मुंबईचे फुटपाथ ते जागतिक सूत्रे.. भारतीय पिकलबॉलचा ऐतिहासिक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 04:02 PM2023-09-30T16:02:12+5:302023-09-30T16:03:06+5:30

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात गेल्या काही वर्षांमध्ये पिकलबॉल या खेळाने तुफान लोकप्रियता मिळवली आहे.

From Mumbais phootpath to global; A historical journey of Indian Pickleball | मुंबईचे फुटपाथ ते जागतिक सूत्रे.. भारतीय पिकलबॉलचा ऐतिहासिक प्रवास

मुंबईचे फुटपाथ ते जागतिक सूत्रे.. भारतीय पिकलबॉलचा ऐतिहासिक प्रवास

googlenewsNext

रोहित नाईक - लोकमत न्यूज नेटवर्क


मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात गेल्या काही वर्षांमध्ये पिकलबॉल या खेळाने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. अमेरिकेत जन्माला आलेल्या या खेळाने हळूहळू युरोप, आशिया खंडामध्ये जम बसवताना संपूर्ण जगात आज आपला वेगळा वर्ग निर्माण केला आहे. भारतातही हा खेळ जवळपास सर्व राज्यांत खेळला जात असून जागतिक पिकलबॉलची सूत्रे सध्या मुंबईतून हलवली जातात. परंतु, हा प्रवास एका रात्रीतला नसून याची सुरुवात झाली होती ती मुंबईच्या फुटपाथवरुन.

होय, मुंबईतील फुटपाथ. अमेरिकेत हा खेळ पहिल्यांदा पाहिल्यानंतर मुंबईकर टेनिसप्रेमी सुनील वालावलकर यांना या खेळाने अक्षरश; वेड लावले. आज हे वेड पूर्ण भारतात पसरले असून याचे पूर्ण श्रेय वालावलकर यांना दिले तरी चुकीचे ठरणार नाही. अर्थात यासाठी त्यांना आपल्या सहकाऱ्यांची साथ लाभलीच, त्याचबरोबर मुलगी डॉ. ऋता वालावलकर आणि पुतणी आभा वालावलकर यांनीही सुनील यांना पिकलबॉलच्या प्रसारासाठी पूर्ण साथ दिली. 

अमेरिकेत हा खेळ पाहिल्यानंतर २००७ साली वालावलकर यांनी हा खेळ मुंबईत आणला आणि त्यांनी ऋता-आभा यांच्यासह परिसरातील क्रीडाप्रेमींना चक्क फुटपाथवर या खेळाचे प्रशिक्षण दिले. टेनिस खेळायची आवड सर्वांनाच आहे, पण टेनिस खेळण्यासाठी एखाद्या क्लबची मेंबरशीप लागेल, किंवा एखाद्या अकादमीमध्ये प्रवेश करावा लागेल. परंतु, सर्वसामन्यांची ही खंत दूर केली ती पिकलबॉलने. केवळ खेळ म्हणून नाही, तर शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठीही पिकलबॉल कसा उपयुक्त आहे हे वालावलकर कुटुंबियांनी प्रत्येकाला पटवून दिले आणि या खेळातील खेळाडूंची संख्या झपाट्याने वाढू लागली. 

२००७ ते २०१२ पर्यंत विविध राज्यांमधील शाळा, महाविद्यालये, क्रीडा संकुले येथे पिकलबॉलचे प्रात्याक्षिके देऊन वालावलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभरात पिकलबॉलच्या राज्य संघटना निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले. यादरम्यान २००८ साली वालावलकर यांनी अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेची (एआयपीए) स्थापना करुन त्याअंतर्गत अनेक राज्य संघटना संलग्न करुन घेतल्या आणि २०१३ साली मुंबईमध्ये अंधेरी क्रीडा सकुलात पहिली राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धा खेळविण्यात आली. 

( अरविंद प्रभू (लाल टीशर्ट)  आणि सुनील वालावलकर) 

या स्पर्धेतून जवळपास १५० हून अधिक खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले आणि पिकलबॉलच्या चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या एका स्पर्धेनंतर अनेक राज्यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले. गेल्याच वर्षी डिसेंबरमध्ये वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे पिकलबॉल विश्वातील सर्वोच्च मानली जाणारी बेनब्रिज चषक स्पर्धा पार पडली. अमेरिकेतील बेनब्रिज आयलँमध्येच या खेळाचा जन्म झाल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा पहिल्यांदाच अमेरिका आणि युरोपबाहेर आयोजित झाली आणि तो मान भारताने मिळवला. 

पिकलबॉल म्हणजे ?

लॉन टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेबल टेनिस यांचे मिश्रीत रुप म्हणजे ‘पिकलबॉल’. यामध्ये टेबल टेनिस पॅडलसारख्या आकाराने मोठ्या असलेल्या पॅडलने बॅडमिंटनच्या आकाराच्या कोर्टवर खेळावे लागते. तसेच खेळण्याची स्टाईल आणि नियम हे लॉन टेनिसप्रमाणे असतात. सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास टेबल टेनिससारख्या पॅडलने बॅडमिंटनच्या कोर्टवर लॉन टेनिस खेळणे म्हणजेच ‘पिकलबॉल’. शारिरीक तंदुरुस्तीसाठी अत्यंत उपयोगी असलेल्या या खेळामध्ये प्लास्टीक बॉलचा वापर होतो.

जागतिक पिकलबॉलची सूत्रे मुंबईकराच्या हाती

भारतात पिकलबॉल खेळाचे नियंत्रण अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (एआयपीए) अंतर्गत होते. विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू हे सध्या एआयपीएचे अध्यक्ष आहेत. भारतात पिकलबॉलच्या प्रसारामध्ये प्रभू यांचे योगदान मोलाचे आहे. जागतिक पिकलबॉलचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनच्या (आयपीएफ) अंतर्गत होत असून या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रेही प्रभू यांच्याकडेच आहेत. मे २०२३ मध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांच्याआधी आयपीएफच्या अध्यक्षपदी सुनील वालावलकर यांनी काम केले होते. त्यामुळे आज जागतिक पिकलबॉलची सूत्रे मुंबईकरांच्या हाती असल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

Web Title: From Mumbais phootpath to global; A historical journey of Indian Pickleball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई