सहा विषय समितीच्या सभापतीपदी नवख्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:05 AM2017-10-05T02:05:18+5:302017-10-05T02:05:56+5:30

पनवेल महापालिकेच्या सभापतीपदासाठी आठपैकी सहा सभापतीपदी नवख्या नगरसेवकांची वर्णी लागली आहे. त्यामुळे तरुण नगरसेवकांना या पनवेल महापालिकेत काम करण्याची संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे.

An opportunity for the novices as the Chairman of the Six Subject Committee | सहा विषय समितीच्या सभापतीपदी नवख्यांना संधी

सहा विषय समितीच्या सभापतीपदी नवख्यांना संधी

Next

मयूर तांबडे
पनवेल : पनवेल महापालिकेच्या सभापतीपदासाठी आठपैकी सहा सभापतीपदी नवख्या नगरसेवकांची वर्णी लागली आहे. त्यामुळे तरुण नगरसेवकांना या पनवेल महापालिकेत काम करण्याची संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे.
पनवेल महापालिका स्थापन होण्याआधीपासूनच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली होती. भाजपाने पनवेल महापालिका होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते तर काही पक्षांचा पनवेल महापालिकेला विरोध होता. काहींनी पालिकेविरोधात न्यायालयात याचिका देखील दाखल केल्या होत्या. असे असले तरी १ आॅक्टोबर २०१६ रोजी पनवेल महानगरपालिका ही महाराष्ट्रातील २७वी व रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका म्हणून अस्तित्वात आली. महापालिका स्थापन झाल्यानंतर २६ मे २०१७ ला पालिकेच्या निवडणुका घेण्यात आल्या. यात भाजपाला घवघवीत यश मिळाले. शेकापला पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी २ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. मनसे व शिवसेनेला भोपळा देखील फोडता आला नाही. त्यामुळे महापौरपदी नवख्या कविता चौतमोल यांना संधी देण्यात आली, तर पालिकेचे सभागृह नेतेपद तरु ण उमेदवार परेश ठाकूर यांना देण्यात आले.
गेल्या चार महिन्यांपासून पालिकेच्या विषय समितीच्या सभापतीची निवड होणे बाकी होते. यात भाजपाच्या आठ सभापतींची बिनविरोध निवड ४ आॅक्टोबर रोजी करण्यात आली आहे. आठपैकी सहा सभापती हे पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची पहिल्याच फेरीत सभापतीपदी वर्णी लागल्याने लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे. प्रकाश बिनेदार हे तीन वेळा तर दर्शना भोईर दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. तर नीलेश बाविस्कर, विद्या गायकवाड, विकास घरत, अरु ण भगत, अमर पाटील, मनोज भुजबळ हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले व त्यांना सभापतीपदाची लॉटरी लागली. मात्र, यामुळे भाजपाच्या काही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काही नगरसेवकांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती.

आठ विषय समित्या
आठ विषय समिती पदासाठी आठ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी मनोज भुजबळ, झोपडपट्टी पुनर्वसन आणि सामाजिक विकास सभापतीपदी प्रकाश बिनेदार, पाणीपुरवठा आणि मलनि:सारण समिती सभापतीपदी नीलेश बाविस्कर, महिला व बालकल्याण सभापतीपदी दर्शना भोईर, शिक्षण, क्र ीडा व सांस्कृतिक युवा कल्याण सभापतीपदी विद्या गायकवाड, सार्वजनिक उद्याने तलाव शहर सभापतीपदी विकास घरत, आरोग्य स्वच्छता वैद्यकीय रुग्णालय सेवा सभापतीपदी डॉ. अरुण भगत तर स्थायी समिती सभापतीपदी अमर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Web Title: An opportunity for the novices as the Chairman of the Six Subject Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.