भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:26 PM2024-03-07T12:26:53+5:302024-03-07T12:28:25+5:30

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले.

Prakash Ambedkar criticized in Nerul if the BJP is given power, the country will go into debt | भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका

भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका

नवी मुंबई : २०१४ सालापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकावर १०० पैकी २४ रुपये कर्ज होते. मात्र, मागील दहा वर्षांत हेच कर्ज ८४ रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच १० वर्षांत प्रत्येक नागरिकावर तब्बल ६० रुपयांचे कर्ज वाढले असून, २०२६ साली देश कर्जात बुडालेला असेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. तुम्हाला कर्जात बुडायचे नसेल, तर भाजपच्या विरोधात मतदान करा, असे आवाहन त्यांनी नेरूळमध्ये बुधवारी झालेल्या सत्ता परिवर्तन महासभेत उपस्थितांना केले.

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले. भाजपने देशातील व्यवस्था बिघडवली असून, मागील १० वर्षांत सुमारे ३० ते ३५ हजार छापे टाकले आहेत; परंतु यामधील किती जणांना कोर्टाने शिक्षा सुनावली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

देशातील प्रत्येक राज्यात छापे पडत असताना गुजरातमध्ये एकही छापा पडलेला नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज्यातील अनेक उद्योग, कारखाने गुजरातला गेले असून, पुन्हा पाच वर्षे भाजपला दिल्यास सर्वच कारखाने गुजरातेत जातील, असे ते म्हणाले. मोदी हे देशापेक्षा गुजरातचेच पंतप्रधान अधिक असल्याची टीका यावेळी आंबेडकर यांनी केली. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर, युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, दिलीप बंदीचोडे, शिल्पा रणदिवे, डी.डी. गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला.
 

Web Title: Prakash Ambedkar criticized in Nerul if the BJP is given power, the country will go into debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.