अथर्वने बुडविला कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी

By admin | Published: March 28, 2017 06:24 AM2017-03-28T06:24:53+5:302017-03-28T06:24:53+5:30

सिडकोमध्ये मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका घेतलेल्या अथर्व एजन्सीने २४९ कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे

Employees' Provident Fund Proposal | अथर्वने बुडविला कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी

अथर्वने बुडविला कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी

Next

नवी मुंबई : सिडकोमध्ये मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका घेतलेल्या अथर्व एजन्सीने २४९ कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एजन्सीचालकांनी भविष्यनिर्वाह निधी व्यवस्थापनाकडे तशी कबुली दिली असून, पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे; पण वास्तविक हा कष्टकरी कामगारांच्या पैशाचा अपहार असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
अथर्व एजन्सीच्या अनागोंदी कारभाराच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. सिडकोचे कार्यक्षेत्र वाढू लागल्याने व त्याप्रमाणात कर्मचारी नसल्याने जवळपास २०१० पासून बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी भरती केली जात आहे. खारघरमध्ये अथर्व एजन्सीला निविदा न काढताच हा ठेका दिला होता; पण याविषयी अनेकांनी आवाज उठविल्यानंतर निविदा काढून पुन्हा त्याच एजन्सीला काम देण्यात आले. निविदा काढण्यापूर्वी दोन ते तीन वर्षे व निविदा काढल्यानंतर तीन वर्षे अथर्वच्या माध्यमातून कर्मचारी भरती करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वेळेत भरणे, ही ठेकेदाराची जबाबदारी होती; पण प्रत्यक्षात ही रक्कम कधीच भरण्यात आली नाही. सानपाडामधील माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश मढवी यांनी याविषयी तक्रार केल्यानंतर सिडकोने त्या एजन्सीला मुदतवाढ दिली नाही. त्यांच्याऐवजी दुसरी एजन्सी नेमली आहे; पण पहिल्या एजन्सीने कामगारांचे थकविलेले पैसे न देता, त्याचा अपहार केल्याविषयी मात्र काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. एजन्सीला दिलेली रक्कम व त्यांनी त्याचा योग्य वापर केला आहे का? भविष्यनिर्वाह निधीचे पैसे भरलेले नसताना त्यांना बिले कशी अदा करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
ठेकेदाराने किती कामगारांचे पैसे भविष्यनिर्वाह निधीमध्ये भरले आहेत, याविषयी माहिती घेण्यासाठी सुरेश मढवी यांनी माहिती अधिकाराचा वापर केला होता. यामधून कोणाचेही पैसे भरले नसल्याचे समोर आले आहे. मढवी यांनी तक्रारी सुरू केल्यानंतर या कार्यालयाने सिडकोला पत्र पाठवून माहिती मागविली होती. यानंतर अथर्वच्या चालकांनी २४ फेब्रुवारीला शपथपत्र दाखल केले आहे. २४९ कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. अभय योजनेअंतर्गत त्यांनी हा अर्ज केला आहे; पण वास्तविक कर्मचाऱ्यांचा हा आकडा बरोबर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय तीन वर्षांचा भविष्यनिर्वाह निधी भरण्याची तयारी दर्शविली; पण काही कर्मचारी २०१० पासून कार्यरत होते. त्यांच्या पैशांचे काय? असेही मढवी यांनी विचारले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

अथर्वच्या कामाची सखोल चौकशी केली पाहिजे. कर्मचाऱ्यांचे सर्व पैसे मिळाले पाहिजेतच, त्याबरोबर ठेकेदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
- सुरेश मढवी,
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Employees' Provident Fund Proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.