वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरला, खेलो इंडियामध्ये पुण्याचा ओम समीर हिंगणे चमकला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 05:24 PM2024-01-22T17:24:57+5:302024-01-22T17:25:07+5:30

चेन्नई : पुण्यातील ओम समीर हिंगणे याच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या जाण्याचा ओमच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला.

Pune's Om Sameer Hingne overcame personal loss to clinch KIYG bronze | वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरला, खेलो इंडियामध्ये पुण्याचा ओम समीर हिंगणे चमकला

वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरला, खेलो इंडियामध्ये पुण्याचा ओम समीर हिंगणे चमकला

चेन्नई : पुण्यातील ओम समीर हिंगणे याच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या जाण्याचा ओमच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. ओमने मोठा खेळाडू व्हावे आणि नाव कमवावे यासाठी ते नेहमी आग्रही होते. ते त्याचे मुख्य प्रेरणास्त्रोत होते. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार ओमने मनाशी पक्का केला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलाच्या गळ्यात पदक पाहण्याचं त्यांचं स्वप्न आज ओमने पूर्ण केले आणि भविष्यातही अशीच कामगिरी करण्याचा इरादा त्याने केला आहे.

खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये १८ वर्षीय ज्युदोपटू ओमने रविवारी ५५ किलोखालील वजनी गटात कांस्यपदक जिंकले आणि त्याने हे पदक वडिलांना समर्पित केले. ओम सध्या गोवा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पोंडा केंद्रात ( SAI) प्रशिक्षण घेत आहे. २०१६मध्ये ओमच्या ज्युदोपटूचा प्रवास सुरू झाला आणि १४ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने आपली छाप पाडली. त्यानंतर त्याने  १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात कांस्यपदकाची कमाई केली आणि त्याला साई केंद्रात प्रशिक्षणासाठी बोलवले गेले.

दरम्यान, त्याचे वडील डॉ. समीर हिंगणे (पशुवैद्यक) स्वाइन फ्लूने मरण पावले आणि हा त्याच्यासाठी खूप मोठा धक्का होता. “हा माझ्यासाठी एकाकी प्रवास होता, कारण मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा गमावली, माझे वडील. त्या दुर्दैवी घटनेपासून पुढे जाणे कठीण होते,  कारण मी उदासीन होतो. पण त्यानंतर माझी आई मला करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन देत राहिली,” असे तो म्हणाला.

“जेव्हा मी खेळ सुरू केला, तेव्हा माझे वडील मला माझ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रवृत्त करायचे आणि त्यांना मला पोडियमवर पाहायचे होते. आज ते सर्वात जास्त आनंदी व्यक्ती असले असते, मी माझे पहिले KIYG पदक त्यांना समर्पित करत आहे,” असे तो पुढे म्हणाला.

ओम बी.कॉमच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे आणि त्याने सर्व दुःख मागे टाकून पुढे चालत आहे. आपल्या आईच्या चांगल्या आयुष्यासाठी तो कठोर परिश्रम घेत आहेत. “मी संयुक्त कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे मला माझे काका आणि आजोबा यांचा पाठिंबा आहे. पण मला ते आयुष्यभर परवडणार नाही. मला स्वतःची आणि माझ्या आईची जबाबदारी पेलायची आहे. मी वडील गमावले तेव्हापासून ती माझ्यासाठी एक मजबूत आधारस्तंभ आहे,” असेही तो पुढे म्हणाला.

हिंगणेने यावेळी प्रशिक्षक सुशील गायकवाड यांच्या पाठिंब्याचे व पोंडा येथील साई केंद्रात मिळालेल्या सुविधांचे कौतुक केले. “साई केंद्र आता माझ्यासाठी दुसरे घर आहे, तेथील सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. आणि अॅथलीटसाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रशिक्षकाचा पाठिंबा आणि जो मला दररोज प्रेरित करतो, ” असे तो म्हणाला.

Web Title: Pune's Om Sameer Hingne overcame personal loss to clinch KIYG bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.