भारत- श्री : महाराष्ट्राचे 20 शरीरसौष्ठवपटू पदकांच्या शर्यतीत; काही तासांतच अंतिम फेरीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 05:24 PM2018-03-25T17:24:32+5:302018-03-25T17:24:32+5:30

महाराष्ट्राच्या 20 बाहुबलींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे यंदाचे सर्वसाधारण सांघिक विजेतेपद महाराष्ट्रालाच मिळेल, असा विश्वासही खेळाडूंना आहे.

MR. INDIA : Maharashtra's 20 bodybuilders In the race for medals; In the few minutes, the final round begins | भारत- श्री : महाराष्ट्राचे 20 शरीरसौष्ठवपटू पदकांच्या शर्यतीत; काही तासांतच अंतिम फेरीला सुरुवात

भारत- श्री : महाराष्ट्राचे 20 शरीरसौष्ठवपटू पदकांच्या शर्यतीत; काही तासांतच अंतिम फेरीला सुरुवात

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राचा खरा कस 90 किलो वजनी गटात लागणार आहे. या गटात सलग दोनदा भारत श्री जिंकणाऱया सुनीत जाधवला गटविजेतेपदासाठी महाराष्ट्राच्याच महेंद्र चव्हाण, रोहित शेट्टीशी दोन हात करायचे आहेत.

मुंबई : भारत श्री स्पर्धेत महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवपटूंची प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. विक्रमी 584 शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेतून अंतिम फेरीसाठी 128 खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी दहा गटात खेळल्या गेलेल्या पुरूषांच्या प्राथमिक शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वाधिक 20 खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.

भारतीय शरीरसौष्ठवात महाराष्ट्राची वाढलेली ताकद भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाली. महाराष्ट्राच्या 20 बाहुबलींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे यंदाचे सर्वसाधारण सांघिक विजेतेपद महाराष्ट्रालाच मिळेल, असा विश्वासही महाराष्ट्राच्या खेळाडूंना आहे. 55 किलो वजनी गटात काँटे की टक्कर होणार यात वाद नाही. या गटात महाराष्ट्राच्या संदेश सकपाळ आणि नितीन शिगवण यांनी स्थान मिळविले असले तरी दोघांपैकी एकाला हमखास पदक मिळू शकते. मात्र 60 किलो वजनी गटात मि.वर्ल्ड  नितीन म्हात्रेला सुवर्ण पदकाची संधी आहे.  या गटात प्रतिक पांचाळही टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळवू शकतो. 65 किलो वजनी गटात श्रीनिवास खारवीने टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळविले तरी ती मोठी गोष्ट असेल. अशीच परिस्थिती 70 किलो वजनी गटात आहे. रितेश नाईककडून महाराष्ट्राला एका पदकाची अपेक्षा आहे. 70 किलो वजनी गटात सुशील मुरकर आणि रविंद्र वंजारीने स्थान मिळवलेय खरे पण गटात मध्यप्रदेश आणि कर्नाटकाच्या खेळाडूंपुढे त्यांचा निभाव लागणे कठिण आहे. महाराष्ट्रासाठी हमखास पदक 75 किलो वजनी गटात सागर कातुर्डे मिळवून देऊ शकतो. फक्त ते पदक सोन्याची असणार की चांदीचे हे अंतिम फेरीतच कळू शकेल. 85 किलो वजनी गटात महाराष्ट्राचे आव्हान अजय नायरवर आहे तसेच मुंबई श्री सुजन पिळणकरला मुंबई बंदरात नोकरी लागल्यामुळे तो आता मेजर पोर्टच्या संघातून खेळतोय. तरीही सुजन एक पदक जिंकणार हे नक्की आहे.

महाराष्ट्राचा खरा कस 90 किलो वजनी गटात लागणार आहे. या गटात सलग दोनदा भारत श्री जिंकणाऱया सुनीत जाधवला गटविजेतेपदासाठी महाराष्ट्राच्याच महेंद्र चव्हाण, रोहित शेट्टीशी भिडायचे आहे. त्याचबरोबर रेल्वेचा सागर जाधव आणि उत्तर प्रदेशच्या विजय बहादूरचे कडवे आव्हानही त्याला परतावून लावावे लागणार आहे. या गटात महाराष्ट्राकडून किमान दोन पदकांची अपेक्षा आहे. स्पर्धेतील सर्वात जबरदस्त गट असलेल्या 90-100 किलो वजनी गटात स्पर्धेचे संभाव्य विजेते एकत्र भिडणार आहेत. महाराष्ट्राचा महेंद्र पगडे, रेल्वेचा राम निवास, उत्तराखंडचा अमित छेत्री यापैकी एक गटविजेता असेल आणि स्पर्धेचा विजेताही. त्यामुळे या गटात कोणाला पदकाच्या कोणत्या रंगाचे चुंबन करायला मिळेल, हे अंतिम फेरीतच कळेल. 100 किलो वजनी गटातही महाराष्ट्राच्या अक्षय मोगरकर आणि अतुल आंब्रपैकी एकाला पदक निश्चित आहे परंतू गटविजेत्याचा मान आंतररेल्वे स्पर्धेचा विजेत्या जावेद अली खानलाच मिळण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्समध्ये सुनीतला जेतेपदाची हॅटट्रीक करणे फारसे सोपे राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक गट चुरशीचा असल्यामुळे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स नक्की कोण होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे भारतीय शरीरसौष्ठवाला नवा बाहुबली मिळतो की सुनीतच बाहुबली ठरतो हे पाहणे थरारक असेल.

पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत तब्बल 426 खेळाडूंच्या सहभागामुळे प्रत्येक गटात अव्वल दहा जणांमध्ये स्थान मिळविताना कडवी झुंज पाहायला मिळाली. विक्रमी स्पर्धकानंतर प्रेक्षकांचीही प्राथमिक फेरीला अभूतपूर्व गर्दी लाभली. शरीरसौष्ठवाची खरी ताकद प्राथमिक फेरीतच दिसते. त्यामुळे हाडाच्या शरीरसौष्ठवप्रेमींनी प्राथमिक फेरीला मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रेक्षकांच्या अभूतपूर्व गर्दी सुरू झालेल्या शरीरसौष्ठवाच्या पोझयुद्धात प्रत्येक गटातून टॉप टेनची नावे काढताना पंचांना अक्षरशा घाम फुटला. स्पर्धेच्या प्रत्येक गटात 35 ते 40 शरीरसौष्ठवपटू आणि तेसुद्धा पीळदार, त्यामुळे जजेसनी आधी 15 खेळाडूंची निवड केली आणि त्यांच्याकडून दोन वेळा सात पोझेस मारून घेत अंतिम फेरीसाठी टॉप टेनची निवड केली.


महिलांची ताकद वाढली...
शरीरसौष्ठवाच्या पुंभमेळ्यात शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग लाभला, पण त्यात महिला शरीरसौष्ठवपटूंचाही सिंहाचा वाटा होता. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत आठ पीळदार महिलांची उपस्थिती स्फूर्तीदायक होतीच ,पण महिलांनाही अभिमान वाटावा, असा प्रतिसाद महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल गटात पाहायला मिळाला. या गटात देशभरातून आलेल्या 35 महिला खेळाडूंची पीळदार देहयष्टी आणि सुडौल बांधा पाहून सारेच थक्क झाले.

Web Title: MR. INDIA : Maharashtra's 20 bodybuilders In the race for medals; In the few minutes, the final round begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.