सिडकोचे अध्यक्षपद प्रकल्पग्रस्तांकडे;पाच दशकांनंतर भूमिपुत्रांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:16 AM2018-09-02T03:16:04+5:302018-09-02T03:16:33+5:30

सिडकोची स्थापना होऊन ४८ वर्षे पूर्ण झाली. देशातील सर्वात श्रीमंत महामंडळ अशी ओळख असणाऱ्या या संस्थेची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू झाली आहे.

CIDCO presides over project seekers; | सिडकोचे अध्यक्षपद प्रकल्पग्रस्तांकडे;पाच दशकांनंतर भूमिपुत्रांच्या आशा पल्लवित

सिडकोचे अध्यक्षपद प्रकल्पग्रस्तांकडे;पाच दशकांनंतर भूमिपुत्रांच्या आशा पल्लवित

Next

- वैभव गायकर

पनवेल : सिडकोची स्थापना होऊन ४८ वर्षे पूर्ण झाली. देशातील सर्वात श्रीमंत महामंडळ अशी ओळख असणाऱ्या या संस्थेची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू झाली आहे. विकासाचे अनेक टप्पे पूर्ण केले असले तरी येथील भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले. पहिल्यांदाच या महामंडळावर प्रकल्पग्रस्त नेत्याची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे ९५ गावांमधील भूमिपुत्रांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. गरजेपोटी बांधलेल्या घरांपासून ते साडेबारा टक्के योजनेपर्यंतचे सर्व प्रश्न सुटतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोच्या अध्यक्षपदी निवड होताच पाच दशकातील वाटचालीला उजाळा मिळाला आहे. १९६0 च्या दशकात मुंबईच्या लोकसंख्येत ४0 टक्क्यांनी वाढ झाली. ही लोकसंख्या शहराच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त असल्याने मुंबई शहराला पर्याय म्हणून सिडकोमार्फत नवी मुंबई शहर विकसित करण्याचे धोरण आखण्यात आले. ठाणे व रायगड जिल्ह्यातील ९५ गावांचा समावेश करण्यात आला. राज्य शासनातर्फे फेब्रुवारी १९७0 मध्ये सध्याच्या नवी मुंबई क्षेत्रातील ९५ पैकी ८६ गावातील १५,९५४ चौ.कि.मी. क्षेत्रफळाचे भूसंपादन करण्यात आले. आॅगस्ट १९७३ मध्ये इतर ९ गावातील २५.७0 चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा यामध्ये अंतर्भाव करण्यात आला.अशा एकूण ९५ गावांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या.
सिडको आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त यांच्यातील वाद नवीन नाही. सिडकोविरोधात अनेक संघर्ष झाले त्यामध्ये प्रकल्पग्रस्त नेते सिडकोविरोधात वेळोवेळी बंड पुकारत आले आहेत. साडेबारा टक्केचा लढा याचाच भाग आहे. मात्र सरकारने स्थानिक प्रकल्पग्रस्त नेत्याची या पदावर निवड करून सिडको आणि प्रकल्पग्रस्तांमधील दुरावा नष्ट करण्याचे देखील काम केल्याचे दिसून येत आहे . सध्याच्या घडीला मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना आदी प्रकल्प पूर्वत्वाला नेण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची महत्त्वाची भूमिका प्रशांत ठाकूर यांना बजावावी लागणार आहे. शेकडो प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के सोडती बाकी आहेत. त्याव्यतिरिक्त सिडकोमधील दलालांच्या हस्तक्षेपाला लगाम घालणे गरजेचे आहे. पनवेल महानगर पालिका व सिडको प्रशासनामध्ये देखील सिडको नोड हस्तांतरणासंदर्भात सुसंवाद होणे गरजेचे आहे. पनवेल महानगर पालिकेशी निगडित सिडको नोडमधील प्रश्न त्यामध्ये घनकचरा, विविध आरक्षित भूखंड, उद्याने, आदी वेगाने मार्गी लावण्याची शक्यता आहे.

सिडकोचे अध्यक्षपद हा हुतात्म्यांचा सन्मान
उरण : सिडकोच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत ठाकूर व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांची जन्मभूमी जासईला भेट दिली. १९८४ सालच्या गौरव व शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी ते म्हणाले की, सिडकोबाधित प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांनी जे आंदोलन सुरू केले आणि त्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रकल्पग्रस्तांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्या प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आज भाजपा सरकारने माझ्यावर सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्या भाजपा सरकारच्या विश्वासाला तडा जाऊ न देता लोकनेते दि.बा.पाटलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम आणि प्रकल्पग्रस्तांची सेवा करण्याचे काम हे मी हुतात्म्यांच्या पावन भूमीतून आज सुरू करीत आहे. सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार हा आमदार प्रशांत ठाकूर हे मंगळवार, ४ सप्टेंबर २0१८ रोजी बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात सकाळी ठीक ११च्या सुमारास स्वीकारणार आहेत.

सिडकोचे अध्यक्ष कार्यकाळ
एन. एम. वागळे १७ मार्च १९७0 ते २२ जुलै १९७६
अजित बी. केरकर २२ जुलै ते १९७६ ते ४ आॅक्टोबर १९७७
डॉ. आर. बी. भंडार १३ आॅक्टोबर १९७७ ते ९ फेब्रुवारी १९७८
प्रा. राम कापस १४ एप्रिल १९७९ ते २४ एप्रिल १९८0
सुरेश ए. केशवानी ५ नोव्हेंबर १९८0 ते १९ फेब्रुवारी १९८१
राम ए. महाडिक २0 मे १९८२ ते ९ जुलै १९८७
ए. टी. पाटील १ फेब्रुवारी १९८८ ते १0 सप्टेंबर १९९१
नकुल पाटील १७ सप्टेंबर १९९१ ते १४ मार्च १९९५
नारायण मराठे १२ सप्टेंबर १९९५ ते १८ आॅक्टोबर १९९९
प्रा . जावेद खान १४ जून २000 ते १३ जुलै २00४
नकुल पाटील १४ जुलै २00४ ते ५ जानेवारी २00५
नकुल पाटील ३१ आॅगस्ट २00६ ते २९ जून २0११
प्रमोद हिंदुराव २६ आॅगस्ट २0११ ते २५ नोव्हेंबर २0१४
प्रशांत ठाकूर १ सप्टेंबर २0१८

सिडको अध्यक्षपदी निवडीबाबत सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे मला या पदावर जाण्याचा मान मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे यासह सिडकोचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे ही माझी प्राथमिकता असणार आहे.
- प्रशांत ठाकूर, अध्यक्ष,
सिडको महामंडळ

प्रशांत ठाकूर यांच्या निवडीबाबत त्यांचे अभिनंदन. स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते सिडकोचे अध्यक्ष झाल्यामुळे सिडको प्रकल्पग्रस्तांच्या विस्तारित गावठाणाचे, त्यातील गरजेपोटी घरांचे, साडेबारा टक्के भूखंडाचे, विमानतळबाधितांचे पुनर्वसनासंदर्भातील प्रलंबित प्रश्न जे सिडको प्रशासनाकडे गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत ते मार्गी लागण्याचा विश्वास आम्हा सर्व भूमिपुत्रांमध्ये निर्माण झाला आहे.
- नीलेश पाटील, अध्यक्ष,
आगरी कोळी युथ फाउंडेशन

Web Title: CIDCO presides over project seekers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.