ठाण्यात रंगणार कुमारांच्या राज्य अजिंक्यपद कबड्डीचा थरार!

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 27, 2023 03:01 PM2023-11-27T15:01:34+5:302023-11-27T15:03:42+5:30

प्रथमच राज्य कबड्डी संघटनेच्या नवीन धोरणानुसार खेळवण्यात येणार स्पर्धा

The thrill of Kumar's state kabaddi championship in Thane! | ठाण्यात रंगणार कुमारांच्या राज्य अजिंक्यपद कबड्डीचा थरार!

ठाण्यात रंगणार कुमारांच्या राज्य अजिंक्यपद कबड्डीचा थरार!

ठाणे : प्रशांत जाधव फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळाच्या वतीने कुमार, कुमारी गटाच्या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना, ठाणे जिल्हा कबड्डी संघटना आणि ठाणे महानगरपालिकेच्या सौजन्याने होणाऱ्या या स्पर्धेचा थरार ठाणेकरांना १ ते ५ डिसेंबर दरम्यान कॅडबरी जंक्शन येथील जुन्या जे.के.केमिकल्सच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे.

यंदा प्रथमच हि स्पर्धा राज्य कबड्डी संघटनेच्या नवीन धोरणानुसार खेळवण्यात येणार आहे. त्यात राज्यातील २५ जिल्ह्यांच्या संघासह अ आणि ब दर्जाच्या महापालिकांच्या हद्दीतील पुणे जिल्हा - शहर, पुणे जिल्हा - पिपंरी चिंचवड, पुणे जिल्हा ग्रामीण, नाशिक जिल्हा -शहर, नाशिक जिल्हा - ग्रामीण, ठाणे जिल्हा - शहर, ठाणे जिल्हा -ग्रामीण, मुंबई शहर- पूर्व विभाग, मुंबई शहर - पश्चिम विभाग , मुंबई उपनगर - पूर्व विभाग, मुंबई उपनगर -पश्चिम विभाग असे कुमार गटात आणि कुमारींच्या गटात ३१ असे एकूण ६२ संघ सुवर्ण महोत्सवी अजिंक्यपद मिळवण्यासाठी आपले आव्हान उभे करणार असल्याचे स्पर्धेचे प्रमुख संयोजक प्रशांत जाधव यांनी सांगितले. 

या स्पर्धेतील सामने मातीच्या क्रीडांगणावर खेळवले जातील. त्याकरता क्रीडा नगरीत सहा मैदाने तयार करण्यात आली आहेत. सामने संध्याकाळच्या सत्रात खेळवले जाणार असून प्रत्येक मैदानावर एका सत्रात पाच सामने रंगतील. पाच दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेतून कुमार आणि कुमारी गटाच्या आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी कुमार आणि कुमारी गटाचा महाराष्टाचा संघ निवडण्यात येईल. राज्याचे उद्योग आणि उच्च - तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे तर स्पर्धंच्या विजेत्यांना गौरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत. 

याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य कबड्डी संघनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने सुमारे दहा हजार क्षमतेची प्रेक्षागॅलरी उभारण्यात आली असून अव्वल दर्जाचा खेळ बघण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीचे प्रमुख सल्लागार आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते हणमंत जगदाळे यांनी केले आहे.

Web Title: The thrill of Kumar's state kabaddi championship in Thane!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे