Prolonged the inauguration of the fourth port, the program postponed until January 15 | चौथ्या बंदराचे उद्घाटन लांबणीवर, कार्यक्रम १५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलला

उरण : इन्फ्रास्ट्रक्चरची अनेक कामे मार्गी लागली नसल्याने, जेएनपीटी बंदरांतर्गत सात हजार ९१५ कोटी खर्चाचे देशातील सर्वात मोठ्या लांबीचे बंदर डिसेंबर अखेर कार्यान्वित होण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे बंदराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बंदराचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आखण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी म्हणून सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या हस्ते चौथ्या बंदराचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न शिपिंग मंत्रालयाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जेएनपीटीअंतर्गत खासगीकरणातून चौथे बंदर उभारण्यात येत आहे. परकीय गुंतवणुकीतून म्हणजेच एफडीआयमधून उभारण्यात येणारे हे देशातील पहिलेच बंदर होय. देशातील सर्वात लांबीचे आणि वर्षाकाठी ४८ लाख कंटेनर हाताळणी करण्याची क्षमता असलेल्या बंदरावर ७९१५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. दोन टप्प्यात उभारण्यात येणाºया बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा संकल्प होता. मात्र, आवश्यक पायाभूत सुविधांची अनेक कामे अर्धवट आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेर चौथे बंदर कार्यान्वित करण्याच्या मनसुब्यावर र्तूतास तरी चांगलेच पाणी फेरले गेले आहे.
त्यामुळे जेएनपीटी आणि सिंगापूर सरकार मिळून उभारण्यात येत असलेले जेएनपीटीचे चौथ्या बंदराचे उद्घाटन १५ जानेवारीपर्यंत करण्याचा इरादा बंदर प्रशासनाने जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील मोठ्या लांबीच्या आणि मोठ्या बंदराचे उद्घाटन करण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी म्हणून सिंगापूरचे पंतप्रधान दिल्लीत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या दुग्धशर्कराचा योग साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत जेएनपीटीच्या चौथ्या बंदर उद्घाटनच्या शाही कार्यक्रमाचा बेत केंद्रातील शिपिंग मंत्रालयाकडून आखण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १५ जानेवारी ऐवजी २६ जानेवारीनंतरच उरकून घेण्याची तयारीही जेएनपीटी बीएमसीटीने चालविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १५ जानेवारी ऐवजी २६ जानेवारीनंतरच उरकून घेण्याची तयारीही जेएनपीटी बीएमसीटीने चालविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.