'महाराष्ट्र श्री'वर सुनीत जाधवचेच राज्य, जेतेपदाचा षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 06:20 PM2019-03-07T18:20:56+5:302019-03-07T18:25:42+5:30

सलग सहाव्यांदा सुनीत जाधव महाराष्ट्र श्री

Suneet Jadhav won Maharashtra Shree tittle, sixth time he won this competition | 'महाराष्ट्र श्री'वर सुनीत जाधवचेच राज्य, जेतेपदाचा षटकार

'महाराष्ट्र श्री'वर सुनीत जाधवचेच राज्य, जेतेपदाचा षटकार

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र श्रीवर मुंबईचाच दबदबा, चारही जेतेपदं मुंबईकडेसांघिक विजेतेपद मुंबईकडे, उपविजेतेपदाचा मान उपनगरला

मुंबई :  मध्यरात्री दीडच्या ठोक्यालाही प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष... महागणपतीच्या साक्षीने टिटवाळाकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच बाजी मारली. सागर माळी आणि अनिल बिलावाचे कडवे आव्हान परतावत त्याने सलग सहाव्यांदा महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम करीत जेतेपदाचा अनोखा षटकार ठोकला. एवढेच नव्हे तर अन्य तिन्ही स्पर्धामध्येही मुंबईने विजयश्री संपादत चौकार ठोकला आणि सांघिक विजेतेपदावरही आपलेच शिक्कामोर्तब केले.  पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात मुंबईच्याच रोहन कदम सरस ठरला.


क्रीडाप्रेमी नगरसेवक संतोष तरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या माध्यमातून साकारलेला शरीरसौष्ठवाचा राज्य सोहळा बॉलीवूडच्या इव्हेंटला साजेसा असाच झाला. एकापेक्षा एक स्पर्धक, विक्रमी बक्षीसे, विक्रमी गर्दी, विक्रमी प्रतिसाद असे अनेक विक्रम नोंदविणाऱया महाराष्ट्र श्रीचे दिमाखदार आयोजन डोळे दिपवणारे ठरले.

सुनीतने पराभवाचा घेतला बदलागेल्याच आठवड्यात नवी मुंबईत झालेल्या एनएमएसए श्री स्पर्धेत ठाण्याच्या सागर माळीने सुनीत जाधवचा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. महाराष्ट्रात आपल्या समोर कुणीही टिकणार नाही, याच भावनेने पूर्ण तयारीत नसलेला सुनीत स्पर्धेत उतरला खरा, पण त्याला 90 किलो वजनी गटात अनपेक्षितरित्या तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्याच महिन्यात आशिया श्री पटकावण्याचा पराक्रम गाजवणाऱया सुनीतसाठी हा धक्का होता. या गटात सागरने पुण्याच्या महेंद्र चव्हाणलाही पछाडून आपले जेतेपद निश्चित केले होते. या विजयामुळे सागरचा आत्मविश्वास उंचावला होता. सुनीतची महाराष्ट्र श्री जेतेपदाची मालिका सागर खंडित करणार, असे चित्रही उभे राहिले होते.

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत जेव्हा सुनीतसमोर सागर, अनिल बिलावा आणि महेंद्र पगडे आले तेव्हा चित्र स्पष्ट झाले. तरीही जजेसने सुनीत, सागर आणि अनिलची कंपेरिझन करून सुनीतच्या षटकारावर शिक्कामोर्तब केले. 80 किलो वजनी गटात खेळणाऱया अनिल बिलावाने सुनीतला जबरदस्त टक्कर दिली. पण त्याची देहयष्टी सुनीतच्या मानाने किंचीतशी छोटी असल्यामुळे सुनीत सरस ठरला. दमलेल्या सागरला कंपेरिझनदरम्यान काही पोझेस परफेक्ट मारता आल्या नाहीत. त्यामुळे तो सुनीतला हरवण्यात अपयशी ठरला.
 
 
महाराष्ट्र श्री 2019 चे निकाल -
55 किलो वजनीगट -  1. राजेश तारवे (मुंबई), 2. नितीन शिगवण (मुंबई उपनगर), 3. कुतुब बानी (कोल्हापूर), 4. जितेंद्र पाटील (मुंबई उपनगर), 5. अवदुत निगडे (कोल्हापूर), 6. रमेश जाधव (ठाणे).

60 किलो - 1. नितीन म्हात्रे (पश्चिम ठाणे), 2. संदेश सकपाळ ( मुंबई उपनगर), 3. देवचंद गावडे ( मुंबई उपनगर), 4. अविनाश वने ( मुंबई), 5. बाळ काटे ( पुणे),  6. रोशन तटकरे (पश्चिम ठाणे),

65 किलो -  1. दिनेश कांबळे (ठाणे). 2. उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), 3. अरूण पाटील (मुंबई), 4. जगदिश कदम ( मुंबई उपनगर), 5. बप्पन दास (नवी मुंबई), 6. विनायक लोखंडे (पालघर),

70 किलो - संदीप कवडे (मुंबई), 1. मनोज माने  (मुंबई उपनगर), 2. तौसिफ मोमिन (पुणे), 3. संतोष शुक्ला (ठाणे), 4. सुरज सुर्यवंशी (पुणे), 5. मनीष ससाणे (पुणे),6. रोशन नाईक (पश्चिम ठाणे),

75 किलो - 1. भास्कर कांबळी (मुंबई),2. राजु बगाळे (पुणे), 3. अमोल गायकवाड (मुंबई), 4. रोहन गुरव (नवी मुंबई), 5. महेश जाधव (पुणे), 6. मोहम्मद हुसेन (मुंबई),

80 किलो - 1. अनिल बिलावा (मुंबई), 2. सुशांत रांजणकर (मुंबई),  3. हरेश नाईक (ठाणे), 4. अभिषेक खेडेकर (मुंबई), 5. अब्दुल अन्सारी (पुणे), 6. संकेत लंगरकर (कोल्हापूर).
85 किलो - 1. सुशील मुरकर (मुंबई), 2. अजय नायर ( ठाणे),3. सकिंद्र सिंग (मुंबई उपनगर), 4. मलल्sश धनगर (पुणे),  5. सुजन पिळणकर (मुंबई), 6. सचिन डोंगरे (मुंबई).

 90 किलो - 1. सुनीत जाधव (मुंबई), 2. दिपक तांबिटकर (मुंबई), 3. देवेंद्र भोईर (पश्चिम ठाणे), 4. कृष्णा कदम (पुणे), 5. योगेश सिलीवेरू(ठाणे), 6. उबेद पटेल (मुंबई).

100 किलो - 1. सागर मळी (ठाणे), 2. महेंद्र चव्हाण (पुणे),  3. लल्लन मिश्रा (ठाणे), 4. गणेश शेंडगे (पुणे), 5. जयेश ढोले ( ठाणे).

100 किलोवरील - 1. महेंद्र पगडे (ठाणे), 2. निलेश दगडे (मुंबई उपनगर), 3. रविकांत पाष्टे (मुंबई), 4. जुबेर शेख (पुणे)

महाराष्ट्र श्री 2019 - सुनीत जाधव (मुंबई)
उपविजेता- सागर माळी (ठाणे)
प्रगतीकारक खेळाडू - अनिल बिलावा ( मुंबई)
सांघिक विजेतेपद - मुंबई (97 गुण)
उपविजेतेपद - मुंबई उपनगर (66), तृतीय क्रमांक - ठाणे (61).

पुरूष फिजीक स्पोर्टस् - 1. रोहन कदम (मुंबई), 2. संजय मकवाना (ठाणे), 3. शुभम कांदू (मुंबई उपनगर), 4. स्वराज सिंग (मुंबई उपनगर), 5. विजय हाप्पे ( मुंबई उपनगर), 6. आतिक खान (मुंबई).

 

अनिल बिलावा, दिनेश कांबळेची चमकदार कामगिरी

महाराष्ट्र श्रीचा प्रत्येक गट चुरशीचा झाला. पण तीन गटात लढत एकतर्फी झाली. एक म्हणजे 80 किलोचा अनिल बिलावाचा गट, दुसरा दिनेश कांबळेचा 65 किलोचा गट आणि तिसरा सुनीत जाधवचा गट. दिनेश कांबळेच्या गटात त्याच्यापुढे कुणाचीच चालली नाही. तोच सर्वात सरस होता. तशीच स्थिती अनिल बिलावाच्या गटातही होती. त्याच्यासमोर कुणाचेही चालले नाही. सुशांत रांजणकरने थोडीशी लढत दिली, पण गटविजेता बिलावाच होणार हे निश्चित होते. सुनीतलाही गटविजेतेपद जिंकताना फार कष्ट करावे लागले नाही. मात्र अन्य गटात चांगलीच चुरस रंगली. होल्डमॅन नितीन म्हात्रेलाही संदेश सकपाळचे कडवे आव्हान मोडताना कडवी झुंज द्यावी लागली. सागर माळीलाही महेंद्र चव्हाणला मागे टाकताना आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे लागले. अन्य गटात भास्कर कांबळी, मनोज माने, राजेश तारवे आणि महेंद्र पगडेने गटविजेतेपद जिंकले.

मुंबईला तोड नाही...

महाराष्ट्र श्रीवर नेहमीप्रमाणे मुंबईचाच दबदबा राहिला. मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत अनिल बिलावा, सुशील मुरकर आणि सुनीत जाधव यांनी गटविजेतेपद जिंकलेच, पण स्पर्धेचे चारही गट जिंकून जेतेपदाचा अनोखा चौकार ठोकला. सुनीत जाधवसह मंजिरी भावसार, अमला ब्रम्हचारी आणि रोहन कदम यांनी जेतेपद संपादले. मुंबईनंतर मुंबई उपनगरनेही आपले वर्चस्व कायम राखले. या दोन्ही संघांना कडवे आव्हान दिले ते ठाण्याच्या संघाने. त्यांच्याही दिनेश कांबळे, सागर माळी आणि महेंद्र पगडे यांनी सुवर्णमयी कामगिरी केली. मुंबई, उपनगर आणि ठाण्याखालोखाल पुणे, कोल्हापूर संघानेही आपले चांगले खेळाडू या स्पर्धेत उतरवले होते.

मुंबईकर अमला, मंजिरी 'मिस महाराष्ट्र'
पूर्ण स्पर्धेवर मुंबईच्या खेळाडूंनी आपला दबदबा दाखवून दिला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यभरातून आठ स्पर्धकांचा सहभाग उत्साह उंचावणारा होता. गेल्या महिन्यात शरीरसौष्ठव स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेणाऱया मुंबईच्या अमला ब्रम्हचारीने आपल्dया पहिल्याच प्रयत्नात मिस महाराष्ट्र होण्याचा मान मिळविल्या. गेल्या महिन्यात तिने आपली पहिलीच स्पर्धा खेळताना चंदिगड येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये सुवर्ण जिंकून पराक्रम गाजवला होता तर आज तिने राज्यातील तन्वीर फातिमा, श्रद्धा डोके , मयुरी पोटे या खेळाडूंवर सहज मात करीत आपले जेतेपद निश्चित केले. महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात डॉ.मंजिरी भावसारने मुंबईच्याच दिपाली ओगळेची कडवी झुंज मोडीत काढत आपल्या विजयाची मालिका कायम ठेवले. मिस मुंबई तर मिस महाराष्ट्र झालेल्या मंजिरीने विजयानंतर आता मिस इंडिया किताब जिंकून हॅटट्रीक करण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. 

महिला फिजीक स्पोर्टस् - 1. मंजिरी भावसार (मुंबई), 2. दिपाली ओगळे ( ठाणे), 2. रेणूका मुदलीयार (मुंबई उपनगर), 3. स्टेला गोडे(पुणे), 4. निशरीन पारीख (मुंबई), रीठा तारी (मुंबई उपनगर).

महिला शरीरसौष्ठव स्पर्धा - 1. अमला ब्रम्हचारी ( मुंबई), 2. तन्वीर फातिमा (पुणे), 3. श्रद्धा डोके ( मुंबई उपनगर), 4. मयुरी पोटे (ठाणे, 5. अंजली पिलल्s (ठाणे), 6. पूनम शिंदे (ठाणे).
 

Web Title: Suneet Jadhav won Maharashtra Shree tittle, sixth time he won this competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.