वाढते वायुप्रदूषण चिंताजनक, हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:15 PM2018-10-21T23:15:31+5:302018-10-21T23:15:41+5:30

माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत असलेल्या नवी मुंबई शहराला वायुप्रदूषणाचा विळखा पडला.

Increasing air pollution is alarming, the amount of dust in the air increases | वाढते वायुप्रदूषण चिंताजनक, हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले

वाढते वायुप्रदूषण चिंताजनक, हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले

googlenewsNext

नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत असलेल्या नवी मुंबई शहराला वायुप्रदूषणाचा विळखा पडला. मागील काही दिवसांपासून हवेत धूलिकणांचे प्रमाण अचानक वाढल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या पर्यावरण सल्लागार समितीच्या अध्यक्षा दिव्या गायकवाड यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार केली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
हवेतील वाढते प्रदूषण हा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. पर्यावरणाचा होत चालला ºहास, शहरीकरणामुळे वाहनांची वाढती संख्या, विविध टप्प्यावर सुरू असलेली विकासकामे आदीमुळे हवेत धुळीचे कण पसरून वायुप्रदूषण होत असल्याचा जागतिक निष्कर्ष आहे. नवी मुंबई हे सुनियोजित शहर म्हणून नावारूपाला येत आहे. शहरात विविध प्रकल्प होऊ घातले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, जेएनपीटी बंदराचा विस्तार आदीमुळे शहरात वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नवी मुंबईलगत दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत, तर सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर हे दोन मार्ग शहराला विभागून जातात. या मार्गावरून दररोज लाखो वाहने जा-ये करतात. तसेच तुर्भे येथील एपीएमसीच्या बाजारपेठेत दररोज हजारो ट्रक व टेम्पो येतात. या सर्वाचा परिणाम म्हणून वायुप्रदूषणात वाढ होत असल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. वाढत्या वायुप्रदूषणामुळे शहरवासीयांचा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. खोकला, सर्दी, ताप तसेच श्वसनाचे त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २0११ ते २0१५ या काळात केलेल्या सर्वेक्षणात नवी मुंबई शहर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून जाहीर केले आहे. नवी मुंबईतील हवेत पार्टिक्युलेट मॅटर १0 या प्रदूषित घटकाबरोबरच नायट्रोजन डायआॅक्साईड व कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण निर्धारित पातळीपेक्षा अनेक पटीने अधिक असल्याचे आढळून आले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास क्रमांक एकचे प्रदुषित शहर म्हणून नवी मुंबईचा समावेश व्हायला वेळ लागणार नाही. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु अहवाल जाहीर होवून एक वर्ष उलटले तरी संबंधित यंत्रणाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते. याचा परिणाम म्हणून शहरातील वायुप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
>एमआयडीसीतील प्रदूषणकारी कारखाने
आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत नवी मुंबईत आहे. औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे शहराच्या प्रदूषणात भर पडत आहे. अनेक कारखान्यातून रात्रीच्या वेळी हवेत विषारी धूर सोडला जातो. जवळच्या नागरी वस्तींना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. यासंदर्भात रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र थातूरमातूर उत्तर देवून त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.
धुके आणि धुळीमुळे रहिवासी हैराण
शहरातील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषत: मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. हवेतील धुळीचे प्रमाण वाढले आहे. सकाळच्या वातावरणात धुके आणि धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब गंभीर असून यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेच्या पर्यावरण सल्लागार समितीच्या अध्यक्षा दिव्या गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अलीकडेच प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आनंद हर्षवर्धन यांची भेट घेवून चर्चा केली.

Web Title: Increasing air pollution is alarming, the amount of dust in the air increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.