रोहित नाईक / मुंबई
अखेरच्या षटकामध्ये केलेल्या टिच्चून माऱ्यानंतरही भारत ‘अ’ संघाला पहिल्या सराव सामन्यात इंग्लंड इलेव्हन संघाविरुद्ध ३ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यासह महेंद्रसिंग धोनीचे भारतीय संघासाठी अखेरचे नेतृत्व अपयशी ठरले. भारत ‘अ’ संघाने दिलेले ३०५ धावांचे आव्हान इंग्लंडने ७ फलंदाजांच्या मोबदल्यात ४८.५ षटकात पार केले. विशेष म्हणजे चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने ६० धावांत ५ बळी घेऊनही भारताला पराभूत व्हावे लागले.
येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सॅम बिलिंग्सने ८५ चेंडूंत ८ चौकारांसह ९३ धावांची खेळी करून इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सलामीवीर जेसन रॉयने देखील ५७ चेंडूंत ९ चौकार व २ षट्कारांसह ६२ धावांची खेळी केली. एकवेळ इंग्लंडची ३०.४ षटकांत ५ बाद १९१ धावा अशी अवस्था होती. यावेळी सामना समान स्थितीत होता. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करून इंग्रजांना जखडून ठेवले होते. मात्र, बिलिंग्स आणि लियाम डॉसन (४१) यांनी इंग्लंडला विजयी मार्गावर आणले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंग्लंड कर्णधार इआॅन मॉर्गन याने क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर मनदीप सिंग (८) झटपट परतला. मात्र, धवन-रायडू यांनी संघाला सावरताना दुसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. जॅक बॉलने धवनला बाद करून ही जोडी फोडली. धवन ८४ चेंडंूत ८ चौकार व एका षट्कारासह ६३ धावा काढून परतला. यानंतर रायडू - युवराज यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. रायडू रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर युवी, धोनी यांनी भारत ‘अ’ संघाला तीनशेचा पल्ला पार करून दिला.
युवराजने अडखळत्या सुरुवातीनंतर फटकेबाजी करीत प्रेक्षकांना खूश केले. त्याने ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षट्कार मारत ५६ धावांची दमदार खेळी केली, तर ४१व्या षटकात रायडूने आपले शतक पूर्ण केल्यानंतर मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आणि आगमन झाले कर्णधार धोनीचे. धोनीने अखेरपर्यंत नाबाद राहत ४० चेंडूंत ८ चौकार व २ षट्करांसह ६८ धावा केल्या.

धा व फ ल क

भारत ‘अ’ : मनदीप सिंग त्रि. गो. विली ८, शिखर धवन झे. बटलर गो. बॉल ६३, अंबाती रायडू रिटायर्ड हर्ट १००, युवराज सिंग झे. रशिद गो. बॉल ५६, महेंद्रसिंग धोनी नाबाद ६८, संजू सॅमसन झे. हेल्स गो. विली ०, हार्दिक पांड्या नाबाद ४. अवांतर - ५. एकूण : ५० षटकांत ४ बाद ३०४ धावा. गोलंदाजी : ख्रिस वोक्स १०-१-७१-०; डेव्हीड विली १०-१-५५-२; मोईन अली १०-०-४२-०; जॅक बॉल १०-०-६१-२; आदिल रशिद ८-०-४९-०; लियाम डॉसन २-०-२४-०.
इंग्लंड : जेसन रॉय झे. शर्मा गो. कुलदीप ६२, अ‍ॅलेक्स हेल्स झे. सॅमसन गो. कुलदीप ४०, सॅम बिलिंग्स त्रि. गो. पांड्या ९३, इआॅन मॉर्गन झे. धवन गो. चहल ३, जोस बटलर झे. शर्मा गो. कुलदीप ४६, मोईन अली पायचित गो. कुलदीप ०, लियाम डॉसन झे. व गो. कुलदीप ४१, ख्रिस वोक्स नाबाद ११, आदिल रशिद नाबाद ६. अवांतर - ५. एकूण : ४८.५ षटकात ७ बाद ३०७ धावा. गोलंदाजी : आशिष नेहरा ६-०-५०-०; हार्दिक पांड्या ९.५-१-४८-१; मोहित शर्मा ९-०-५८-०; युझवेंद्र चहल १०-०-५६-१; कुलदीप यादव १०-१-६०-५; युवराज सिंग ४-०-३२-०.

धोनी... धोनी...
क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये ‘धोनी.. धोनी..’चा जयघोष करतच प्रवेश केला. सर्वांच्या नजरा धोनीची एक झलक पाहण्यासाठी लागल्या होत्या. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून अखेरची नाणेफेक हरल्यानंतरही केवळ धोनीचाच जयघोष सुरू होता. एकूणच आपल्या लाडक्या कर्णधारासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेल्या क्रिकेटप्रेमींनी हा सामना धोनीमय करून टाकला.

मुंबईकरांची तुफान गर्दी
मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर होत असलेला भारत ‘अ’ विरुद्ध इंग्लंड सराव एकदिवसीय सामना भारतीय क्रिकेटसाठी खास आहे. भारतीय संघासाठी अखेरचे कर्णधारपद भूषविणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे ‘कूल’ नेतृत्व पाहण्याची संधी सहजासहजी सोडतील ते क्रिकेटप्रेमी कसले? आणि यासाठीच क्रिकेटप्रेमींची सुमारे दीड ते दोन कि.मी. रांग स्टेडियमबाहेर प्रवेशाच्या प्रतीक्षेत बघायला मिळाली. मंगळवारी होत असलेल्या या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींना मोफत प्रवेश होता. मात्र, मोजक्याच जागेसाठी प्रवेश असल्याने दुपारी दीड वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच क्रिकेटप्रेमींनी ब्रेबॉर्न स्टेडियमबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला क्रिकेट क्लब आॅफ इंडियाने (सीसीआय) दक्षिण आणि पूर्वेकडील स्टँड खुले केले होते. मात्र, तरीही मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी बाहेर राहिल्याने अखेर सीसीआयला पश्चिमेकडील स्टँडही खुले करावे लागले.

धोनी चाहत्याने घेतली मैदानात धाव...
ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेला भारत ‘अ’ विरुद्ध इंग्लंड सराव सामना ऐन रंगात असताना पहिल्या डावातील ४६वे षटक झाल्यानंतर नाट्य घडले. एकट्या कर्णधार धोनीसाठी संपूर्ण स्टेडियम भरले असताना यावेळी एका धोनी चाहत्याने सुरक्षाजाळीवरून उडी मारून मैदानात धाव घेतली. यावेळी खेळपट्टीवर असलेल्या धोनी-पांड्या यांचेही लक्ष वेधले गेले. या चाहत्याने खेळपट्टीवर येताच तो धोनीच्या पाया पडला आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले. यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून मैदानाबाहेर नेले. मैदानाबाहेर नेत असताना क्रिकेटप्रेमींमध्ये मात्र तो हीरो ठरला होता.