पनवेल रेल्वेस्थानक टाकणार कात, मध्य रेल्वेकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 02:28 AM2018-11-14T02:28:45+5:302018-11-14T02:29:30+5:30

सिडको, मध्य रेल्वेकडून पाहणी : अतिरिक्त तीन फलाट, सीएसटी-पनवेल कॉरिडोरही दृष्टिपथात

Central Railway will inspect Panvel railway station | पनवेल रेल्वेस्थानक टाकणार कात, मध्य रेल्वेकडून पाहणी

पनवेल रेल्वेस्थानक टाकणार कात, मध्य रेल्वेकडून पाहणी

googlenewsNext

कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे भविष्यात पनवेल स्थानकाला वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे, त्यामुळे या स्थानकाचा मेकओव्हर करून तेथील विद्यमान सुविधांत वाढ करण्याचा निर्णय सिडको व मध्य रेल्वेने घेतला आहे. त्या संबंधीचा आराखडा तयार करण्यात आला असून, स्थानकात अतिरिक्त तीन फलाटांची निर्मिती केली जाणार आहे. सिडको व मध्य रेल्वेच्या संयुक्त पथकाने सोमवारी पनवेल स्थानकाची पाहणी केली. विशेष म्हणजे, या स्थानकाच्या विस्तारीकरणाचा संपूर्ण खर्च सिडको व रेल्वे संयुक्तपणे करणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा ‘नैना’ प्रकल्प, मेट्रोचे जाळे, जेएनपीटीची विस्तार तसेच शिवडी-न्हावाशिवा सी-लिंक व नेरुळ-उरण रेल्वे आदीमुळे रायगड जिल्ह्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. नेरुळ-खारकोपर उपनगरीय रेल्वेसेवेच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून भविष्यात पनवेल-रायगडच्या विकासाचा केंद्रबिंदू असेल, असे स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल परिसरातच असल्याने या विभागातील दळणवळण यंत्रणाही अधिक सक्षम करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली होती. सध्याच्या पनवेल स्थानकातून अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या सुटतात, त्यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. भविष्यात या स्थानकांवर ताण वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्यानंतर या स्थानकाला आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे. तसेच ‘नैना’ क्षेत्राच्या संपूर्ण विकासानंतर सध्याच्या पनवेल स्थानकाला मर्यादा पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर काळाची गरज म्हणून पनवेल स्थानकाचा मेकओव्हर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव मध्य रेल्वेला सादर करण्यात आला होता.
मध्य रेल्वेच्या मान्यतेनंतर स्थानकाच्या विस्तारीकरणाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. स्थानकात अतिरिक्त तीन फलाट वाढविण्यात येणार आहेत. तसेच सीएसटीच्या पार्श्वभूमीवर स्थानकाचा विकास करण्याची योजना आहे. याचा संपूर्ण खर्च सिडको व मध्य रेल्वे करणार आहे, त्यानुसार सोमवारी सिडको व रेल्वेच्या पथकाने या स्थानकाला भेट देऊन पाहणी
केली. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास सिडकोच्या सूत्राने व्यक्त केला आहे.

२००७ मध्ये झाली होती पुनर्बांधणी
पनवेल स्थानकांवरील प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेऊन २००७ मध्ये या स्थानकाची पुनर्बांधणी करण्यात आली होती. मात्र, मागील दहा वर्षांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने हे स्थानक अपुरे पडू लागले आहे. तसेच भविष्यात येऊ घातलेल्या विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे या परिसराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानकाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय विमातळाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण यंत्रणा सक्षम करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. मुंबईहून नवी मुंबई विमानतळापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचता यावे, या दृष्टीने मेट्रो, रेल्वे रस्ते व जलवाहतुकीचे जाळे विणले जात आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल स्थानकापर्यंत कॉरिडोर तयार केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च निर्धारित केला आहे. या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल, असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
 

Web Title: Central Railway will inspect Panvel railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.