उद्यान विभागाचे पक्षपाती धोरण, परिमंडळ दोनवर अन्याय, उद्याने बनली गर्दुल्ल्यांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 03:28 AM2018-03-04T03:28:01+5:302018-03-04T03:28:01+5:30

श्रीमंतांची वसाहत असणा-या विभागांमध्ये चांगली उद्याने तयार केली आहेत. सर्वसामान्यांच्या वसाहतीमधील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्याने गर्दुल्यांचे अड्डे बनली असून उद्यान विभागाने परिमंडळ दोनवर अन्याय केला असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे.

Garden Department's biased policy, injustice on the two circles, the gardens were built | उद्यान विभागाचे पक्षपाती धोरण, परिमंडळ दोनवर अन्याय, उद्याने बनली गर्दुल्ल्यांचे अड्डे

उद्यान विभागाचे पक्षपाती धोरण, परिमंडळ दोनवर अन्याय, उद्याने बनली गर्दुल्ल्यांचे अड्डे

Next

नवी मुंबई : श्रीमंतांची वसाहत असणा-या विभागांमध्ये चांगली उद्याने तयार केली आहेत. सर्वसामान्यांच्या वसाहतीमधील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्याने गर्दुल्यांचे अड्डे बनली असून उद्यान विभागाने परिमंडळ दोनवर अन्याय केला असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे.
नवी मुंबई उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात १५७ उद्याने, हिरवळ विकसित केलेल्या ६७ मोकळ्या जागा, ८१ दुभाजक, ४ चौक व ८ ठिकाणी ट्रीबेल्ट विकसित करण्यात आले आहेत. उद्याननिर्मिती करताना वाशी ते बेलापूर या परिमंडळ एकला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. या परिसरामध्ये तब्बल १११ उद्याने आहेत. दुसरीकडे परिमंडळ दोनमध्ये फक्त ४६ उद्याने आहेत. उद्यान विभागाच्या या पक्षपाती धोरणाचे पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक देवीदास हांडे पाटील यांनी परिमंडळ दोनवर अन्याय झाला असल्याचा आरोप केला. बहुतांश सर्व मोठी उद्याने परिमंडळ एकमध्ये आहेत. श्रीमंतांची वसाहत असलेल्या परिसरामध्ये चांगली उद्याने तयार केली आहेत. गरिबांची वसाहत असणाºया विभागातील उद्यानांची स्थिती बिकट आहे. कोपरखैरणे परिसरामध्ये श्वास घेण्यासही जागा शिल्लक नाही. सेक्टर २२ मधील उद्याने गर्दुल्ल्यांचा अड्डा झाली आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला.
नेरूळ सेक्टर १९ मधील वंडर्स पार्कच्या वार्षिक देखभालीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला होता. देखभालीसाठी वर्षाला ३ कोटी ५४ लाख रुपये खर्च होणार आहे. शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी वंडर्स पार्कमधून किती उत्पन्न होत आहे व खर्च किती होतो याचा ताळमेळ सादर करण्याची मागणी केली. एस्सेल वर्ल्ड किंवा इमॅजिकाप्रमाणे व्यावसायिक संस्थांना वंडर्स पार्क चालविण्याचा ठेका देण्यात यावा, अशी मागणी केली. निविदा मागविताना अटी व शर्ती योग्य पद्धतीने ठेवण्यात याव्या, अशी मागणी केली. द्वारकानाथ भोईर यांनीही वंडर्स पार्कच्या देखभालीवर प्रचंड खर्च होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एका उद्यानाच्या देखभालीच्या खर्चात इतर ठिकाणी दोन ते तीन नवीन उद्याने विकसित होतील, असे मत व्यक्त केले. ऐरोली, दिघा परिसरातील उद्यानांची स्थिती बिकट असून तेथील उद्यानांची योग्य पद्धतीने दखल घ्यावी, अशी मागणी या वेळी केली. शहर अभियंता मोहन डगावकर यांनी पक्षपातीपणाचा आरोप फेटाळून लावला व सर्वच विभागांमध्ये चांगली उद्याने निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले.

वंडर्स पार्कचा पांढरा हत्ती
महापालिकेने ३५ कोटी रुपये खर्च करून वंडर्स पार्कची निर्मिती केली आहे. उद्यानाच्या देखभालीवर वर्षाला साडेतीन कोटी रुपये खर्च होत आहेत. तिकीट व राइड्सच्या माध्यमातून वार्षिक जवळपास २ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. जवळपास दीड कोटी रुपये तूट होत आहे. उद्यान पांढरा हत्ती ठरला असल्याची टीका नगरसेवकांनी केली आहे.

गर्दुल्ल्यांचे अड्डे
ठरावीक उद्यानांच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. कोपरखैरणे, नेरूळ पश्चिम व इतर गरीब नागरिकांची वस्ती असणाºया विभागातील उद्यानांची योग्य देखभाल केली जात नाही. अनेक उद्यानांमध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे तयार झाले आहेत. सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

उद्यान विभागाने परिमंडळ दोनवर अन्याय केला आहे. गरिबांची वसाहत असणाºया परिसरामधील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये चांगली उद्याने तयार केली असून हा पक्षपात थांबवावा.
- देवीदास हांडे पाटील,
नगरसेवक, प्रभाग ४२

वंडर्स पार्कच्या देखभालीवर करोडो रुपये खर्च होत असून त्या पैशात इतर उद्यानांची निर्मिती होऊ शकेल. ऐरोली, घणसोली परिसरातील उद्यानांची स्थिती बिकट झाली असून प्रशासनाने या परिसरामध्येही चांगली उद्याने तयार करावी.
- द्वारकानाथ भोईर,
गटनेते, शिवसेना

वंडर्स पार्कच्या देखभालीसाठी तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु कोणीही निविदा सादर केलेली नाही. उद्यान निर्मितीमध्ये पक्षपात केला जात नसून सर्व विभागांमध्ये चांगली उद्याने बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- मोहन डगावकर,
शहर अभियंता

वंडर्स पार्कच्या देखभालीसाठी अनुभवी संस्थेची नियुक्ती करावी. ना नफा ना तोटा तत्त्वावर उद्यानाची देखभाल केली जावी. प्रशासनाने खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- नामदेव भगत,
नगरसेवक,
शिवसेना

घणसोली परिसरामधील सेंट्रल पार्कचे काम लवकर पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करावे.
- प्रशांत पाटील,
नगरसेवक,
शिवसेना

Web Title: Garden Department's biased policy, injustice on the two circles, the gardens were built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.