मुलांमधील स्वमग्नतेचे पालकांपुढे कोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 07:03 AM2018-04-02T07:03:49+5:302018-04-02T07:03:49+5:30

स्वमग्नता हा गंभीर आजार नसून, अद्यापही पालकांना न सुटलेले कोडे आहे. लहान मुलाकडून सातत्याने होणारे एकच कृत्य स्वमग्नतेचे लक्षण असू शकते; परंतु मुलांमध्ये काही कमी आहे, याचा पालकच स्वीकार करत नसल्याचा परिणाम त्या मुलाच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे स्वमग्नतेबाबत जागरूक झालेल्या पालकांनी शनिवारी ठाणे-पनवेल रेल्वेमार्गावर अभियान राबवून इतरांनाही जागरूकतेचा संदेश दिला.

The puzzle against the parents of selfishness in children | मुलांमधील स्वमग्नतेचे पालकांपुढे कोडे

मुलांमधील स्वमग्नतेचे पालकांपुढे कोडे

Next

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई -  स्वमग्नता हा गंभीर आजार नसून, अद्यापही पालकांना न सुटलेले कोडे आहे. लहान मुलाकडून सातत्याने होणारे एकच कृत्य स्वमग्नतेचे लक्षण असू शकते; परंतु मुलांमध्ये काही कमी आहे, याचा पालकच स्वीकार करत नसल्याचा परिणाम त्या मुलाच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे स्वमग्नतेबाबत जागरूक झालेल्या पालकांनी शनिवारी ठाणे-पनवेल रेल्वेमार्गावर अभियान राबवून इतरांनाही जागरूकतेचा संदेश दिला.
मुलांमधील स्वमग्नता ही जागतिक समस्या होत चालली आहे. काही मुलांमध्ये जन्मत:च असणाऱ्या या अवस्थेचा शोध १९४३ साली लिओ केनर यांनी लावला. मात्र, ७० वर्षांनंतरही अद्याप स्वमग्नतेबाबत पालकांमध्ये फारशी जागरूकता नसल्याचे दिसून येत आहे. अनेकदा लहान मुलांमधील एखादे वेगळे वर्तन पालकांकडून दुर्लक्षित होत असते. लहान आहे, हट्ट करेल, नंतर सुधारेल, असा स्वत:च्या मनाचा समज करून पालकच मुलांच्या दोषांवर पांघरून घालत असतात. मात्र, एखाद्या लहान मुलाचे असे वागणे, म्हणजे त्याच्यातल्या स्वमग्नतेचे लक्षणही असू शकते. अनेकदा स्वमग्नता म्हणजे गतिमंद असा गैरसमज करून मुलांमधील दोष लपवले जातात. परिणामी, अशा मुलांवर वेळीच योग्य उपचार न झाल्यास वाढत्या वयानुसार गंभीर परिणामही होऊ शकतात. त्यामुळे पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने २ एप्रिल हा ‘जागतिक स्वमग्नता जनजागृती दिवस’ तर एप्रिल महिना ‘जनजागृती महिना’ म्हणून पाळला जातो. तसेच स्वमग्नता हा मुलांमधील आजार नसून एक लक्षण आहे, ज्यावर उपचाराने मात करता येते. परंतु मुलांमधील अक्षमता उघड करण्यात पालक कमीपणा समजतात. स्वमग्नता म्हणजेच, आॅटिझम हा विषय तारे जमीन पर, ब्लॅक, माय नेम इज खान, बर्फी तसेच कोई मिल गया, अशा चित्रपटांमधून देखील गांभीर्याने हाताळण्यात आलेला आहे. त्यानंतरही तो केवळ चित्रपटापुरताच मर्यादित राहिला आहे.
मागील काही वर्षांत नवी मुंबईतही मुलांमधील स्वमग्नता ही पालकांच्या चिंतेची बाब झाली आहे. दोन ते चार वयोगटातील १००पैकी सरासरी दोन मुलांमध्ये कमी-जास्त प्रमाणात स्वमग्नतेचे लक्षण आढळू शकते. डोळ्यांची तसेच हाताची विचित्र हालचाल करणे, एखाद्या संपूर्ण वस्तूऐवजी ठरावीक भागाकडेच एकटक बघत राहणे, शारीरिकवाढीच्या तुलनेत बौद्धिक वाढ कमी असणे, अशी त्याची प्रमुख लक्षणे आहेत. आहारातील बदल, वाढते प्रदूषण, कुटुंब व्यवस्थेतील गंभीर बदल ही मुलांमधील स्वमग्नतेची कारणे असू शकतात, असेही तज्ज्ञांचे मत आहे. सतत एकाकी राहिल्याने मुले स्वत:मध्येच गुंतून राहिलेली असतात, अशा वेळी ती सामान्य आयुष्य जगण्याऐवजी ठरावीक वस्तूकडे आकर्षित होऊन त्यामध्येच गुंतलेली असतात; परंतु आपल्या मुलामध्ये काहीतरी कमी आहे, हे पालक सहज मान्य करत नसल्याने उपचाराकडे पाठ फिरवली जाते. कालांतराने वाढत्या वयानुसार लक्षणे अधिक प्रमाणात दिसू लागल्यानंतर त्याचे गांभीर्य पालकांना समजते.

ईटीसी केंद्राचा आधार

पालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या विकलांग मुलांच्या नि:शुल्क शिक्षणासाठी ईटीसी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या केंद्रात विविध प्रकारच्या विकलांग मुलांसह ५०हून अधिक स्वमग्न मुलांना सामान्य बनवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्या ठिकाणी मुलांवर फिजीओ, ओटी-पीटी तसेच स्पिच थेरपीही केल्या जातात. तर ज्या मुलांना ईटीसी केंद्रात प्रवेश न मिळाल्याने खासगी शाळेत शिकतात, त्यांनाही पालिकेच्या वतीने थेरपीसाठी महिना दोन हजारांची मदत होते.

पालकांवर आर्थिक भार : वाढत्या वयानुसार स्वमग्न मुलांमध्ये बौद्धिक व शारीरिकवाढीत प्रचंड तफावत असते. त्यांना प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या थेरपीची गरज असते. प्रत्येक थेरपीचे शुल्क एक हजाराच्या घरात असल्याने पालकांवर प्रतिमहिना किमान १५ हजार रुपये खर्चाचा भार पडतो.

ंपालकांमध्ये जागरूकता हवी
पालिकेतर्फे विविध प्रकारच्या विकलांग मुलांच्या शिक्षणासाठी ईटीसी केंद्र चालविले जाते. त्या ठिकाणी सुमारे ५० स्वमग्न मुलांवर उपचार होत आहेत. लहान मुलांमध्ये एखादी कमतरता दिसून आल्यास पालकांनी त्याचा स्वीकार करायला हवा. वेळीच झालेले निदान उपचाराने दूर करता येऊ शकते. त्याकरिता स्वमग्नतेबाबत पालकांमध्येही जनजागृती आवश्यक आहे.
- वर्षा भगत, ईटीसी केंद्र संचालिका

Web Title: The puzzle against the parents of selfishness in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.