फळांच्या राजाचे राज्य सुरू! एक हजार टन आंब्याची आवक : गुढीपाडव्यापर्यंत एक लाखाचा टप्पा गाठणार

By नामदेव मोरे | Published: March 28, 2024 06:52 PM2024-03-28T18:52:45+5:302024-03-28T18:52:59+5:30

बाजार समितीमध्ये हापूस आंब्याला प्रतिडझन २०० ते ८०० रुपये डझन भाव मिळत आहे. कर्नाटकचा हापूससदृश आंब्याला ८० ते १२० रुपये प्रतिकिलो, बदामी ६० ते ८०, तोतापुरी ५० व केसरला १४० ते १८० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे.

The reign of the king of fruits begins! | फळांच्या राजाचे राज्य सुरू! एक हजार टन आंब्याची आवक : गुढीपाडव्यापर्यंत एक लाखाचा टप्पा गाठणार

फळांच्या राजाचे राज्य सुरू! एक हजार टन आंब्याची आवक : गुढीपाडव्यापर्यंत एक लाखाचा टप्पा गाठणार

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. गुरुवारी कोकण व दक्षिणेतून तब्बल १०२७ टन आंब्याची आवक झाली असून, ६८,९५२ पेट्यांचा समावेश आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तापर्यंत एक लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये गुरुवारी दिवसभरात ६५० वाहनांमधून सर्व प्रकारची २८११ टन फळांची आवक झाली. यामध्ये जवळपास अर्धी आवक फक्त आंब्याची आहे. कोकणातून ५५,१४७ व इतर राज्यांतून १३,८०५ पेट्यांचा समावेश आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेशमधून कर्नाटकी हापूस, बदामी, तोतापुरी व केसर आंब्याची आवक सुरू झाली आहे. संपूर्ण मार्केट आंबामय झाले असून, आता जूनपर्यंत मार्केटवर आंब्याचे राज्य राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.      

 बाजार समितीमध्ये हापूस आंब्याला प्रतिडझन २०० ते ८०० रुपये डझन भाव मिळत आहे. कर्नाटकचा हापूससदृश आंब्याला ८० ते १२० रुपये प्रतिकिलो, बदामी ६० ते ८०, तोतापुरी ५० व केसरला १४० ते १८० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. प्रत्येक वर्षी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होते. परंतु, यावर्षी होळीलाच आवक वाढली आहे. गुढीपाडव्यापर्यंत एक लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल

बाजार समितीमध्ये आंबा घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र गेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. मध्यरात्रीपासून पहाटे सर्व आंब्याची वाहने मार्केटमध्ये घेऊन येण्याची व्यवस्था केली आहे. कलिंगड व टरबूजच्या वाहनांना दुपारी तीननंतर मार्केटमध्ये प्रवेश दिला जात असून, खाली झालेली वाहने तत्काळ मार्केटबाहेर काढण्यात येत आहेत.

बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. कलिंगड व इतर फळांचा हंगामही सुरू आहे. फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे वाहतूक व व्यापार सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
संगीता अढांगळे, उपसचिव फळ मार्केट

बाजार समितीमधील फळांची आवक
फळांचा प्रकार - आवक(टन)
आंबा - १०२७
कलिंगड - ६७१
मोसंबी - १३५
पपई २८१
संत्री ११२
खरबूज २९५
अननस - २९
अंजीर - २.६
चिक्कू ४२
डाळिंब ६८
केळी ३७
पेरू ३३
ड्रॅगन फ्रुट - ३.५
अवकडू ३
किवी १.७

Web Title: The reign of the king of fruits begins!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.