नामदेव मोरे
नवी मुंबई : पनवेल शहराचे वैभव असलेल्या खारजमीन संशोधन केंद्रामध्ये एक महिन्यापासून महापालिकेच्या मलनि:सारण वाहिनीमधील पाणी शिरू लागले आहे. यामुळे भात संशोधनाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. पिकामध्ये दूषित पाणी जावून भात शेतीचे प्रचंड नुकसान होवू लागले असून त्याचा परिणाम बियाणांच्या निर्मितीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापालिकेची निर्मिती होवून एक वर्ष झाले असले तरी प्रत्यक्षात पनवेल शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पनवेल शहराचे वैभव वाढविणा-या प्रकल्पांमध्ये खार संशोधन केंद्राचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंतर्गत असलेले हे केंद्र १९४३ मध्ये सुरू झाले आहे. तब्बल ७४ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या या केंद्राने भात संशोधनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खारजमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे भात पीक घेतले जाईल याविषयी अभ्यास केला जात आहे. केंद्राने पनवेल १, २ व ३ या नावाने भाताचे प्रकार विकसित केले आहेत. १२ हेक्टर जमिनीवर संशोधन व बियाणांची निर्मिती केली जात आहे. या बियाणांना शेतकºयांकडून प्रचंड मागणी आहे. पनवेल महापालिकेने त्यांची मलनि:सारण वाहिनी संशोधन केंद्र परिसरातून नेली आहे. आॅक्टोबरमध्ये अनेक ठिकाणी मलनि:सारण वाहिन्यांचे चेंबर फुटले आहेत. चेंबरमधील पाणी शेतामध्ये साचू लागले आहे. यामुळे जवळपास एक महिन्यापासून शेतामध्ये काम करणे अशक्य होवू लागले आहे. याठिकाणी बियाणांची निर्मिती केली जाते. बियाणे दर्जेदार असावे यासाठी भाताची लागवड करण्यापासून ते पिकाची कापणी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट वेळेत व व्यवस्थित होणे आवश्यक असते. परंतु मलनि:सारण वाहिनी फुटल्यामुळे संशोधन केंद्रातील वेळापत्रक कोलमडले आहे.
साईनगर परिसरामध्ये असलेल्या केंद्राच्या पुढील बाजूला महापालिकेचे मलनि:सारण केंद्र आहे. मलनि:सारण वाहिनीमधील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. यामुळे अनेक ठिकाणी चेंबर फुटू लागले आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडत आहेत. भात संशोधन केंद्राच्या जमिनीच्या उंचवट्याकडील भागातून मलनि:सारण वाहिनी गेली आहे. यामुळे फुटलेल्या चेंबरमधील पाणी पूर्ण शेतामध्ये घुसले आहे. संशोधन केंद्रातील कृषीशास्त्रज्ञांनी व कर्मचाºयांनी प्रचंड परिश्रम करून विकसित केलेले भाताच्या बियाणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिका प्रशासनाने विलंब न करता दुरूस्तीचे काम सुरू करावे व पुन्हा अशाप्रकारे मलनि:सारण वाहिनी फुटणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील कृषी शास्त्रज्ञांनी मनपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेतली असून योग्य दखल घ्यावी व बियाणे निर्मितीच्या प्रक्रियेमधील अडथळा दूर करावा, अशी मागणी केली आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.