जंगल सत्याग्रहाची भूमी उपेक्षितच, ८७ वर्षे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:33 AM2017-09-25T00:33:15+5:302017-09-25T00:33:39+5:30

इंग्रजांच्या अन्यायाविरोधात १९३० मध्ये देशभर जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये २५ सप्टेंबरला झालेल्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये १३ भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले.

The land of Jungle Satyagraha is neglected, 87 years of neglect of government | जंगल सत्याग्रहाची भूमी उपेक्षितच, ८७ वर्षे शासनाचे दुर्लक्ष

जंगल सत्याग्रहाची भूमी उपेक्षितच, ८७ वर्षे शासनाचे दुर्लक्ष

googlenewsNext

नामदेव मोरे, वैभव गायकर
नवी मुंबई : इंग्रजांच्या अन्यायाविरोधात १९३० मध्ये देशभर जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये २५ सप्टेंबरला झालेल्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये १३ भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. ८७ वर्षांनंतरही आंदोलनाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. स्मृतिदिनी शासकीय मानवंदना वगळता या ठिकाणाकडे कोणीच फिरकत नसल्याने स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाची घटना व भूमिपुत्रांचे हौतात्म्य विस्मरणात जावू लागले आहे.
जुलमी इंग्रज सरकारने १९३० च्या दरम्यान आदिवासींचा जंगलावरील हक्क नाकारला. जंगलातून लाकूड, गवत गोळा करणे, फळे व वनौषधी गोळा करण्यावरही निर्बंध लाधले. गाई - म्हशींनाही जंगलात सोडण्यास मज्जाव करण्यात आला. या अन्यायाविरोधात देशभर आंदोलन सुरू झाले. देशातील पहिला जंगल सत्याग्रह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळशी येथे झाला. १८ जुलै ते ५ सप्टेंबर १९३० दरम्यान तेथे आंदोलन करण्यात आले. यानंतर देशातील सर्वात मोठा जंगल सत्याग्रह उरण तालुक्यातील चिरनेरच्या अक्काताई जंगलामध्ये झाला. २५ सप्टेंबरला ठाणे व रायगड जिल्ह्यातील ६ हजारपेक्षा जास्त आदिवासी नागरिकांनी चिरनेरमधील आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. इंग्रजांचे आदेश झुगारून गाई - म्हशी जंगलामध्ये चरण्यासाठी घेवून जाण्याचा निर्धार केला. ‘जंगल आमच्या हक्काचे’ च्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलन चिरडून काढण्यासाठी इंग्रजांनी गोळीबार करण्याचा आदेश दिला. या गोळीबारामध्ये आंदोलकांसह एकूण १३ जण हुतात्मा झाले. देशभर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये चिरनेरमध्ये सर्वाधिक हुतात्मा झाले. या घटनेचे पडसाद पूर्ण देशभर उमटले. भूमिपुत्रांच्या पराक्रमाची दखल इतिहासाने घेतली. परंतु स्वातंत्र्यानंतर या हुतात्म्यांचे चांगले स्मारक उभारण्याची आवश्यकताही शासनाला वाटली नाही.
चिरनेरमधील ऐतिहासिक लढ्याच्या स्मृती येथील ग्रामस्थांनी प्राणपणाने जपल्या आहेत. हुतात्म्यांचे स्मारक उभारले आहे. प्रत्येक हुतात्म्याची माहिती नागरिकांपर्यंत जावी, भावी पिढीला देशभक्तांच्या त्यागाची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु शासनाने मात्र अद्याप या स्मारकासाठी काहीही केलेले नाही. स्मारकाची देखभाल व साफसफाईही ग्रामपंचायतीच्यावतीने केली जात आहे. सरकारच्यावतीने २५ सप्टेंबरला हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते, परंतु या व्यतिरिक्त दुसरे काहीही केले जात नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गोळीबार झाला त्या अक्काताई जंगल परिसरातील घटनास्थळी साधा माहिती फलकही अद्याप लावलेला नाही. हुतात्म्यांची माहिती चिरनेर गावच्या बाहेरील नागरिकांना मिळेल अशी काहीही व्यवस्था अद्याप केलेली नाही. शासनाच्या संकेतस्थळांवरही याविषयी फारशी माहिती दिली जात नाही. अभ्यासक्रमामध्येही या घटनेविषयीचा उल्लेख अद्याप कधीच करण्यात आलेला नाही. उरण तालुका, रायगड जिल्हा व राज्यातील एकाही प्रकल्पाला, शहरातील चौकांना जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे नाव अद्याप दिलेले नाही. ही उपेक्षा कधी थांबणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

हुतात्मा स्तंभ
चिरनेरमध्ये १३ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जानेवारी १९३२ मध्ये स्तंभ उभारला,
परंतु इंग्रज सरकारने जूनमध्ये तो पाडला.
पुढे जानेवारी १९३९ मध्ये नामदार
बा. ग. खेर यांच्या उपस्थितीमध्ये स्मृतीस्तंभ पुन्हा उभारण्यात आला. ग्रामस्थांनी या स्तंभाची काळजी घेवून त्याची जपणूक केली आहे.

छत्तीसगढ सरकारने जपला इतिहास
देशात जंगल सत्याग्रहाची सुरवात महाराष्ट्रातून झाली. सांगली, मराठवाडा व रायगड जिल्ह्यातील चिरनेरमध्ये तीव्र आंदोलने झाली. चिरनेरमध्ये १३ जण हुतात्मा झाले.
महाराष्ट्रानंतर सर्वात मोठे आंदोलन छत्तीसगढमध्ये झाले. आपल्या सरकारने जंगल सत्याग्रहाच्या स्मृती जपल्या नसल्याने हा इतिहास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
दुसरीकडे छत्तीसगढ सरकारने जंगल सत्याग्रहाच्या स्मृती जपल्या आहेत. या विषयावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली आहेत. स्मारके उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील आंदोलनाचे संदर्भही तेथील साहित्यामध्ये आढळतात, परंतु महाराष्ट्र सरकार मात्र याविषयी फारसे काही करत नाही.

हुतात्मा स्मारकाविषयी पुढील कामे करण्यात यावीत
चिरनेरमध्ये भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे
जंगल आंदोलनाचा इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकविण्यात यावा
चिरनेरला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे
जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांची नावे नवी मुंबई, रायगडमधील मोठ्या प्रकल्पांना द्यावी
हुतात्मा स्मारक परिसरातील तलावाचे सुशोभीकरण

चिरनेर आंदोलनामधील हुतात्म्यांची नावे
धाकू गवत्या फोबेरकर - चिरनेर
रघुनाथ मोरेश्वर न्हावी - कोप्रोली
रामा बामा कोळी - मोठी जुई
आनंदा माया पाटील - धाकटी जुई
परशुराम रामा पाटील - पाणदिवे
हसुराम बुध्या पाटील - खोपटे
नाग्या महादू कातकरी - चिरनेर
आलू बेमट्या म्हात्रे - दिघोडे
नारायण पांडू कदम - पनवेल
हरी नारायण तवटे
जयराम बाबाजी सावंत
काशिनाथ जनार्दन शेवडे
केशव महादेव जोशी - मामलेदार

Web Title: The land of Jungle Satyagraha is neglected, 87 years of neglect of government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.