पाच वर्षांतील बांधकामांचा अहवाल द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:14 AM2018-12-08T00:14:10+5:302018-12-08T00:14:32+5:30

घणसोलीमधील अ‍ॅटलान्टिस टॉवरमधील अनधिकृत बांधकाम तत्काळ जमीनदोस्त करावे.

Report five years of construction | पाच वर्षांतील बांधकामांचा अहवाल द्या

पाच वर्षांतील बांधकामांचा अहवाल द्या

googlenewsNext

नवी मुंबई : घणसोलीमधील अ‍ॅटलान्टिस टॉवरमधील अनधिकृत बांधकाम तत्काळ जमीनदोस्त करावे. इमारतीची बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समिती बैठकीमध्ये केली आहे. शहरामध्ये अजूनही विकासकांनी चटईक्षेत्राची चोरी केली असण्याची शक्यता असून पाच वर्षांतील बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रांचा तपशील सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत.
नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत आहे. परवानगी घेऊन बांधलेल्या इमारतीमध्येही मंजूर चटईक्षेत्रापेक्षा जास्त बांधकाम केले जात आहे. भोगवटा प्रमाणपत्र मंजूर केल्यानंतर अनधिकृत बांधकाम करण्याचे प्रमाण वाढत आहे. घणसोली सेक्टर ११ मधील भूखंड क्रमांक ५वर अ‍ॅटलान्टिस टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरमध्ये टेरेसचे बेडरूममध्ये रूपांतर केल्याचे व इतर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. ‘लोकमत’ने याविषयी आवाज उठविल्यानंतर त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीमध्येही उमटले. शिवसेना नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी सांगितले की, या व इतर इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार २०१७ मध्येच केली होती. प्रशासनानेही भोगवटा प्रमाणपत्र देताना योग्य काळजी घेतली जाईल, असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात काळजी घेण्यात आलेली नाही. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले असून संबंधितांची बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र दोन्ही रद्द करण्यात यावे. अनधिकृतपणे केलेले बांधकाम पाडण्यात यावे अशी मागणी या वेळी सभागृहात केली. प्रशासन प्रकल्पग्रस्तांची घरे तत्काळ पाडते व मोठ्या बिल्डरांच्या अतिक्रमणाला पाठीशी घालत असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक देविदास हांडे पाटील यांनीही शहरात अनेक विकासक अतिक्रमण करत आहेत. घणसोलीमध्ये एका इमारतीमध्ये घरे विकत घेताना प्रलोभने दाखवत आहेत. टेरेस कव्हर करून एक रूम वाढविता येईल व इतर आमिषे दाखविली जात आहेत. अशाप्रकारे चुकीचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
घणसोलीमधील अतिक्रमणाची तत्काळ पाहणी करून कारवाई करावी, अशी मागणी नामदेव भगत यांनी केली आहे. नगररचना विभागाचे सहायक संचालक ओवैस मोमीन यांनी सभागृहात प्रतिक्रिया देताना सांगितले की, विकासकाने केलेले बांधकाम तपासून त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामाची छायाचित्रेही काढण्यात आली आहेत.
भोगवटा प्रमाणपत्रानंतर अतिक्रमण झाले असण्याची शक्यता आहे. अतिक्रमण होत असल्यास त्याच्यावर लक्ष देण्याची जबाबदारी त्या विभाग कार्यालयातील व अतिक्रमण विभागाची असल्याचेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. सभापती सुरेश कुलकर्णी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पाच वर्षांतील बांधकामांचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश दिले.
अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनीही घणसोलीमधील इमारतीमधील अतिक्रमणाची पाहणी करून पुढील १५ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
>अतिक्रमण प्रकरणी प्रशासनाने दुटप्पी भूमिका घेऊ नये. घणसोलीमधील इमारतीमध्ये किती अतिक्रमण झाले आहे याची तत्काळ पाहणी करावी. अतिक्रमण झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.
- नामदेव भगत,
शिवसेना नगरसेवक
विकासक घर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना टेरेस व इतर भाग कव्हर करून स्वतंत्र रूम होऊ शकतो असे आश्वासन देत आहेत. ठरवून अतिक्रमण केले असून हे प्रकार थांबले पाहिजेत. चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणाºयांवर कारवाई झालीच पाहिजे.
- देविदास हांडे पाटील,
नगरसेवक राष्ट्रवादी काँगे्रस
>‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
घणसोलीमधील अ‍ॅटलान्टिस टॉवरमधील अतिक्रमणावर ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. इमारतीमध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम व इतर गोष्टी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याची दखल घेऊन नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये या विषयावर आवाज उठविला.

Web Title: Report five years of construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.