पनवेल महापालिका आयुक्तांच्या बदलीचा घाट; सामाजिक संस्थांचा बदलीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:45 AM2018-02-14T03:45:11+5:302018-02-14T03:45:53+5:30

पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीसाठी दबाव आणला जात आहे. सत्ताधारी भाजपालाच आयुक्त नको असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बदलीच्या वृत्तामुळे पनवेलकरांनी नाराजी व्यक्त केली असून, आयुक्तांच्या समर्थनात सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे.

Transfers of Panvel Municipal Commissioner; Protests against social institutions | पनवेल महापालिका आयुक्तांच्या बदलीचा घाट; सामाजिक संस्थांचा बदलीला विरोध

पनवेल महापालिका आयुक्तांच्या बदलीचा घाट; सामाजिक संस्थांचा बदलीला विरोध

Next

- अरूणकुमार मेहेत्रे

कळंबोली : पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीसाठी दबाव आणला जात आहे. सत्ताधारी भाजपालाच आयुक्त नको असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बदलीच्या वृत्तामुळे पनवेलकरांनी नाराजी व्यक्त केली असून, आयुक्तांच्या समर्थनात सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे.
पनवेल महानगरपालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. सुधाकर शिंदे यांनी बॅनर आणि होर्डिंग्जमुक्त वसाहती केल्या. महामार्गावरील अतिक्रमण काढल्याने रुंदीकरणाचे काम सुरू झाले. त्यानंतर हागणदारीमुक्त अभियान यशस्वी राबवले गेले. प्लास्टिक निर्मूलनाकरिता ठोस पावले उचलण्यात आली. आता स्वच्छ सर्वेक्षणाचे कामसुद्धा जोमाने सुरू आहे. मात्र, सत्ताधारी भाजपाकडून डॉ. सुधाकर शिंदे हे विश्वासात घेत नाहीत, असा आरोप होत आहेत. कर्जत येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना एका नगरसेवकाने पत्र देऊन शिंदे यांची बदली करण्याची मागणी केली. त्याचबरोबर मागील आठवड्यात एक शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे समजते. त्या वेळीसुद्धा महापालिका आयुक्तांची बदली करण्याचा आग्रह धरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. विकासकामे होत नाहीत. पालकमंत्री बदलल्यानंतर सुधाकर शिंदे यांचीही बदली होणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याविरोधात कफसारख्या अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. त्यांनी सह्यांची मोहीम राबवून चळवळ सुरू केली आहे. सुधाकर शिंदें सारखे चांगले अधिकारी पनवेलकरांना हवे आहेत. त्यांनी चांगले काम केले असल्याने बदली होऊ नये, असे मत अरुण भिसे यांनी व्यक्त केले.
एकता सामिजक सेवा संस्थेनेही याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याचे चंद्रकात राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रत्नागिरी रहिवासी सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष दीपक निकम यांनी शासनाने आयुक्तांवर जो विश्वास दाखवला होता, तो त्यांनी सार्थकी लावला आहे. त्यामुळे त्यांची जर नियोजित बदली असेल तर ती रद्द करावी, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनीही बदली होऊ नये, यासाठी जनजागृती सुरू केली आहे. वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांनीही डॉ. शिंदे यांच्या बदलीला विरोध दर्शविला. आयुक्तांची बदली होऊ नये, याकरिता आम्ही आज खारघरमध्ये सह्यांची मोहीम घेतली असल्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

महापालिका आयुक्तांची बदली ही एक अफवा आहे. राहिला प्रश्न तक्र ार आणि दबावाचा, तर ते आमच्यापैकी कोणीही केलेले नाही. मात्र, प्रभाग समित्या, आकृतिबंधासह विकासकामे रखडली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत.
- डॉ. कविता चौतमोल,
महापौर, पनवेल

आयुक्त कसे काम करतात, ते आमच्यापेक्षा जनताच सांगेल. त्यांचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही, तरीसुद्धा बदली करण्याकरिता सत्ताधारी दबाव टाकतात. त्याकरिता काही ठोस कारणे असावी लागतात, वाटेल तेव्हा बदली करायची, वाटेल तेव्हा बोलवून घ्यायचे, ही कोणती पद्धत. महाआघाडी बदलीला नक्कीच विरोध करेल.
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते

Web Title: Transfers of Panvel Municipal Commissioner; Protests against social institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल