओ अपलोड करणे निराशाजनक आहे. मैदानावर जे घडते ते मैदानावरच असायला हवे. हे सर्वत्र घडले. अशा मालिकेत भावनांचा उद्रेक होतो.’’

नंबर गेम
०६ व्यांदा भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली. भारताने २०१५ पासून आतापर्यंत श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश यांना पराभूत केले आहे.
१० वा कसोटी विजय
घरच्या मैदानावर दहा कसोटी सामने जिंकण्याची किमया भारतीय संघाने केली. १३ पैकी १० सामन्यांत विजय, दोन अनिर्णीत आणि पुणे येथील आॅस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव पराभवाचा समावेश यात आहे.
०४ थ्यांदा भारतीय संघाने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर मालिका जिंकली. २००४-०५ नंतरचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध हा सलग चौथा मालिका विजय आहे.
०३ वेळा सामनावीर पुरस्काराचा मान भारताच्या रवींद्र जडेजाला मिळाला. सत्रातील हे सर्वोच्च प्रदर्शन. विराट कोहलीलासुद्धा तीनदा पुरस्कार मिळाला. मात्र, जडेजा हा एकमेव खेळाडू आहे ज्याने प्रत्येक मालिकेत म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध, इग्लंडविरुद्ध आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. जडेजाला पाचव्यांदा सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार प्राप्त झाला.
१४०.७४ असा अजिंक्य रहाणेचा स्ट्राईक रेट होता. एखाद्या कसोटी डावात २७ चेंडूंत ३८ धावा ही त्यांची सर्वाेच्च कामगिरी आहे. चौथ्या डावात २५ चेंडूूंत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे.

अजिंक्यने चांगले नेतृत्व केले. बाहेर बसून त्याची कामगिरी बघणे सुखावणारे होते. संघाने चांगल्या फिटनेससह प्रदीर्घ कालावधीच्या मायदेशातील सत्रात चांगली कामगिरी केली. आम्ही फिटनेस ट्रेनिंगमध्ये केलेला बदल उपयुक्त ठरला. या मोसमात संघ चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला. यापूर्वी आम्ही सहज सामने गमावले होते, पण यंदाच्या मोसमात असे घडले नाही. केवळ एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर हे घडले नसून हे सांघिक यश आहे.- विराट कोहली,

Web Title: Winsome Sweetness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.