वाहनचोरीच्या गुन्ह्यामध्ये ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:36 AM2018-02-08T02:36:40+5:302018-02-08T02:36:48+5:30

पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये २०१०पासून तब्बल ५८८४ वाहने चोरीला गेली आहेत. यामधील फक्त १४३० वाहने परत मिळविण्यात यश आले आहे.

Dishonesty crime reduces by 50 percent | वाहनचोरीच्या गुन्ह्यामध्ये ५० टक्के घट

वाहनचोरीच्या गुन्ह्यामध्ये ५० टक्के घट

Next

नामदेव मोरे 
नवी मुंबई : पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये २०१०पासून तब्बल ५८८४ वाहने चोरीला गेली आहेत. यामधील फक्त १४३० वाहने परत मिळविण्यात यश आले आहे. आठ वर्षांच्या कालावधीमध्ये वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये ५० टक्के घट झाली आहे. शहरातील सीसीटीव्हीचे जाळे व अनेक टोळ्या गजाआड केल्यामुळे गुन्हे नियंत्रणामध्ये येऊ लागले आहेत. वाहनधारकांनी आधुनिक सुरक्षेच्या उपकरणांचा वापर केल्यास ही वाहनचोरी थांबविणे सहज शक्य होणार आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये २००५पासून वाहनचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली होती. २०१०मध्ये वाहनचोरी करणाºया टोळ्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. शहरात सरासरी रोज तीन वाहनांची चोरी होऊ लागली होती. एका वर्षामध्ये तब्बल १००४ वाहने चोरीला गेली. यामध्ये १२९ अवजड वाहने, ३१७ कार व ५५८ मोटारसायकलचा समावेश होता. वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री घराबाहेर उभी केलेली मोटारसायकल सकाळी तिथे दिसेल याची खात्री राहिलेली नव्हती. सुरुवातीच्या काळात मोटारसायकल मोठ्या प्रमाणात चोरी होऊ लागल्या होत्या; परतु नंतर अवजड वाहनेही चोरी होऊ लागली. कळंबोली, एपीएमसी, उरण परिसरामधून ट्रेलरही मोठ्या प्रमाणात चोरी होऊ लागले. यामुळे वाहतूकदारांचे धाबे दणाणले होते. कळंबोलीमधील काही वाहतूकदारांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. वाहनचोरांमुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवावे, असे आवाहन केले होते. वाहनचोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक निर्माण करण्याची वेळ आली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण वालतुरे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक तयार केले होते.
वाहनचोरीच्या घटना थांबविण्यासाठी पोलिसांनी दहा वर्षे सातत्याने परिश्रम घेतले आहेत. वाहनचोरी करणाºया अनेक टोळ्या गजाआड केल्या आहेत. अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तुरुंगात जाऊन आलेले चोरटे पुन्हा चोरी करत आहेत का? यावरही लक्ष ठेवले जात होते. या सर्व प्रयत्नांना यश मिळू लागले. २०१०मध्ये आयुक्तालय क्षेत्रामध्ये १२९ अवजड वाहने चोरीला गेली व त्यामधील फक्त २० वाहने परत मिळाली होती. २०१७मध्ये फक्त ४० अवजड वाहने चोरीला गेली असून त्यामधील १२ वाहने परत मिळाली आहेत. याच काळात कारचोरीचे प्रमाण ३१७ वरून १६६वर आले. मोटारसायकल चोरीचे प्रमाण ५५८ वरून ३८०वर आले. वाहनचोरीचे प्रमाण ५० टक्के घटले, तरी चोरीला गेलेली वाहने सापडण्याच्या प्रमाणात अद्याप फारशी प्रगती झालेली नाही.
>आधुनिक तंत्राचा वापर हवा
वाहनचोरीचे गुन्हे नियंत्रणामध्ये आणण्यासाठी वाहनमालकांचे सहकार्य आवश्यक आहे. वाहने रोडवर असुरक्षितपणे उभी केली जाऊ नये. वाहनांना आधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर केला जावा. दुचाकींसाठी १५० रूपयांपासून ५०० रूपयांना चांगली उपकरणे उपलब्ध असून दुचाकी चालक या उपकरणांचा वापर करत नसल्याने चोरी थांबत नाहीत. योग्य काळजी घेतली तर गुन्हे कमी करणे शक्य आहे.
>वाहनधारकांना धक्का
आठ वर्षांमध्ये शहरात ५८८४ वाहने चोरीला गेली आहेत. यामधील १४३० वाहने परत मिळाली असून, तब्बल ४४५४ वाहने अद्याप सापडलेली नाहीत. वाहन चोरीला गेले की, वाहनमालकांना धक्का बसत आहे. बहुतांश वाहने सापडत नसल्याने प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. अनेक वाहतूकदार कर्जबाजारी झाले असून, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
>वाहने जातात कुठे
चोरीची वाहने जातात कुठे? हा प्रश्न पोलीस यंत्रणांपासून सर्वसामान्य नागरिकांनाही सतावू लागला आहे. काही वाहने परराज्यात विकली जातात. ग्रामीण भागामध्येही चोरीची वाहने विकली जात आहेत. चोरीच्या वाहनांचे चांगले पार्ट काढून विकली जात आहेत. भंगारमध्ये वाहने विकण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे बोलले जात आहे.
>आठ वर्षांतील वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपशील (कंसात उघड गुन्हे)
वर्ष अवजड वाहने कार मोटारसायकल एकूण
२०१० १२९ (२०) ३१७ (४०) ५५८ (८४) १००४ (१४४)
२०११ १३५ (२१) २७८ (३२) ५०० (८४) ९१३ (१३७)
२०१२ १२४ (३१) २५१ (५२) ३९७ (११२) ७७२ (१९५)
२०१३ ९३ (२६) २४४ (५९) ३४८ (११२) ६८५ (१९७)
२०१४ ८७ (२८) १७६ (३४) ३९१ (१०७) ६५४ (१६९)
२०१५ ६९ (१८) ११४ (३१) ४११ (१२३) ५९४ (१४२)
२०१६ ५४ (२६) १५४ (२९) ४६८ (२१८) ६७६ (२७३)
२०१७ ४० (१२) १६६ (१९) ३८० (१४२) ५८६ (१७३)
एकूण ७३१(१८२) १७००(२९६) ३४५३(८७०) ५८८४ (१४३०)
>वाहनचोरी करणाºया अनेक टोळ्या गजाआड करण्यात यश आले आले. अभिलेखावरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. शहरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या सर्वांमुळे वाहनचोरीचे गुन्हे कमी होत आहेत. हे प्रमाण अजून कमी करण्यासाठी वाहनधारकांनीही सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
- डॉ. सुधाकर पठारे,
उपआयुक्त, परिमंडळ १
>वाहनचोरीचे गुन्हे नियंत्रणात येऊ लागले आहेत. अनेक टोळ्या गजाआड करण्यात आले आहेत. वाहनधारकांनी अत्याधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर केल्यास गुन्हे कमी होऊ शकतात.
- राजेंद्र माने,
उपआयुक्त,
परिमंडळ २

Web Title: Dishonesty crime reduces by 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.