‘त्या’ गावांच्या धर्तीवर आमचेही पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 06:00 AM2017-11-13T06:00:16+5:302017-11-13T06:00:22+5:30

गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. याच धरतीवर आमच्या दोन गावांचेही पुनर्वसन करावे, अशी मागणी पारगाव व डुंगी गावांतील ग्रामस्थांनी केली आहे. तशा आशयाचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. 

Rehabilitate us on the lines of 'those' villages | ‘त्या’ गावांच्या धर्तीवर आमचेही पुनर्वसन करा

‘त्या’ गावांच्या धर्तीवर आमचेही पुनर्वसन करा

Next

वैभव गायकर। 
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाला सिडकोने सुरु वात केली आहे. पनवेल तालुक्यातील दहा गावे यामुळे पूर्णपणे विस्थापित होणार आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. याच धरतीवर आमच्या दोन गावांचेही पुनर्वसन करावे, अशी मागणी पारगाव व डुंगी गावांतील ग्रामस्थांनी केली आहे. तशा आशयाचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली, वरचा ओवळा, वाघिवली वाडा, गणेशपुरी, उलवा, तरघर, कोंबडभुजे आदी गावे विस्थापित होणार आहेत. या गावांचे पुनर्वसन नव्याने विकसित होणार्‍या पुष्पकनगरामध्ये केले जाणार आहे. पारगाव, डुंगी ही दोन गावे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराला लागून आहेत. विमानतळ प्रकल्पाच्या कामांमुळे या गावांतील ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: या गावांच्या चारही बाजूला भराव झाल्याने भविष्यात पाण्याचा धोका, गावठाण विस्तार, वाढत्या लोकसंख्येचे नियोजन करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. 
या व्यतिरिक्त प्रस्तावित रस्त्यांची कामे, उलवे खाडीचा मार्ग वळविणे, टेकडीच्या सपाटीकरणासाठी घडविले जाणारे विस्फोट आदीचा परिणाम येथील ग्रामस्थांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडकोने दहा गावांच्या धर्तीवर आमच्या दोन गावांचेही पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी पारगाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन ठरावही पारित केला आहे, अशी माहिती पारगावचे माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी दिली.
सध्याच्या घडीला पारगावमध्ये ७0४ घरे आहेत, तर डुंगीमध्ये अवघी ७0 घरे आहेत. २0१५च्या जनगणनेनुसार या गावांची लोकसंख्या जवळपास ३५00 इतकी आहे. या ठिकाणचे क्षेत्रफळ २३३ हेक्टर इतके आहे. ही दोन्ही गावे विमानतळाच्या गाभा क्षेत्राला लागून आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळ प्रकल्पाला भविष्यात बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे दहा गावांच्या धर्तीवर आमचेही पुनर्वसन करावे, असा प्रस्ताव सिडकोला सादर केल्याची माहिती पारगाव येथील ग्रामस्थ सचिन कांबळे यांनी दिली. 

भविष्यात या गावांना पुराचा धोका : पारगाव, डुंगी ही विमानतळाच्या कोअर एरियातील गावे आहेत. गावांच्या दक्षिणेकडे राज्य महामार्गाच्या रुं दीकरणाचे काम प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे गावाच्या उत्तरेकडे किमान ६0 मीटर रुं दीचा रस्ता प्रस्तावित आहे. १00 मीटर अंतरावर विमानतळ असल्याने सुमारे आठ मीटर इतका भराव या ठिकाणी टाकला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या गावांना पुराचा धोका होण्याची भीती अभ्यास गटाने तयार केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

पुनर्वसनासंदर्भात अभ्यासगटाची स्थापना
पारगाव, डुंगी या दोन गावांचे सिडकोने पुनर्वसन करावे व गावांतील समस्या, ग्रामस्थांच्या मागण्या यासंदर्भात या ग्रामस्थांनी सात सदस्यीय अभ्यास गट स्थापन केला आहे. या गावातील इत्थंभूत माहिती, पुनर्वसन मागण्यांचा आराखडा, सर्व प्रकारच्या कायदेशीर बाजू, मच्छीमार बांधवांचे प्रश्न यासंबंधीचा अभ्यासपूर्ण आराखडा या अभ्यास गटाने तयार केला आहे. लवकरच सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना हा आराखडा सादर केला जाणार आहे. 
- महेंद्र पाटील, माजी सरपंच,पारगाव.
 

Web Title: Rehabilitate us on the lines of 'those' villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.