आता ‘शिवछत्रपती पुरस्कारा’चे निकष बदलणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:43 AM2020-01-09T03:43:59+5:302020-01-09T06:58:52+5:30

फुटबॉल खेळात खेळाडू, संघटक, मार्गदर्शक पात्रता निकषांत बसत नसल्याने अनेक फुटबॉलपटूंना या पुरस्कारापासून वंचित राहावे लागते.

Will the 'Shiv Chhatrapati Award' criteria change? | आता ‘शिवछत्रपती पुरस्कारा’चे निकष बदलणार का?

आता ‘शिवछत्रपती पुरस्कारा’चे निकष बदलणार का?

googlenewsNext

सचिन भोसले 
कोल्हापूर : राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये फुटबॉल खेळात खेळाडू, संघटक, मार्गदर्शक पात्रता निकषांत बसत नसल्याने अनेक फुटबॉलपटूंना या पुरस्कारापासून वंचित राहावे लागते. यंदा राज्य सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष, तसेच ‘विफा’चे उपाध्यक्ष आदित्य ठाकरे आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष, तसेच ‘विफा’चे उपाध्यक्ष विश्वजित कदम हे दोघेही असल्याने राज्यातील फुटबॉलपटूंना निकष नियमावलीत बदल होण्याची आशा आहे.
फुटबॉलपटूंना संतोष ट्रॉफीसारख्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य अथवा कांस्य अशी पदके सलग चार वर्षे मिळवावी लागतात किंवा फेडरेशन कप, बी. सी. रॉय ट्रॉफी, आंतरराष्ट्रीय वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागते. तरच हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पदरात पडतो. विशेष म्हणजे, भारतीय संघातून प्रतिनिधित्व केले, तरी हा पुरस्कार खेळाडूंना मिळत नाही.
फुटबॉल संघटक-कार्यकर्त्यांना या पुरस्कारासाठी देशभरात सातत्याने सराव शिबिरांच्या आयोजनासह आंतरराष्ट्रीय खेळाडू संघांच्या आंतरराष्ट्रीय सहली नेल्या पाहिजेत, तसेच त्यांचे प्रमुख प्रशिक्षकपद भूषविले पाहिजेत, तरच हा पुरस्कार त्यांना मिळेल. प्रशिक्षकांना तर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाही भरविल्या पाहिजेत, असे निकष आहेत.
एकूणच शिवछत्रपती पुरस्कार छाननी समितीचे निकष पाहिल्यास हा प्रतिष्ठेचा पुरस्कार फुटबॉलपटूंसह प्रशिक्षक आणि संघटकांना मिळणे कठीणच झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने निकष बदलले तरच फुटबॉलपटूंना यंदाच्या शिवछत्रपती पुरस्काराचा मान मिळेल. अन्यथा, हा वीस वर्षांहून अधिकचा दुष्काळ तसाच सुरू राहील.
>जलतरण, हॉकी, नेमबाजी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, खो-खो, मल्लखांब यांतील खेळाडू व संघटकांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जाते. विशेषत: कुस्ती, नेमबाजी यांना झुकते माप मिळते. मात्र, फुटबॉलसाठी वेगळे निकष लावल्याने सरकारच्या निकषांत बसणारे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक मिळणे कठीण आहे. - विकास पाटील , फुटबॉल संघटक

Web Title: Will the 'Shiv Chhatrapati Award' criteria change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.