हैदराबाद : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने मंगळवारी हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या (एचसीए) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यापूर्वी अर्शद अयूबने लोढा समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
सलग तीन विश्वकप स्पर्धेत (१९९२, १९९६ व १९९९) भारताचे नेतृत्व करणारा आणि भारताचे सर्वांत अधिक वेळ कर्णधारपद भूषविणाऱ्यांपैकी एक असलेल्या अझहरुद्दीनवर वर्ष २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात समावेश असल्याचा ठपका ठेवत बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. अझहरुद्दीनने अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले की, ‘हैदराबादचे क्रिकेटवर लक्ष नाही. रणजी ट्रॉफीमध्ये आम्ही तळातून दुसऱ्या स्थानी आहोत. हैदराबादमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट बहरावे, असे मला वाटते.’
अझहरुद्दीनने प्रदीर्घ काळ कायद्याची लढाई लढली आणि २०११ मध्ये आंध्र उच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निर्णय दिला, पण बीसीसीआयने अद्याप त्याच्यावरील आजीवन बंदीचा निर्णय अधिकृतपणे रद्द केलेला नाही. माजी खेळाडूंना मिळणारे पेन्शन (निवृत्ती मानधन) त्याला अद्याप मिळालेले नाही.
गेल्या रणजी मोसमात अझहरुद्दीन सीमारेषेबाहेर विदर्भाच्या खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसला. त्यावर आक्षेप घेतना बीसीसीआयने डीडीसीएला पत्र लिहिले होते. सामनाधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेतली होती. (वृत्तसंस्था)
एचसीएचे सचिव जॉन मनोज यांनी सांगितले की,‘अझहर आपल्या समर्थकांसह एचसीएच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आला होता, असे मला कळविण्यात आले. त्याच्याकडे निवडणूक लढविण्यास पात्र असल्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश होता. साधारणपणे एचसीएची निवडणूक मे महिन्याच्या अखेरच्या रविवारी होते, पण अझहरकडे निवडणूक १७ जानेवारीला व्हावी, असा आदेश होता.’ आपल्या उमेदीच्या काळात सर्वोत्तम शैलीदार फलंदाजांपैकी एक असलेल्या अझहरने भारतातर्फे ९९ कसोटी सामन्यांत २४ शतके ठोकली आणि ६००० पेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत. (वृत्तसंस्था)