गोवा चॅलेंजर्सने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले, गतविजेत्या चेन्नई लायन्सला नमवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 02:37 PM2023-07-31T14:37:34+5:302023-07-31T14:37:52+5:30

गोवा चॅलेंजर्संने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले.

Goa Challengers crowned Ultimate Table Tennis Season 4 champions, Goa franchise beats Chennai Lions 8-7 in grand finale | गोवा चॅलेंजर्सने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले, गतविजेत्या चेन्नई लायन्सला नमवले

गोवा चॅलेंजर्सने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले, गतविजेत्या चेन्नई लायन्सला नमवले

googlenewsNext

पुणे, ३० जुलै २०२३ : भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू हरमीत देसाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेता अलव्हारो रॉब्लेस यांच्या अविश्वसनीय कामगिरीच्या जोरावर गोवा चॅलेंजर्संने अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ चे जेतेपद पटकावले. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झाल्या अंतिम सामन्यात गोवा चॅलेंजर्सने ८-७ अशा फरकाने गतविजेत्या चेन्नई लायन्सचे आव्हान परतवून लावले. गोवा चॅलेंजर्सचे हे पहिले जेतेपद ठरले आणि त्यांना आकर्षक चषकासह ७५ लाखांचे बक्षीसही मिळाले. उपविजेत्या चेन्नई लायन्सला ५० लाखांचे बक्षीस मिळाले.  


 भारताचा आघाडीचा खेळाडू हरमीत देसाईने पुरुष एकेरीच्या पहिल्या लढतीत २-१ अशा फरकाने बेनेडिक्ट डुडाचा पराभव करून गोवा चॅलेंजर्सला दमदार सुरुवात करुन दिली. जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानावर असलेल्या डुडा हा आतापर्यंत सीझन ४ मध्ये अपराजित राहिला होता आणि त्याने हरमीतविरुद्ध त्याच दर्जाचा खेळ केला. डुडाने पहिला गे ११-६ असा जिंकला, परंतु हरमीतने जबरदस्त पुनरागमन केले आणि दुसरा गेम ११-४ असा जिंकून सामना निर्णायक गेममध्ये नेला. दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली, परंतु अखेर हरमीतने ११-८ अशी बाजी मारली. 


लीगमध्ये २०० गुणांची कमाई करणारी पहिली महिला खेळाडू यांग्झी लियूने सीझन ४ मध्ये अपराजित मालिका कायम राखली आणि सुथासिनी सवेत्ताबटवर २-१ असा विजय मिळवून चेन्नई लायन्सचे आव्हान कायम राखले. मिश्र दुहेरीत अचंता शरत कमल/यांग्झी या जोडीने २-१ अशा फरकाने हरमीत/सुथासिनी यांचा पराभव करून चेन्नई लायन्सला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. चेन्नईच्या जोडीने पहिला गेम ११-७ असा जिंकला आणि दुसऱ्या गेममध्येही ११-९ असा विजय मिळवला. पण, हरमीत/सुथासिनीने तिसरा गेम गोल्डन गुणाने जिंकला.  


चौथ्या लढतीत पुरुष एकेरीत आशियाई स्पर्धेत अनेक पदकं जिकणारा शरत कमल आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अलव्हारो रॉब्लेस यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. अनुभवी शरतच्या गोवा चॅलेंजर्सचा रॉब्लेस आक्रमकतेनं उत्तर देत होता आणि त्याने पहिला गेम ११-८ असा जिंकला. रॉब्लेसने दुसऱ्या गेममध्येही आक्रमकता कायम राखताना ७-१ अशी आघाडी मिळवली. शरतचे सर्व डावपेच अपयशी ठरताना दिसले. तरीही त्याने अनुभवाचा वापर करताना पिछाडी ६-८ अशी कमी केली. रॉब्लेसने हा गेम ११-८ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये शरतने सुरुवात चांगली केली, परंतु रॉब्लेसने ८-५ असे पुनरागमन केले. शरतने कडवी टक्कर देताना ८-८ अशी बरोबरी मिळवली, परंतु रॉब्लेसने गोल्डन गुण घेत गोवा चॅलेंजर्सला ७-५ अशी आघाडी मिळवून दिली. 


रिथ टेनिसन आणि सुतिर्था मुखर्जी यांच्यातल्या महिला एकेरीच्या अखेरच्या लढतीवर जेतेपदाचा निकाल लागणार होता. गोवा चॅलेंजर्सच्या रिथला एक गेम जिंकायचा होता, तर चेन्नई लायन्सच्या सुतिर्थाला तिन्ही गेम जिंकणे महत्त्वाचे होते. सुतिर्थाने पहिल्या गेममध्ये ११-७ असा गेम जिंकून चेन्नई लायन्सचे आव्हान कायम राखले. 

रिथने दुसऱ्या गेममध्ये जबरदस्त खेळ केला आणि फॉरहँड-बॅकहँडचे वेगवान फटके मारून मोठी आघाडी मिळवली होती. मात्र, सुतिर्थाने अविश्वसनीय पुनरागमन करताना दुसरा गेम गोल्डन गुणांनी जिंकला. सामना ७-७ असा बरोबरीत आला आणि आता तिसरा गेम जेतेपदाचा निकाल लावणारा होता. रिथ व सुतिर्था यांनी सर्व एनर्जी पणाला लावलेली पाहायला मिळाली आणि रिथने ९-५ अशी आघाडी घेतली होती. सुतिर्थाने पुनरागमनाचे प्रयत्न केले, परंतु ते असफल ठरले. रिथने ११-६ असा विजय मिळवून गोवा चॅलेंजर्सच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.   

 

 

 

Web Title: Goa Challengers crowned Ultimate Table Tennis Season 4 champions, Goa franchise beats Chennai Lions 8-7 in grand finale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.