बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी

By admin | Published: September 25, 2015 02:28 AM2015-09-25T02:28:39+5:302015-09-25T02:28:39+5:30

शहराच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या बेलापूर किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सिडकोने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे

Demand for beautification of Belapur fort | बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी

बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी

Next

नवी मुंबई : शहराच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या बेलापूर किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सिडकोने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. साडेचारशे वर्षांची पार्श्वभूमी असणाऱ्या किल्ल्याची डागडुजी व सुशोभीकरण होणे अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
नवी मुंबई शहर सिडकोने वसविले असले तरी ठाणे - बेलापूरच्या या पट्ट्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. घणसोली गावात अनेक वर्षे स्वातंत्र्यसैनिकांची छावणी होती. अनेक भूमिपुत्रांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. बेलापूर किल्ल्यालाही तब्बल साडेचारशे वर्षांची पार्श्वभूमी आहे. महापालिका मुख्यालयाच्या समोर असणाऱ्या किल्ल्याची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाली आहे.
किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी याविषयी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांना पत्र पाठविले आहे. विधान परिषद सदस्य असताना शासन स्तरावर पाठपुरावा केला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. आमदार अरविंद सावंत, मधू चव्हाण, विवेकानंद पाटील, तत्कालीन पालिका आयुक्त
विजय नाहटा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गील यांनी किल्ल्याची पाहणी केली होती.
सिडको गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीमध्ये किल्ल्याचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च होणार होते. या कामाचे नियोजन करण्यासाठी पुण्यामधील एका संस्थेची नियुक्तीही केली होती. परंतु पुढे त्याचा पाठपुरावा झाला नाही. पुरातत्व विभागाकडून मंजुरी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.
सिडकोेने किल्ला संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत. नवी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना येथील इतिहास समजला पाहिजे. यामुळे शक्य तितक्या लवकर किल्ला संवर्धनासाठीची पावले उचलावी, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी सिडकोकडे केली आहे.

Web Title: Demand for beautification of Belapur fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.