महापालिकेचे आरोग्य होणार सदृढ, अर्थसंकल्पात मॅमोग्राफीसह अद्यावत सुविधांवर भर

By योगेश पिंगळे | Published: February 20, 2024 10:22 PM2024-02-20T22:22:40+5:302024-02-20T22:23:01+5:30

२०२४-२५ च्या मूळ अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेवर ५.२३ टक्के अर्थात १४३ कोटी ९९ लाख रुपय खर्च करण्यात येणार आहेत.

Municipal health to be strengthened, emphasis on updated facilities including mammography in the budget | महापालिकेचे आरोग्य होणार सदृढ, अर्थसंकल्पात मॅमोग्राफीसह अद्यावत सुविधांवर भर

महापालिकेचे आरोग्य होणार सदृढ, अर्थसंकल्पात मॅमोग्राफीसह अद्यावत सुविधांवर भर

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार आणि अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिका रुग्णालयात मॅमोग्राफीची सुविधा कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित केले असून यामुळे स्त्रियांमधील स्तनाचा कर्करोग प्राथमिक टप्प्यावर निदान होऊन तातडीने योग्य उपचार करणे शक्य होणार आहे. २०२४-२५ च्या मूळ अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेवर ५.२३ टक्के अर्थात १४३ कोटी ९९ लाख रुपय खर्च करण्यात येणार आहेत.

स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून कर्करोगाचे प्राथमिक टप्प्यावर निदान होऊन तातडीने उपचार घेता यावेत यासाठी महापालिका रुग्णालयात बाह्ययंत्रणेद्वारे मॅमोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित केले आहे.
कोपरखैरणे विभागातील सेक्टर २२ येथोल माता बाल रुग्णालय इमारतीच्या वाढीव मजल्याच्या बांधकामासह कोपरखैरणे सेक्टर १६ व महापे येथे नागरी आरोग्य केंद्र बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच घणसोली सेक्टर ७ येथे नागरी आरोग्य केंद्र बांधण्याकरिता शासनाकडून मूलभूत सोयी-सुविधांतर्गत निधी प्राप्त होणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये मायक्रोबायोलॉजी विभाग नसल्याने याबाबतच्या तपासण्या बाहेरून करून घेतल्या जातात.

मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा
नवी मुंबई महानगरपालिकेची पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था कार्यान्वित करण्याचे काम कार्यालयीन प्रणालीमध्ये असून त्यादृष्टीने रुग्णांना गुणात्मक व तत्काळ सेवा देण्याच्या अनुषंगाने मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे.

कॅथलॅब सुविधा
महापालिका रुग्णालयामध्ये हृदयविकाराचे रुग्ण उपचारासाठी येतात. अशा रुग्णांना कॅथलॅब सुविधा उपलब्ध नसल्याने इतर रुग्णालयात पाठवावे लागते. हृदयविकार असलेल्या रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याकरिता ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयात बाह्य यंत्रणेद्वारे कॅथलॅब व आयसीयू विभाग सुरू करण्यात येणार आहे.
१२ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर
महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय, वाशी, नेरूळ, ऐरोली व माता बाल रुग्णालय, बेलापूर येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अद्ययावत उपचार सुविधा मिळावी याकरिता १२ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तापमान व आर्द्रता नियंत्रित करण्याची व्यवस्था असते. यामध्ये बॅक्टेरिया व व्हायरस निरसित होऊन शस्त्रक्रियेवेळी रुग्णांना संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते तसेच विशेष अद्ययावत तंत्रज्ञान व उपकरणांमुळे शस्त्रक्रियेमध्ये अचूकता येते.

एमआरआयची सुविधा

रुग्णांना अधिक प्रभावी तपासणीकरिता तसेच अत्यवस्थ रुग्णांच्या अचूक व योग्य निदानाकरिता एमआरआय सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. महापालिका रुग्णालयात सद्यस्थितीत ही सुविधा नसल्याने रुग्णांना खासगी सेंटरमध्ये जावे लागते. ही सेवा महागडी असल्याने रुग्ण त्या चाचणीस दिरंगाई करतात. त्यामुळे योग्य व अचूक निदानाकरिता महापालिका रुग्णालयात एमआरआयची सुविधा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित केले आहे.

Web Title: Municipal health to be strengthened, emphasis on updated facilities including mammography in the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.