जेएनपीटीतील खड्ड्यांची उरणकरांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:41 AM2017-07-18T02:41:25+5:302017-07-18T02:41:25+5:30

सायन - पनवेल, मुंबई-गोवाबरोबरच पळस्पे फाटा ते जेएनपीटी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. पुर्ण महामार्ग खड्डेमय बनला असून

JNPT potholes education to Uranakars | जेएनपीटीतील खड्ड्यांची उरणकरांना शिक्षा

जेएनपीटीतील खड्ड्यांची उरणकरांना शिक्षा

Next

- नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सायन - पनवेल, मुंबई-गोवाबरोबरच पळस्पे फाटा ते जेएनपीटी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. पुर्ण महामार्ग खड्डेमय बनला असून वारंवार वाहतूककोंडी व अपघात होत आहेत. खड्डेमय महामार्गामुळे पळस्पे, उलवे ते उरणपर्यंतच्या सर्व स्थानिक नागरिकांना शिक्षा भोगावी लागत आहे. अपघातांमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून अशीच स्थिती राहिली तर नागरिक रोडवर उतरून महामार्ग रोखण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशातील प्रमुख बंदरांमध्ये जेएनपीटीचा समावेश होत आहे. येथून प्रत्येक वर्षी जवळपास ६ कोटी ४० लाख टन मालाची हाताळणी होत आहे. गतवर्षी बंदर व्यवस्थापनाचे उत्पन्न १५०८ कोटी रुपयांवर गेले आहे. भविष्यात देशातील एक क्रमांकाचे बंदर होण्याच्या दृष्टिकोनातून या परिसराचा विकास केला जात आहे. देशाच्या आयात-निर्यात व्यापारामध्ये प्रमुख भूमिका असलेल्या जेएनपीटीकडे जाण्यासाठी चांगला रोड बनविण्यात शासनाला अपयश आले आहे. पळस्पे फाटा ते जेएनपीटी हा देशातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे.
२७ किलोमीटरचा महामार्ग खड्डेविरहित बनविण्यात शासनाला अपयश आले आहे. रोज हजारो कंटेनर मार्गावरून जात असल्याने वर्षभर खड्डे पडत असतात. सध्या पूर्ण मार्गच खड्डेमय झाला आहे. रस्ता कुठे, खड्डा, गटार कुठे हेच समजेनासे झाले आहे. उलवेपासून पुढे गेल्यानंतर आर. टी. पाटील कंपनीचे होर्डिंग लावलेल्या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहने खड्ड्यात रुतून असल्याने दुचाकी, कारचे अपघात होत आहेत.
जासई गावच्या हद्दीमध्ये सर्वात गंभीर स्थिती झाली आहे. जागोजागी एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये आदळल्याने वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. दुचाकीस्वार खड्ड्यांमध्ये कोसळत असून अनेकांना दुखापत होत आहे. पूर्ण महामार्गावर अपवाद वगळता कुठेच पथदिवे नाहीत. अंधारामध्ये जीवावर उदार होवून वाहने चालवावी लागत आहेत. दास्तान फाटा परिसरामध्येही अशीच स्थिती आहे. दास्तान फाट्याच्या बंद टोलनाक्याच्या पुढे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाखालचा पूर्ण रस्ता खड्डेमय झाल्याने वाहतूक कोंडी होते. ठेकेदाराने खड्डे व अपघात होण्याच्या ठिकाणी आवश्यक सूचनाफलक लावले नाहीत. करळ फाट्यावरून उरणकडे जाणाऱ्या रस्त्याही पाण्याखाली गेला आहे. एनएमएसईझेड व जेएनपीटी गेटच्या रस्त्यावर मोठे खड्डे असून ते कोण बुजविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्गाचे रुंदीकरण होईपर्यंत किमान खड्डेतरी नियमितपणे बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

जासईच्या हद्दीत कोंडी
जेएनपीटी रोडवर जासई गावच्या हद्दीमध्ये सर्वाधिक वाहतूककोंडी होत आहे. आर. के. पाटील कंपनीच्या होर्डिंगच्या समोर रोडवर एक फूट पाणी साचले आहे. जासईजवळ सुनील शेळके यांच्या दुकानाच्या बाहेर दीड फूट खोल खड्डा पडला असून त्या खड्ड्यात आदळून वाहनांचा अपघात होत आहे. खड्ड्यामध्ये आदळून वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे.

उरणवासीयांमध्ये असंतोष
जेएनपीटी महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून सीबीडी ते उरणपर्यंतचे अंतर पूर्ण करण्यासाठी दोन ते अडीच तास वेळ लागत आहे. अनेक वेळा वाहतूककोंडी झाल्यास हे अंतर अजून वाढत आहे. रोजच वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून आम्ही आंदोलन करायचे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

चाकरमान्यांचे हाल
उरण रोडवरील सर्वात मोठा फटका चाकरमान्यांना बसत आहे. वारंवार वाहतूककोंडी होत असल्याने जेएनपीटी व या परिसरातील खासगी कंपन्यांमध्ये कामासाठी जाणाऱ्या नोकरदार नागरिकांना कामावर पोहचण्यास उशीर होत आहे. सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठीही उशीर होत असून ही गैरसोय अजून किती वर्षे सहन करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रोडवर वाहनतळ
करळ फाट्यापासून जेएनपीटीच्या गेटकडे जाणाऱ्या रोडवर अवजड वाहने उभी करू नये अशा पाट्या लावलेल्या असताना पूर्ण रोडवर अवजड वाहने उभी केली जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: JNPT potholes education to Uranakars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.